Next
‘बेटियाँ तो सब की सांझी होती हैं!’
BOI
Wednesday, August 07, 2019 | 01:47 PM
15 0 0
Share this article:देशाच्या राजकारणात आपल्या उत्तुंग कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे वेगळेपण दर्शविणाऱ्या या काही गोष्टी...
...........
सप्टेंबर २०१६मधली गोष्ट आहे. अकराव्या ‘ग्लोबल यूथ पीस फेस्टिव्हल’साठी (जागतिक युवा शांतता महोत्सव) जगभरातील तरुण-तरुणी चंडीगडमध्ये दाखल झाले होते. २८ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव झाला. या महोत्सवात पाकिस्तानातील १९ मुलींचे पथकही सहभागी झाले होते.

त्याचदरम्यान, २९ सप्टेंबर रोजी भारताने पाकव्याप्त काश्मिरात ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे वातावरण थोडे गंभीर बनले. त्यामुळे साहजिकच भारतात आलेल्या पाकिस्तानी पथकातील मुली थोड्या सचिंत झाल्या. ‘आपण सुरक्षित राहू ना आणि वेळेवर घरी पोहोचू ना,’ असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध शांततापूर्ण राहावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘आगाज़ ए दोस्ती’ नावाच्या पाकिस्तानी गटाची प्रमुख आलिया हरीर हीदेखील भारतात आलेल्या या पथकात होती. तिने या संदर्भात तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि त्यांनी तिला आश्वस्त केले. सर्जिकल स्ट्राइकनंतर चंडीगड पोलिसांनी या पथकाची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली. 

या भेटीनंतर आलिया आणि तिच्या मैत्रिणींच्या मनातील संदेह दूर झाला आणि तिने तसे ट्विटही केले. पाकिस्तानी पथक सुरक्षितपणे घरी पोहोचेल, असा विश्वास त्यांनी दिल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर सुषमा स्वराज यांनी दिलेले उत्तर नेहमीप्रमाणेच लक्ष वेधून घेणारे आणि कठोर, कर्तव्यदक्ष नेत्याच्या ममत्वाची जाणीव करून देणारे होते.

‘आलिया, तुमच्या सुरक्षिततेची काळजी मला आहे. (कोणाच्याही) मुली या (सर्वांसाठीच) मुलीप्रमाणेच असतात,’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. ‘...क्योंकी बेटियाँ तो सब की सांझी होती हैं!’ या त्यांच्या ट्विटने सर्वांचीच मने जिंकून घेतली. ‘...क्योंकी बेटियाँ तो सब की सांझी होती हैं!’
हे वाक्य सुषमा स्वराज यांना स्वतःलाही तंतोतंत लागू पडते. ‘देश की बेटी’ असल्याने देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो, त्याच्या हिताची काळजी सुषमा स्वराज यांनी घेतली. एवढेच कशाला, ‘तुम्ही मंगळावर अडकला असलात, तरी भारतीय दूतावास तुम्हाला मदत करील,’ असे ट्विटही त्यांनी केले होते. ‘मी मंगळावर अडकलो असून, मंगळयानाने ९८७ दिवसांपूर्वी अन्न पाठवले होते. आता मंगळयान-दोन कधी पाठवणार’ अशा आशयाचे ट्विट एका व्यक्तीने त्यांना केले होते. त्यावर उत्तर म्हणून सुषमा यांनी वरील ट्विट केले होते. देशवासीयांच्या मदतीला सदैव सज्ज असल्याची त्यांची भावना यातून दिसून येते. मुलीचे कर्तव्य निभावताना आईचे हृदयही त्यांच्यापाशी होते. त्यामुळेच ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या माध्यमाने ‘सुपरमॉम ऑफ इंडिया’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. पक्षाबाहेरही त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते, याचे इंगित या ममत्वाच्या भावनेत दडलेले होते. 

‘ट्विटर’चा वापर एक प्रकारच्या हेल्पलाइनप्रमाणे करणारे जे नेते आहेत, त्यापैकी सुषमा स्वराज महत्त्वाच्या नेत्या होत्या. त्यांचे जवळपास प्रत्येक ट्विट बातमीचा विषय व्हायचे. या गोष्टीला त्यांचे अखेरचे ट्विटही अपवाद नव्हते. कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी हे ट्विट केले होते. या निर्णयाबद्दल अभिनंदन करतानाच ‘आयुष्यात याच दिवसाची मी वाट पाहत होते,’ असे त्यांनी त्यात म्हटले होते. त्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांतच सुषमा यांनी या जगाचा निरोप घेतला. 


येमेनमधील ऑपरेशन राहत असो किंवा पाकिस्तानमध्ये चुकून गेलेली गीता असो; काबूलमध्ये अपहरण झालेली ज्युडिथ असो किंवा ओमानमध्ये अडकलेली फरिदा खान असो; जॉर्जियामध्ये उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या आईचा व्हिसा संपण्याचे प्रकरण असो किंवा टीव्ही अभिनेता करणवीर बोहराला व्हिसा संपल्याने रशियात पकडल्याचे प्रकरण असो; नवीन लग्न झालेल्या तरुणाने व्हिसाअभावी एकट्याला परदेशी जावे लागत असल्याचे केलेले ट्विट असो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लंडनला जाऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांच्या ईशाला व्हिसा मिळण्यात असलेल्या अडचणीसाठी केलेले ट्विट असो; सुषमा स्वराज यांनी या आणि अशा प्रत्येक प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, आवश्यक ती सर्व मदत करून संबंधितांना दिलासा दिला. त्यामुळेच त्यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री झालेले एस. जयशंकर यांनीही सुषमा स्वराज यांचा उल्लेख करून, त्यांच्याप्रमाणेच कार्य करणार असल्याचे त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी या दाम्पत्याच्या पोटी १४ फेब्रुवारी १९५३ रोजी हरियाणात जन्माला आलेल्या सुषमा यांनी आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केली. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. तरीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात (वयाच्या २५व्या वर्षापासून) जनता पार्टीतून झाली. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. त्या वेळीच त्यांची स्वराज कौशल यांच्याशी भेट आणि ओळख झाली. आणि घरच्यांचा विरोध असूनही त्यांची परवानगी मिळवून त्यांनी स्वराज यांच्याशी विवाह केला. आणीबाणीनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याआधी काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली होती. त्यांचे पती स्वराज कौशलही सर्वोच्च न्यायालयात वकील होते.   

भाषांवर सुषमा यांचे पहिल्यापासूनच प्रेम. त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. कॉलेजात असताना त्यांनी सलग तीन वर्षे ‘उत्कृष्ट हिंदी वक्ता’ हे पारितोषिक मिळवले होते. पुढे राजकीय जीवनात त्यांची संस्कृतप्रचुर हिंदीतील भाषणे म्हणूनच वेगळी आणि प्रभावी ठरायची. परराष्ट्रमंत्री झाल्यावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांनी तीन वेळा हिंदी भाषेतच भाषण केले होते. 

दहाव्या विश्व हिंदी संमेलनात त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. एखादा परदेशी प्रतिनिधी जेव्हा त्यांच्याशी इंग्रजीत बोलतो, त्या वेळी त्या त्यांच्याशी इंग्रजीत बोलतात. परंतु एखादा चिनी प्रतिनिधी चिनी भाषेत किंवा जपानी प्रतिनिधी जपानी भाषेत बोलत असेल, तर त्या हिंदी भाषेतच बोलतात असे त्यांनी सांगितले होते. परराष्ट्र खात्यात स्वतंत्र हिंदी विभाग तयार करून त्याच्या प्रमुखपदी त्यांनी आयएफएस सेवेतील सहसचिवाला नेमले होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत भाषेतील अत्यंत मौलिक ठेवा असलेल्या भगवद्गीतेला राष्ट्रीय पुस्तकाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लावून धरली होती. हरियाणातील हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी चार वर्षे भूषविले होते.

१९९९मध्ये, १३व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील बळ्ळारी मतदारसंघातून उभे केले. हा मतदारसंघ पहिल्या निवडणुकीपासूनच काँग्रेसकडे होता. त्यांना कडवे आव्हान देण्यासाठी भाजपने सुषमा यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी त्यांनी अवघे १२ दिवसच निवडणूक प्रचार मोहीम राबवली होती. तरीही त्यांना सुमारे साडेतीन लाख मते मिळाली होती. त्याचे कारण म्हणजे त्यांनी झटपट कन्नड भाषा शिकून, त्या भाषेतच प्रचाराची भाषणे केली होती. आपली भाषा हा कोणत्याही व्यक्तीला आपल्याशी जोडणारा दुवा वाटतो. त्यांना कमी दिवसांत एवढा पाठिंबा मिळण्यामागे कन्नड भाषेतील भाषणे हे प्रमुख कारण असावे. त्या निवडणुकीत त्या जिंकल्या नाहीत; पण त्यांना सोनिया गांधींच्या तुलनेत केवळ सात टक्के मते कमी पडली. यावरून सुषमांचा ‘करिष्मा’ लक्षात येतो.

१९७७मध्ये वयाच्या २५व्या वर्षी त्या हरियाणा सरकारमध्ये सर्वांत तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. १९७९मध्ये त्या भाजपच्या हरियाणा राज्याच्या अध्यक्ष बनल्या. पुढे त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपदही काही काळासाठी भूषविले. सुषमा स्वराज जेव्हा भाजपच्या प्रवक्त्या बनल्या, तेव्हा देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या बनण्याचा मान त्यांना मिळाला. आउटस्टँडिंग पार्लमेंटॅरियन अॅवॉर्ड मिळालेल्या त्या देशातील पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत. असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. इंदिरा गांधींनंतर परराष्ट्र मंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 

महिलांचे अनेक विषय त्यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही मांडले. ‘भाजप’मधील पदांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय पक्षाने २००८मध्ये घेतला, त्यामागे सुषमा यांचे प्रयत्न होते. लालकृष्ण अडवाणींनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी उत्तमपणे कामगिरी सांभाळली. विशेषतः डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सरकारमध्ये अनेक घोटाळे उघडकीला आले होते, त्या वेळी सुषमा स्वराज यांची लोकसभेतील भाषणे गाजली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी केलेल्या भाषणात पाकिस्तान आणि तेथील दहशतवादाचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला होता. पाकिस्तानच्या कारवायांविरोधात कठोर भूमिका घेतली असली, तरी तेथील अनेक नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येण्याकरिता व्हिसा मिळवून देण्यातही त्यांनी मदत केली होती. त्यांचे वेगळेपण यातूनच दिसून येते. 

अॅमेझॉनवर भारतीय तिरंग्याचे चित्र असलेली पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आल्याची बाब त्यांना एकाने ट्विट करून सांगितली होती. त्या वेळी त्यांनी कॅनडातील दूतावासाने तातडीने अॅमेझॉनविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

नेते अनेक असतात; पण लोकनेते कमी असतात. सुषमा स्वराज या लोकनेत्या होत्या. कारण त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि साहजिकच त्यामुळे लोकांचेही अपार प्रेम त्यांना लाभले. हे प्रेम कोणत्याही अपेक्षेतून नव्हते, हेच त्याचे वैशिष्ट्य. त्यांचे विचार, त्यांचे अनेक निर्णय, त्यांनी केलेली ट्विट्स यांतून त्यांचे लोकांवरचे प्रेम दिसते. लोकांचे त्यांच्यावरचे प्रेम दर्शविणारेही अनेक दाखले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, काल जेव्हा सुरुवातीला सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी आली आणि नंतर ती डिलीट करून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी दाखवली जाऊ लागली. त्यानंतर, ‘ही बातमी खोटीच ठरो’ अशी प्रार्थना करणारे मेसेजेस सर्वत्र फिरू लागले. ‘त्यांचा देवलोकात येण्याचा व्हिसा कॅन्सल कर,’ अशा आशयाची ट्विट्सही काहींनी केली. 

तीन वर्षांपूर्वी जेव्हा सुषमा यांनी आपले मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याची आणि किडनीदात्याचा शोध सुरू असल्याची बातमी ट्विटरवरून दिली, तेव्हाही अनेक नागरिकांनी त्यांना किडनी देण्याची तयारी दाखवली होती. यवतमाळचे ज्येष्ठ नागरिक वसंतराव वाऱ्हेकर यांनी स्वतःची किडनी सुषमा यांना देण्याची इच्छा असल्याचे पत्र जिल्हाधिकारी, तसेच भाजपच्या अध्यक्षांना दिले होते. तमिळनाडूतील तेलुगू देसम पक्षाचे नेते रायपती संबाशिवा राव यांनीही तसेच पत्र सुषमा यांना लिहिले होते. सुषमा यांच्याविषयी लोकांच्या मनात किती आदर आणि किती प्रेम आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे. ‘इंडियाज बेस्ट लव्ह्ड पॉलिटिशियन’ अशा शब्दांत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने त्यांचा गौरव केला होता. 

देशावर, देशबांधवांवर निरतिशय प्रेम करून त्यांच्यासाठी कर्तव्यकठोरपणे जबाबदारी निभावणाऱ्या सुषमा स्वराज यांना आदरांजली!

(सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहण्यासाठी कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने केलेली कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search