Next
आदिवासी भागांत साक्षरतेची चळवळ
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात १७ आदिवासी गावांत साक्षरता वर्ग सुरू
डॉ. अमोल वाघमारे
Friday, September 14, 2018 | 11:09 AM
15 0 0
Share this article:आंबेगाव :
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील १७ आदिवासी गावांत नवीन साक्षरता वर्ग सुरू होत आहेत. या साक्षरता प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच फलोदे येथे झाले. गेल्या वर्षात १० आदिवासी गावांत सुरू झालेल्या साक्षरता वर्गांतून १८० महिला-पुरुष साक्षर झाले होते. या नव्या वर्गांमुळे आदिवासी भागातील साक्षरतेची चळवळ आणखी पुढे नेण्यास मदत होणार आहे. फलोदे येथील शहीद राजगुरू ग्रंथालय आणि रोटरी क्लब यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला जात आहे. 

आंबेगाव तालुका आदिवासीबहुल आहे. या तालुक्यातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यात मुख्यतः आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. हा समाज डोंगर-दऱ्या-खोऱ्यांत व निसर्गाच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे खडतर जीवन जगत आहे. आदिवासी समाजाची संस्कृती व त्या संस्कृतीची मूल्ये नक्कीच सर्व समाजाला अनुकरणीय अशीच आहेत.

सांस्कृतिकदृष्ट्या हा समाज अत्यंत पुढारलेला असताना अनेक मूलभूत सुविधांची येथे कमतरता आहे. यामागची कारणे अनेक असली, तरी महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. त्यामुळे या भागात निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. निरक्षरता आणि दारिद्र्य यांचा निकटचा सबंध आहे. हे ओळखूनच येथे साक्षरता चळवळ सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षात एकूण १० गावांत साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले होते. या १० वर्गांच्या माध्यमातून १८० महिला-पुरुष साक्षर झाले होते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १७ आदिवासी गावांत नवीन साक्षरता वर्ग सुरू होत आहेत.

या साक्षरता प्रकल्पाचे उद्घाटन ११ सप्टेंबर २०१८ रोजी फलोदे गावातील शहीद राजगुरू ग्रंथालयात झाले. रोटरी क्लब मेट्रो, कोथरूड, निगडी, इनरव्हील जेनेक्स निगडी, शिवाजीनगर, पाषाण, मंचर, पुणे इलिट यांच्या सहकार्यातून आणि स्थानिक पातळीवर आदिम संस्कृती अभ्यास व संशोधन केंद्र आणि शहीद राजगुरू ग्रंथालय या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हे १७ साक्षरता वर्ग सुरू होत आहेत.

उद्घाटनावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकारी श्रीमती नूतन बनकर, श्रीमती अंजली सहस्रबुद्धे, श्रीमती भावना चाकोरे, ऋतुजा देसाई, सचिन चिखले, सचिन बांगर, उज्ज्वल तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. फलोदे गावाचे माजी सरपंच अशोक पेकारी, सामाजिक कार्यकर्ते राजू घोडे, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, गणेश काटळे, रोहिदास गभाले यांच्यासह परिसरातील साक्षरता वर्गाच्या स्वयंसेविका, नवसाक्षर महिलाही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

‘रोटरी क्लब, कोथरूड’च्या अध्यक्षा श्रीमती नूतन बनकर यांनी या प्रकल्पाचे स्वागत करून, ‘हा साक्षरता प्रकल्प या भागाच्या विकासात नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडेल,’ असा आशावाद व्यक्त केला. मंचर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन बांगर यांनी ‘या भागात साक्षरता प्रकल्प जागृतीचे काम मोठ्या प्रमाणात पार पाडत आहे,’ असे नमूद करून ‘अधिकाधिक आदिवासी गावांत साक्षरता वर्ग सुरू झाले पाहिजेत,’ याकडे लक्ष वेधले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search