Next
मॉरिशसमध्येही घुमतोय हरिनामाचा गजर
सात जुलैपासून १२ जुलैपर्यंत आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन
BOI
Wednesday, July 10, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
आषाढी एकादशी जवळ आली असल्यामुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी वारीचा आणि हरिनाम सप्ताहांचा माहौल आहे. हेच भक्तिभावाचे वातावरण मॉरिशसमधील मराठी बांधवांनाही अनुभवायला मिळते आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने त्यांनी आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन केले असून, सात जुलैला सुरू झालेला हा महोत्सव १२ जुलैपर्यंत चालणार आहे.  

मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे भारतातील समन्वयक दीपक दळवी यांनी ही माहिती दिली आहे. मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी स्पीकिंग युनियन या संस्था या महोत्सवाच्या मुख्य आयोजक असून, कास्कावेल येथील मराठी प्रेमवर्धक मंडळी, वाकवॉ येथील श्री मराठी धार्मिक सभा, मरेदी अल्बर्ट येथील मराठी उपकारी सभा, ग्लेन पार्क येथील मराठी कल्चरल सर्कल भवानी मंदिर, ब्यू बसीन येथील विनायक मंदिर या संस्था सहआयोजक आहेत. 

मॉरिशसमधील कास्कावेल येथे १२२ वर्षे जुने विठ्ठल-रखुमाईचे प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराला पंढरपूर पांडुरंग क्षेत्र मंदिर म्हटले जाते. गेली १२२ वर्षे या ठिकाणी विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम साजरे केले जातात. मॉरिशसमधील मराठी माणसे मोठ्या श्रद्धेने या मंदिरात येतात. याच भावनेतून या वर्षी आषाढी एकादशीचे निमित्त साधून सहा दिवसांच्या आषाढी हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे दळवी यांनी सांगितले. या सहा दिवसांत १०८ विठ्ठल भजने, पालखी सोहळा, भव्य कार रॅली, हरिपाठ, आरती, महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांची आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हरिनामाचा गजर करत वारीमध्ये सहभाग घेणारा प्रत्येक जण स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असतो. हाच आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी आणि महाराष्ट्राची परंपरा जतन करण्यासाठी मॉरिशसमधील मराठी मंडळी त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. म्हणूनच हा आषाढी हरिनाम महोत्सव जसा मॉरिशसमधील मराठी लोकांसाठी खास आहे, तसाच महाराष्ट्राच्या लोकांसाठीही ती अतिशय अभिमानाची-कौतुकाची घटना आहे. 

आषाढी एकादशीचे औचित्य साधून सहा दिवस वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि तेही भारतापासून सहा हजार किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या देशात, ही बाब महाराष्ट्राच्या उज्ज्वल संस्कृतीमध्ये भर घालणारी आहे. मॉरिशसमध्ये श्री महादेवाच्या भव्य मूर्तीसह तेरावे ज्योर्तिलिंग असलेले मंदिर, राधा-कृष्ण, साईबाबा अशी अनेक मंदिरेही आहेत. त्या मंदिरांमधून नित्यनेमाने विधिवत उपक्रम राबविले जातात.जगाच्या पाठीवर भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सण-उत्सव मोठ्या प्रमाणात अतिशय भक्तिभावाने साजरा करणारा देश म्हणजे मॉरिशस. सुमारे ७० टक्के मूळ भारतीय लोकसंख्या असलेल्या मॉरिशस या निसर्गाचे लेणे लाभलेल्या देशात गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून भारतातील रुढी-परंपरा-संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. या लोकांवर दैनंदिन जीवनात जरी फ्रेंच संस्कृतीचा पगडा असला, तरी मूळ भारतीय असणारी ही मंडळी गुढीपाडवा, गणेशोत्सव, महाशिवरात्र, दिवाळी आदी सणांबरोबरच आषाढी एकादशी, महाराष्ट्र दिन, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट असे सर्व प्रकारचे सण-उत्सव साजरे करत असतात. या निमित्ताने मॉरिशसमधील ही मंडळी एकत्र येऊन आपला आनंद-समाधान मिळवतात, तसेच मातृभूमीशी असलेले नाते टिकविण्याचा प्रयत्न करतात. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chavanrao AMBAJEE About 102 Days ago
Can i have English version please.
0
0

Select Language
Share Link
 
Search