Next
पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी राज्य महिला आयोगाची हेल्पलाइन
BOI
Saturday, March 10, 2018 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

सुहिता हेल्पलाइनचे उद्घाटन

मुंबई :
कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यांसारख्या अनेक प्रकारच्या अन्यायाला बळी पडणाऱ्या आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘सुहिता’ नावाची समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या कार्यक्रमात बोलताना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आयोगामध्ये लवकरच मानवी तस्करीविरोधात (ह्युमन ट्रॅफिकिंग) विशेष कक्ष सुरू करण्याची घोषणा केली.

संकटग्रस्त, अन्यायग्रस्त महिलांसाठी अतीव उपयोगी ठरू शकते, अशी समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित करण्याचा सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोगाच्या वांद्रे येथील मुख्यालयात पार पडला. हेल्पलाइनचे अनावरण अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. या हेल्पलाइनचा क्रमांक ७४७७७ २२४२४ असा आहे. हेल्पलाइन सुरू झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५५० कॉल आले. पहिला कॉल यवतमाळ जिल्ह्यातील महिलेने केला होता. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर‘महिलांसाठी विविध प्रकारच्या हेल्पलाइन आहेत; पण संकटकाळात, नैराश्येच्या गर्तेत असताना त्यांना धीर देणारी, त्यांचे समुपदेशन करणारी हेल्पलाइन देशात इतरत्र नसावी,’ असे सांगून विजया रहाटकर यांनी या हेल्पलाइनमुळे महिलांना उत्तम प्रकारची मदत आणि मार्गदर्शन मिळण्याची खात्री व्यक्त केली. ही हेल्पलाइन खऱ्या अर्थाने महिलांसाठी एक मैत्रीणच ठरेल, असा विश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त  केला आहे. राज्य महिला आयोगाकडे दररोज प्रत्यक्ष, पत्र आणि ई-मेलद्वारे १०० ते १२० तक्रारी येतात. राज्यभरातून महिलांना न्यायासाठी आयोग कार्यालयात यावे लागते; मात्र या नव्या हेल्पलाइनमुळे ही न्यायप्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.

या वेळी रहाटकरांनी आयोगाच्या भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये मानवी तस्करीविरोधातील तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आयोगामध्ये विशेष कक्ष स्थापन करणे आणि तस्करीच्या पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘आम्ही उद्योगिनी’ आणि संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था (यूएनडीपी) यांच्या मदतीने कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

पुस्तकांचे प्रकाशन

याच निमित्ताने ‘साद दे, साथ घे’ आणि ‘प्रवास सक्षमतेकडे’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांचे समुपदेशन करणाऱ्यांसाठी ‘प्रवास सक्षमतेकडे’ हे मार्गदर्शक पुस्तक तयार करण्यात आले आहे. आयोगाने यशस्वीपणे सोडविलेल्या २५ प्रकरणांची माहिती ‘साद दे.. साथ घे..’ या पुस्तकात देण्यात आली आहे.

आयोगाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचेही उद्घाटन या कार्यक्रमात झाले. या वेळी व्यासपीठावर ‘आम्ही उद्योगिनी’च्या मीनल मोहाडीकर, संयुक्त राष्ट्रसंघ विकास संस्थेच्या (यूएनडीपी) आफरीन सिद्दिकी, अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष, आयोगाच्या सदस्या विंदा कीर्तिकर, अॅड. आशा लांडगे आणि सदस्य सचिव डॉ. मंजूषा मोळावणे उपस्थित होत्या.

सुहिता हेल्पलाइनविषयी :

महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत आणि समुपदेशन मिळण्याची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेक वेळा एखाद्या प्रसंगात आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाच्यता कधी भीतीपोटी, तर कधी अज्ञानापोटी कुठे करत नाहीत. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुणाशी संवाद साधत नाहीत. त्यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण तर होतेच; शिवाय त्यांच्यावरच्या अन्या‍याला वाचाही फुटत नाही. म्हणूनच ‘सुहिता’ ही हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे.

क्रमांक : ७४७७७ २२४२४
वेळ : कार्यालयीन कामकाजाची वेळ.
भाषा : मराठी आणि हिंदी.

कार्यपद्धती : या हेल्पलाइनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचे म्हणणे ऐकून त्याबद्दल तिचे समुदपदेशन करण्यात येईल. तसेच तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाइनमार्फत ई-मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येणार आहे. ज्या महिलेने तक्रार केली आहे, तिला तिच्या मोबाइलवर तिकिट नंबर मेसेज केला जाईल, जेणेकरून त्याबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Darshana Jethe About
Excellent work Madam
0
0

Select Language
Share Link
 
Search