Next
रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहितेंच्या चित्राची इटलीतील ‘आर्ट फेस्ट’साठी निवड
BOI
Friday, March 29, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

आर्ट फेस्टसाठी निवड झालेले चित्र - टर्ब्युलन्सरत्नागिरी : इटलीतील कॅसोरिया कन्टेम्पररी आर्ट म्युझियमतर्फे (कॅम) आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या सर्व्हायव्हल आर्ट फेस्टसाठी रत्नागिरीतील प्रा. डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या ‘टर्ब्युलन्स’ या फ्लुइड पेंटिंगची निवड झाली आहे. भारतातील केवळ ३० चित्रकारांना येथे आपले चित्र मांडण्याची संधी मिळते. त्यात डॉ. मोहिते यांच्या चित्राचा समावेश झाला आहे. पाच जुलै ते १६ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत हा आर्ट फेस्ट होणार आहे. 

डॉ. स्वप्नजा मोहिते या मत्स्यविज्ञान क्षेत्रातील अभ्यासक असून, रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. एक संवेदनशील लेखिका म्हणूनही त्या परिचित असून, कथा, कविता, एकांकिका आणि विज्ञानविषयक लेखन त्या करतात. त्याशिवाय त्या चित्रकार असून, गेली १५ वर्षे त्या सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चित्रकला करत आहेत. चित्रकलेचे कोणतेही रूढ शिक्षण न घेता त्या चित्रकलेच्या विश्वात भ्रमंती करत आहेत. अमूर्त चित्र (अॅबस्ट्रॅक्ट) हा त्यांचा खास आवडीचा प्रांत! समुद्राशी जवळचे नाते असल्याने तो त्यांच्या चित्रात जास्तच डोकावतो. फ्लुइड माध्यमात, ब्रशचा कमीत कमी वापर करून त्या ‘सीस्केप्स’ रंगवतात. त्यातही अॅक्रॅलिक रंगांबरोबर अल्कोहोल इंक्स आणि रेझीन या माध्यमात त्या काम करतात. आज भारतात रेझीन माध्यमामध्ये काम करणाऱ्या मोजक्या चित्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. 

अॅक्रिलिक रंगांमध्ये काही विशिष्ट मीडियम आणि तेल मिसळून त्या चित्राला वेगळाच पोत आणि आयाम देतात. त्यातून कॅनव्हासवर वेगवेगळ्या चित्रकृती उमटवत जातात. बारीक रेषांची जाळी, एकमेकात मिसळून गेलेले रंग आणि त्यातून निर्माण झालेले एक वेगळेच चित्र, त्यांचे वेगळेपण अधोरेखित करते. रेझीन हे त्यांचे आवडीचे माध्यम. रेझीन हे विशेषतः घराच्या बांधकामात वापरले जाणारे रसायन. त्यात काम करण्यासाठी केवळ ३० ते ४५ मिनिटे मिळतात. त्यानंतर हे रसायन घट्ट होऊ लागते आणि त्यात काम करणे थांबवावे लागते. कॅनव्हासवर दिलेला हा थर सुकण्यासाठी १२ तासांचा अवधी द्यावा लागतो. त्यानंतर पुढचा हात द्यावा लागतो. त्यामुळे मनात कल्पलेले चित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाच-सहा दिवस लागतात. हे रेझीनमधील चित्र त्रिमित दिसते (थ्री डी इफेक्ट). रेझीन पूर्णपणे सुकल्यावर त्याला येणारा काचेचा फील प्रत्यक्ष चित्र पाहताना अनुभवता येतो.

डॉ. स्वप्नजा मोहितेडॉ. स्वप्नजा मोहिते यांनी केलेली ‘इन दी आय ऑफ दी स्टॉर्म’, ‘वेव्हज्,’ ‘रिव्हर इन माय ड्रीम’ ही रेझीन पेंटिंग्स पाहणे म्हणजे एक अप्रतिम अनुभूती असल्याचे मत ती चित्रे पाहिलेले रसिक व्यक्त करतात. त्यांच्या रेझीनमधील कामाची खासियत पाहूनच त्यांना वेगवेगळ्या कला प्रदर्शनांमध्ये रेझीन आर्टच्या प्रात्यक्षिकांसाठी आमंत्रित केले जाते. 

अल्कोहोल इंक्स या द्रव स्वरूप माध्यमातही त्या काम करतात. हे रंग काही सेकंदांत सुकतात. त्यामुळे एअर ब्रश टेक्निक वापरून, हवेच्या मंद झोताचा वापर करून, हे रंग कागद किंवा कॅनव्हासवर हवे तसे वळवावे लागतात. ही चित्रे पाहणाऱ्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी अल्कोहोल इंक्समध्ये चितारलेले ‘वेटिंग फॉर दी रेन्स’ हे कोकणात पाऊस येण्याआधीच्या निसर्गाचे चित्र अल्कोहोल इंक्समध्ये काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या फेसबुक ग्रुपचे मुखपृष्ठ म्हणून निवडले गेले होते.

डॉ. मोहिते यांच्या चित्रांची प्रदर्शने विविध ठिकाणी झाली आहेत. कला साधना मंचातर्फे पुण्यातील यशवंतराव चव्हाण कलादालनात, तसेच रत्नागिरीत आर्ट सर्कलतर्फे रत्नागिरी संगीत आणि कला महोत्सवात, कला निर्वाना इंटरनॅशनल आर्ट सेंटरतर्फे पुण्यातील पंडित भीमसेन जोशी कलादालनात आणि ‘चित्रांगना २०१९’तर्फे वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान त्यांना रेझीन आर्टची प्रात्यक्षिके दाखविण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘वर्ल्ड आर्ट ब्रॅडिंग कॉन्क्लेव्ह’तर्फे घेतल्या गेलेल्या स्त्री चित्रकारांच्या जागतिक स्तरावरील चित्र स्पर्धेत डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या चित्रांना ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ देऊन गौरविण्यात आले. रंगसमर्थ, कोल्हापूर आणि आर्टिफॅक्ट २०१९, गोवा कला अकादमी येथेही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरणार आहेत. 

‘कॅम’विषयी : 
कॅसोरिया कन्टेम्पररी आर्ट म्युझियम (कॅम) इटलीतील नेपल्स येथे २००५मध्ये अंतोनिओ मेनफ्रेदी यांनी सुरू केले. जगभरातील समकालीन चित्रकारांना सारखे व्यासपीठ मिळावे आणि जगभरातील चित्रसंस्कृती एका व्यासपीठावर येऊन विचारांचे आदानप्रदान करता यावे, या हेतूने हे म्युझियम सुरू करण्यात आले. हे केवळ प्रदर्शनस्थळ म्हणून नव्हे, तर एक वैचारिक, सांस्कृतिक ग्लोबल व्हिलेज म्हणून मान्यता पावलेले कलाविषयक केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळी आपले चित्र प्रदर्शित व्हावे, हे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असते. या म्युझियममध्ये डॉ. स्वप्नजा मोहिते यांचे त्यांच्या आवडत्या उसळत्या सागराचे चित्र प्रदर्शित होणार आहे, हा दुग्धशर्करा योगच.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search