Next
भाजीविक्रेत्या आशाबाईंचा मुलगा झाला सीए
नारायण केंद्रे याची प्रेरणादायी भरारी
BOI
Friday, August 03, 2018 | 04:00 PM
15 2 0
Share this article:

नारायण केंद्रेपुणे/लातूर : ‘मंज़िल उन्हीं को मिलती है, जिन के सपनों में जान होती है! पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है!’ या वाक्याला साजेल अशी कामगिरी लातूरमधील एका छोट्या गावातील नारायण केंद्रे याने केली आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विकून परिस्थितीशी दोन हात केले. त्याने स्वतःही आईला भाजीविक्रीत मदत केली. आईच्या कष्टांचे चीज होण्यासाठी खूप मोठा होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झटला. जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर तो आज चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनला आहे. पुण्यातील विद्यार्थी सहायक समितीचाही आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे नारायण सांगतो.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी हे नारायणचे मूळ गाव. त्याचे वडील बाबूराव केंद्रे यांचे १९९७मध्ये निधन झाले. नारायण त्या वेळी अवघ्या पावणेदोन वर्षांचा होता. पतीच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आशाबाई यांच्यावर येऊन पडली. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अहमदपूर येथील मंडईत भाजीपाला विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचे भाजीचे दुकान आजही सुरू आहे. नारायण स्वतःही बारावी होईपर्यंत भाजीपाला विक्रीच्या दुकानावर आईला मदत करायचा. 

नारायणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अहमदपूरच्या रवींद्रनाथ टागोर विद्यालयात झाले. दहावीत त्याला ६७ टक्के गुण मिळाले. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेतील पुढील शिक्षण अहमदपूरच्याच महात्मा गांधी महाविद्यालयात घेतले. बारावीत त्याला ८५ टक्के गुण मिळाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला आला. ‘बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये त्याने प्रवेश घेतला. पुण्यातील विद्यार्थी सहायक समितीचा त्याला आधार मिळाला. त्याने एम. कॉम पूर्ण केले. तसेच अकाउंट्स या विषयात ‘नेट’ परीक्षाही तो उत्तीर्ण झाला. आपली गरिबीची परिस्थिती बदलण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्याने सीए होण्यासाठी अभ्यास केला. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने यश मिळवले आणि तो सीए झाला. ग्रामीण भागात राहूनही प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता, जिद्दीने यशाचे शिखर गाठणारा नारायणची वाटचाल तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. समाजाच्या सर्व स्तरांतून नारायणवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

आशाबाई केंद्रे

‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याच्या प्रयत्नांची गोष्ट अधिक विस्ताराने उलगडली. तो म्हणाला, ‘सीए होणे सगळ्यात कठीण असते, असे शिक्षकांनी म्हटले होते. त्यामुळे आपण ‘सीए’च व्हायचे, असे मी ठरवले होते. बीएमसीसी कॉलेजातून बी. कॉम., एम. कॉम झाल्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण झालो. त्या वेळी घरच्यांनी ‘आता शिक्षण पुरे झाले, चांगली नोकरी कर’ असा आग्रह धरला होता; पण माझा निश्चय ठाम होता. त्यामुळे घरातून मिळणाऱ्या थोड्याशा पैशात माझा खर्च भागवत मी अभ्यास करत होतो. खूप काटकसरीने राहायचो. त्यातूनही कधी लवकर पैसे घरून आले नाहीत, तर मित्रांकडून थोडीफार उधार-उसनवार करायचो. सीए होण्यासाठीची परीक्षा अत्यंत कठीण असते. त्यात पहिल्या खेपेला मला यश मिळाले नाही; मात्र तेव्हा निराश न होता दुसरा प्रयत्न करायचा निर्णय मी घेतला; पण दुसऱ्या वेळीही यशाने हुलकावणी दिली. तिसऱ्या वेळेला मात्र मी यशाला गवसणी घातली.’ 

‘माझे स्वप्न साकार झाले याचा खूप आनंद आहे. आता मी पुण्यासोबतच माझ्या गावी लातूरलाही ‘सीए’ची प्रॅक्टिस करणार आहे. माझ्या या यशात माझ्या आईचे सर्वाधिक योगदान आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या धीराने केलेला संघर्ष लहानपणापासून पाहत आलो आहे. त्याची जाणीव ठेवून नेहमी चांगले काहीतरी करण्याची जिद्द मनाशी होती. माझे गुरू, मित्र या सगळ्यांचाही या यशात वाटा आहे,’ असेही नारायणने आवर्जून नमूद केले. ‘२०१३ ते २०१५ या कालावधीत विद्यार्थी सहायक समितीत असताना अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याचा फायदा सीए करताना झाला,’ असेही नारायणने सांगितले. 

‘पतीच्या निधनानंतर तीन मुलांना वाढवण्यासाठी आजवर जे कष्ट उपसले त्याचे फळ आता मिळाले आहे. नारायणने मिळवलेले यश हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. मी केलेल्या कष्टांचे त्याने चीज केले याचे समाधान आहे,’ अशी भावना आशाबाईंनी व्यक्त केली.

संपर्क : नारायण केंद्रे - ७५०७२ ७५८७५

(नारायण केंद्रे याच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search