पुणे : ‘पंजाबी पॉप’ गाण्यांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या हर्लीन सिंग या युवा गायकाने नुकतीच पुण्याला भेट दिली. त्याच्या ‘सुवाया कर ना’ या अल्बमचे प्रकाशन येथील म्युझिक्लब अॅकॅडमीमध्ये करण्यात आले.
या वेळी हर्लीन याने त्याची गाजलेली पंजाबी पॉप गाणी सादर केली. अॅकॅडमीच्या संचालिका श्रुती जाकती आणि त्यांचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. हर्लीनच्या ठेकेबाज पंजाबी पॉप गाण्यांनी रसिकांना मस्त ताल धरायला लावला.
हर्लीन सिंग आय. टी. इंजीनियर असून, त्याचा स्वतःचा ‘पंजाबी बॉईज’ नावाचा बँड आहे. चंदीगडच्या प्राचीन कला केंद्रातून संगीत विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या हर्लीनने सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचे बंधु ज्येष्ठ सूफ़ी गायक अमरजीत मेहंदी यांच्याकडून गायकीचे प्रशिक्षण घेतले असून, दिल्ली, पंजाबसह परदेशातही मेहंदी बंधूच्या समवेत गाण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हर्लीनची गाणी युवा वर्गात खूप लोकप्रिय असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘सुवाया कर ना’ गाण्याला सोशल मीडियावर लाखो लोकांनी पसंती दिली आहे.