Next
केदारची स्वप्नपूर्ती
BOI
Friday, October 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

केदार जाधव

खूप कमी वेळात भारतीय क्रिकेट विश्वात आपले स्थान निर्माण केलेला केदार जाधव आता भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा एक हुकमी खेळाडू बनला आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या क्रिकेटपटू केदार जाधवबद्दल...
...................
लहानपणापासून खेळात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न केदार जाधवने पाहिले होते. त्याचे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. कोल्हापूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला केदार सुरुवातीला टेनिस चेंडूने क्रिकेट खेळत असे. त्याचे वडील महादेव जाधव हे ‘एमएसईबी’मध्ये सेवेत होते. आई गृहिणी असून, केदारला तीन बहिणी आहेत आणि त्या तिघीही उच्चशिक्षित आहेत. असे मोठे कुटुंब असूनही केवळ शिक्षणातच न रमता खेळावरही लक्ष केंद्रित करण्याची केदारची वृत्ती आज त्याला एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण करण्यात मदत करत आहे. 

कोल्हापूरहून पुण्याला आल्यानंतर केदारने शिक्षणाबरोबरच पीवायसी क्लबमध्ये अधिकृतरीत्या क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहून २०१२मध्ये महाराष्ट्राच्या रणजी संघात त्याची निवड झाली. या मोसमात त्याने महाराष्ट्रातर्फे रणजी स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवताना उत्तर प्रदेशविरुद्ध ३२७ धावांची खेळी केली आणि यामुळे तो राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत आला.  २०१३-१४च्या रणजी मोसमात १२२३ धावा करून त्याने महाराष्ट्राला १९९२-९३नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठून दिली.

या मोसमातील त्याची कामगिरी पाहून, २०१४मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली. प्रत्यक्ष एकही सामना खेळायला मिळाला नसला, तरी त्या स्तरावरचा सराव आणि अनुभव त्याला नक्कीच मिळाला. त्यानंतर मात्र त्याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने २० चेंडूत आक्रमक २४ धावांची खेळी केली व संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यापुढील वर्षी झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना त्याने पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक केले. आतापर्यंत ४६ एकदिवसीय सामन्यांत त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके यांच्या जोरावर ८६८ धावा केल्या आहेत.  

पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सामन्यात त्याने केलेली १२० धावांची खेळी भारतीय संघाच्या विजयात मोलाची ठरली आणि इथूनच त्याचे संघातील स्थान बळकट होऊ लागले. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही मोक्याच्या क्षणी बळी मिळवत त्याने संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांबरोबरच त्याने ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्येदेखील  (आयपीएल) आपला ठसा उमटवला आहे. त्याने आजवर दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोची टस्कर, रॉयल चॅलेंजर बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळ केला आहे. बेंगळुरू संघाकडून खेळताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर महत्त्वाच्या वेळी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिले आहेत. क्रायसिस मॅनेजमेंट आपण उत्तम प्रकारे करू शकतो, हा विश्वास त्याने कोहलीला दिला आणि त्यामुळे कोहलीची त्याच्यावर मर्जी बसली. शिक्षणात केदार मोठी उंची गाठू शकला नसला, तरी खेळात मात्र एक विश्वासू आणि मोक्याच्या क्षणी कामगिरी करणारा हुकमी खेळाडू म्हणून तो नक्कीच यशस्वी ठरत आहे.  

केदार आज ३३ वर्षांचा असला, तरीही तंदुरुस्ती आणि चपळ क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर तो संघातील स्थान टिकवून आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. पुढील वर्षी होणारी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळणे आणि त्यात संघाच्या प्रत्येक विजयात महत्त्वाचा वाटा उचलणे, हेच त्याचे स्वप्न आहे.  

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search