Next
‘एखादे तरी कौशल्य आत्मसात करा’
BOI
Monday, November 27 | 12:00 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘सध्या तंत्रज्ञानाची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे. त्याची आपल्याला माहिती असायला हवी. मुख्य म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात कार्यसंस्कृतीशी आणि अभिनवतेशी संबंधित असे अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. एखादी तरी पदवी मिळवणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर एखादे तरी कौशल्य आत्मसात करा,’ असा सल्ला ख्यातनाम संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थी सहायक समितीतर्फे शनिवारी (२५ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
   
सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांच्या ‘टीम कर्मा’ नावाच्या चमूच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चीनच्या जिआत्झिंगमध्ये भरलेला ‘आंतरराष्ट्रीय मिडलवेट रोबोवॉर वर्ल्ड कप’ जिंकून या क्षेत्रात भारताचे नाव झळकवण्याची चमकदार कामगिरी या चमूने अलीकडेच केली आहे. या कामगिरीबद्दल चमूतील उत्कर्ष खोडे, अभिषेक राऊत, यश रंजनकर, शौनक ठकार, निनाद पाटील, निकुंज चौधरी आणि राहुल साहू यांचा विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने, शिकारपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी समितीचे अधिकारी पाटील आणि खजिनदार तुषार रंजनकर उपस्थित होते. समिती सदस्या सुप्रिया केळवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दीपक शिकारपूर यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे आणि पदवी प्राप्त करण्याचे महत्त्व मुलांमुलींच्या मनावर बिंबवले. ते म्हणाले, ‘रोबोटिक्सचं तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत आहे. स्टीफन हॉकिंगसारख्या विद्वान शास्त्रज्ञाने तर भाकीत केले आहे, की रोबो आणि ह्युमनॉइड्स भविष्यात मानवजातीला नष्ट करतील. सौदी अरेबियाने सोफिया नावाच्या एका रोबोला नागरिकत्व दिल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. ड्रायव्हर नसलेल्या आणि शून्य अपघात करणाऱ्या मोटारी आज विकसित देशांत धावू लागल्या आहेत. म्हणजेच तंत्रज्ञानाची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे. त्याची आपल्याला माहिती असायला हवी आणि बाहेरच्या देशांत या ज्ञानाला फार महत्त्व आहे. मुख्य म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला कार्यसंस्कृतीशी आणि अभिनवतेशी संबंधित असे अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. आज कित्येक इंजिनीयर्स आणि ‘एमबीए’सुद्धा नोकरीपासून वंचित आहेत. कारण अभ्यासक्रमाबाहेरच्या ज्ञानात ते कदाचित कुठेतरी कमी आहेत. त्यामुळे एखादी तरी पदवी मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एखादे तरी कौशल्य आत्मसात करणेही अत्यंत गरजेचे आहे.’

त्यानंतर सिंहगड कॉलेजच्या ‘टीम कर्मा’ने त्यांच्या रोमांचक विजयाची कहाणी उपस्थित विद्यार्थ्यांना काही व्हिडिओजच्या साह्याने सांगितली. त्यांना आलेल्या अडचणी, सुरुवातीला फेदरवेट आणि मिडलवेट दोन्ही गटांत पहिल्याच फेऱ्यांमध्ये पत्करायला लागलेला दारुण पराभव; पण त्याने खचून न जाता आपली उमेद कायम ठेवून खेचून आणलेली विजयश्री आणि चीनच्या त्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जिंकल्यावर तिरंगा फडकवत त्यांनी केलेल्या जल्लोषाची व्हिडिओ क्लिप बघताना उपस्थित मुले भारावून गेली होती. सुरुवातीच्या अपयशातून विजयाच्या शिखराकडे नेणारी त्यांची विजयगाथा नक्कीच प्रेरणादायी होती आणि आपणही यातून नक्कीच काही घेऊन जातोय, ही भावना तिथून निघताना प्रत्येकाच्या मनात होती.      

विद्यार्थी सहायक समिती’विषयी...
पुण्यातील ‘विद्यार्थी सहायक समिती’ ही महाराष्ट्रातील खेडोपाड्यांतून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या मुलामुलींची राहण्याची आणि जेवणाची सोय करणारी प्रख्यात धर्मादाय संस्था. या ठिकाणी विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत आणि ग्रंथालयाचीही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी व्याख्याने आणि कार्यक्रमांचे आयोजनही वेळोवेळी केले जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विनायक देशपांडे इंदापुर About
अभिनंदन सर्व टीमच
0
0

Select Language
Share Link