मूल वयात येताना त्याच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांबरोबरच त्याच्यातील मानसिक बदलांचाही विचार केला गेला पाहिजे. असं केलं, तरच त्याच्यात या काळात होणाऱ्या बदलांचे योग्य अर्थ उमगतील आणि पालकांच्या मनातील कोडी सुटण्यास मदत होईल... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या, वयात आलेल्या मुलांच्या वर्तनाबद्दल...
.......................
रोहनला घेऊन त्याचे वडील स्वत:हून भेटायला आले होते. आल्यावर आधी त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. ते सीए असून, स्वत:ची फर्म चालवत होते. त्यांची फर्म बरीच जुनी आणि प्रसिद्ध होती. रोहन हा त्यांचा धाकटा मुलगा. ते त्यांची पत्नी, रोहन आणि त्याची मोठी बहीण असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. रोहनची आई गृहिणी होती, तर बहीण कॉलेजमध्ये शिकत होती.

रोहन तसा हसरा, खेळकर होता. चेष्टा-मस्करी करायला, हसायला, हसवायला त्याला खूप आवडायचं. त्याच्या याच स्वभावामुळे तो आता अकरावीत असला, तरी त्याचे अगदी पहिलीपासूनचे मित्र-मैत्रिणी अजूनही त्याच्या संपर्कात होते. अधून-मधून भेटून ते सगळे धम्माल करायचे. त्यात रोहनचा पुढाकार असायचा. तो सगळ्यांचाच लाडका होता. तो हसरा खेळकर असला, तरी तेवढाच हळवादेखील होता. कधीकधी एखादी गोष्ट त्याच्या मनाला पटकन लागायची आणि लगेचच त्याच्या डोळ्यांत पाणी यायचं. त्याला लगेच वाईट वाटायचं, एवढं सांगून बाबा थांबले. तसा रोहन निघण्यासाठी घाई करू लागला. तो खूप घाबरलेला वाटला. म्हणूनच तो घाई करत होता. समजावून सांगूनही तो थांबण्यास तयार होईना. त्यामुळे त्याला न अडवता त्यांना जायला सांगितलं. पुढील सत्रात त्याच्या वडिलांना एकटंच येण्यास सांगितलं. त्याप्रमाणे ते आले आणि रोहनबद्दल जास्तीची माहिती सांगू लागले.
‘गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रोहनच्या वागण्यात खूपच बदल झालाय. त्याचा हसरा, खेळकर स्वभाव हरवूनच गेलाय. हल्ली तो सारखा एकटा एकटा राहतो. गप्पच असतो. घरात कोणाशीही नीट बोलत नाही. मित्रांमध्ये मिसळत नाही. मैत्रिणींशी, बहिणीशी तर त्यानं बोलणंच सोडून दिलंय. त्याला काय झालंय काहीच समजत नाही. आम्हाला वाटत होतं, की त्याला चुकीची संगत वगैरे लागली की काय? पण तसंही काही नाही. आम्ही विचारण्याचा खूप प्रयत्न केला; पण तो काहीच बोलायला तयार नाही. आम्हाला रोहनची खूपच काळजी वाटायला लागली आहे हो.’ हे सगळं सांगताना रोहनच्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते थोडे शांत झाल्यावर त्यांना या सगळ्यांत रोहनबद्दल आणखी काही वेगळी माहिती विचारली व पुढील सत्रासाठी येताना रोहनला घेऊन येण्यास सांगितलं. सुरुवातीची एक-दोन सत्रं अर्थातच रोहन फारसं काही बोलला नाही; पण हळूहळू त्याला विश्वास वाटू लागला तसा तो बोलता झाला.

मी त्याच्याशी खेळकर पद्धतीनं बोलत असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं मला एक गोष्ट सांगायचं ठरवलं. परंतु त्याआधी ती गोष्ट मी कोणालाही सांगू नये, असं माझ्याकडून वदवून घेतलं. तो बोलू लागला. रोहन त्याच्या मित्रांबरोबर बाहेर गेला होता. त्यानं बराच विरोध करूनही त्याच्या मित्रांच्या आग्रहाला बळी पडून त्याने काही पॉर्न साइट्स पाहिल्या. त्याला ते सगळं खूप विचित्र, घाणेरडं आणि अयोग्य वाटलं. तो मनानं हळवा असल्याने ती गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली. आधीच वयात येताना त्याच्यातील सर्व प्रकारच्या नैसर्गिक बदलांमुळे त्याला निर्माण झालेलं आकर्षण आणि त्यात मित्रांच्या जबरदस्तीमुळे पडलेली भर, या दोन्ही कारणांमुळे त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळेच एकाएकी त्याचं वागणं बदललं.

ही समस्या लक्षात आल्यावर रोहनच्या नकळत त्याच्या आई-वडिलांना याची कल्पना दिली. समस्या समजल्यावर प्रथम वडिलांना राग अनावर झाला. परंतु सत्रात झालेल्या चर्चेमुळे त्याची कारणं आणि परिणाम याची त्यांना जाणीव झाली आणि अर्थातच तो राग हळूहळू निवळला. त्यानंतर त्यांना रोहनशी घरात कसं वागावं, त्याच्यातील बदलांना सामोरं जाण्यास त्याला कशी व कोणती मदत करावी ते सांगितलं. हे सहकार्य करण्याची त्यांनी पूर्ण तयारी दाखवली. रोहनलाही सत्रादरम्यान त्याच्यामध्ये होणारे बदल, त्यामागील कारणं, वाटणारं आकर्षण व त्यामागील कारणं यांची सविस्तर माहिती दिली.
वयात येणं म्हणजे नक्की काय, त्याला कसं सामोरं जायचं, यासाठीचे छोटे छोटे उपाय आणि त्याबाबतची सविस्तर माहिती रोहनला दिली. त्यामुळे त्याच्या मनातील अपराधी भावना कमी होत गेली आणि स्वत:मधील या नव्या बदलाला तो यशस्वीपणे सामोरं जाऊ शकला.
- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)