Next
वेल्लोरची सफर
BOI
Wednesday, June 06, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

वेल्लोरचा किल्ला
‘करू या देशाटन’ या सदरात वेळी करू या वेल्लोरची सफर... येथील किल्ला, सुवर्णमंदिर आणि आणखी बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत...
...........
वेल्लोर हे नाव तमिळमधील वेळ (म्हणजे भाला) + उर (म्हणजे शहर) या शब्दांपासूनच बनले आहे. त्यामुळे या नावाचा अर्थ भाल्यांचे शहर म्हणजेच युद्धाचे ठिकाण किंवा रणांगण असा आहे.

साधारण इ. स. ९००पासून याचा संदर्भ दिसून येतो. तिरुवन्नमलाई येथील शिलालेखात वेल्लोरचा प्रथम उल्लेख दिसून येतो. पल्लव, चोला, राष्ट्रकूट, तसेच विजयनगर या राजवटी या गावाने पहिल्या. विजयनगरनंतर मुघल सत्ता आली. १६७७मध्ये वेल्लोरचा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. जिंजीच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे लक्ष वळविले. बेलाग बुरुज आणि बळकट तटबंदीमुळे हा किल्ला अभेद्य समजला जाई. किल्ल्याच्या बाजूने खंदकात सदैव पाणी असायचे आणि त्यात मगरी-सुसरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे हा दुर्ग अजिंक्य मानला जायचा. इसवी सन १६७७च्या मे महिन्यात शिवाजी महाराजांनी वेल्लोरला वेढा घातला. अब्दुल्लाखान नावाच्या एक हबशी किल्लेदाराने निकराने किल्ला लढविला. वेल्लोरच्या जवळ दोन टेकड्या आहेत. त्यावर साजिरा-गोजिरा अशी मराठमोळी नावे देऊन टेहळणी व माऱ्याची दोन ठिकाणे तयार करण्यात आली. या दोन ठिकाणांवरून मराठी फौजा तोफांची सरबत्ती करू लागल्या. त्याचे नेतृत्व मराठा सरदार नरहरी रुद्र यांच्याकडे होते. सिद्दी अब्दुल्लाखान अखेरपर्यंत लढत राहिला. किल्ल्यात साथीचा रोग पसरल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. रघुनाथपंत हनुमंते व नरहरी रुद्र यांनी ही संधी साधली. २२ जुलै १६७८ रोजी ५० हजार होन देऊन मराठ्यांनी वेल्लोरवर भगवा जरीपटका फडकवला. अशा प्रकारे शिवाजीराजांनी फारसे रक्त न सांडता दक्षिणेत आपले अस्तित्व निर्माण केले.

वेल्लोर ही विजयानगरची शेवटची राजधानी. १६७८ ते १७०७पर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला. १७१०मध्ये अर्काटच्या नबाबाने किल्ला ताब्यात घेतला. नबाबाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. सध्याही त्यांचे वंशज तेथे राहत आहेत. त्यांना नबाब म्हणूनच ओळखले जाते. त्यानंतर प्लासीच्या लढाईवेळी हा किल्ला ब्रिटिशांकडे आला.

या किल्ल्यामध्ये भारतीय राजघराण्यातील बंदिवान व्यक्तींना ठेवले जात असे. श्रीलंकेचा राजा विक्रमसिंघे यालाही येथे १५ वर्षे कैदेत ठेवण्यात आले होते. टिपू सुलतानची आई, मुलगी, पत्नी, मुलगा यांनाही येथे कैदेत ठेवण्यात आले होते.

१३० एकर क्षेत्रावरील वेल्लोर किल्ला हा जगातील उत्तम किल्ल्यांपैकी एक गणला जातो. येथील खंदकात एक हजार मगरी भक्ष्याची वाट बघत असत. या किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम ग्रॅनाइटमध्ये केलेले आहे. किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एका भुयाराची निर्मितीही करण्यात आले होती, असे सांगण्यात येते; मात्र असे काही भुयार आजवर सापडलेले नाही.

आज वेल्लोर हे मिरजप्रमाणे वैद्यकीय सुविधा केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे अनेक हॉस्पिटल्स आहेत. वेल्लोरमध्ये अनेक रासायनिक उद्योग आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, सॅनिटरी वेअर निर्मिती असे अनेक उद्योग तेथे आहेत.

जलकंदेश्वर मंदिरजलकंदेश्वर मंदिर : हे वेल्लोर किल्ल्यातील एक आकर्षण. विजयनगर राजवटीत याची उभारणी झाली. अत्यंत सुबक शिल्पकला तेथे पाहावयास मिळते. माझ्या स्नेही आरती लांजवाल माझ्याशी चर्चा करून नुकत्याच वेल्लोर येथे जाऊन आल्या. त्यांनी त्या भेटीत जलकंदेश्वर मंदिर व किल्ल्याचे काही फोटो काढले असून, ते या लेखात वापरले आहेत.

विजयनगरच्या सदाशिव देवरायाच्या आधिपत्याखाली चिन्ना नायक या किल्लेदाराने येथील सुंदर मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या सभागृहातील खांब शिल्पकलेने नटलेले आहेत. त्यांचे सौंदर्य आजही डोळ्यांचे पारणे फिटविते. मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. १९२१मध्ये ब्रिटिशांनी हे मंदिर पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केले.
श्रीपुरमचे सुवर्णमंदिरश्रीपुरमचे सुवर्णमंदिर : २००७मध्ये बांधलेले श्रीपुरमचे सुवर्णमंदिर हे येथील मुख्य आकर्षण. हे श्री महालक्ष्मीचे मंदिर असून, ते वेल्लोरपासून आठ किलोमीटर अंतरावर हे आहे. १५०० किलो सोने वापरून हे मंदिर सुशोभित करण्यात आले आहे. श्रीचक्र आकृतीत (ताराकृती) १. ८ किलोमीटर लांबीचा सुंदर प्रदक्षिणा मार्ग येथे आहे. मंदिर परिसरातच श्री नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. अमृतसर येथील सुवर्णमंदिर हे उत्तरेतील आकर्षण आहे, तर श्रीपुरमचे सुवर्णमंदिर हे आता दक्षिणेतील आकर्षण आहे. १०० एकरावर पसरलेल्या या मंदिराच्या प्रांगणात नेत्रदीपक अशी सजावट आहे. सुंदर पदपथ, बाजूला हिरवेगार लॉन असल्यामुळे अजिबात थकायला होत नाही. संध्याकाळी जेव्हा विजेचे दिवे लागतात, तेव्हा मंदिर सोन्याने लखलखते आणि डोळ्यांचे पारणे फिटते. जणू स्वर्ग जमिनीवर अवतरला आहे, असे भासते. दक्षिण भारतातील हे एक आकर्षक धार्मिक व पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. सुवर्णमंदिरात मोबाइल, कॅमेरा नेता येत नाही. बाहेर ऑफिसमध्ये जमा करावा लागतो.

अर्काटअर्काट : हे गाव झुफिरखानाला औरंगजेबाने बक्षीस म्हणून दिले होते. तसेच ते युद्धभूमी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. कर्नाटकचा नबाब अनवरुद्दीन याने मराठा सरदाराकडून इ. स. १७१२मध्ये हे गाव जिंकून घेतले. १७५१मध्ये रॉबर्ट कलाइव्हने ते फ्रेंचांकडून ताब्यात घेतले. अर्काट येथे सूफी संत टिपू मस्तान अवलिया यांची कबर आहे. अनेक मुस्लिम यात्रेकरू येथे येत असतात. त्यांच्या आशीर्वादाने हैदरअलीला मुलगा झाला. म्हणून त्याचे नाव टिपू सुलतान ठेवण्यात आले. डॅनिश मिशनचे जुने चर्चही येथे आहे.

येथे वरदराज पेरुमल मंदिरही असून, ते पल्लव राजवटीत बांधले गेले होते. त्याशिवाय येथे आणखीही अनेक हिंदू मंदिरे आहेत. या गावात कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे.

एलागिरी/येलागिरी : हे सहलीचे एक सुंदर ठिकाण आहे. पूर्व घाटातील तीन हजार फूट उंचीवरील हे ठिकाण चेन्नईजवळ असून, एका दिवसात तेथे जाऊन येता येते. येथे सुंदर तलाव असून, पदभ्रमंती करणाऱ्यांसाठी ही जागा छान आहे.

कवलूरअमिरथी वन : हे वेल्लोरजवळील झुऑलॉजिकल पार्क आहे. तेथे एक धबधबाही आहे.

जलगमपरी प्रपात : हा धबधबा पाहण्यासारखा असून, या धबधब्याजवळच मुरुगन मंदिर आहे.

कटपाडी : हे रेल्वे जंक्शन आणि शैक्षणिक ठिकाण आहे.

कवलूर : येथे भारतीय हवामान खात्याची ‘वेणू बापू’ या नावाची वेधशाळा आहे.

जलगमपरी प्रपातवेल्लोर जिल्हा चेन्नईजवळच आहे. चेन्नईच्या जवळील अर्रकोणम हे एक जंक्शन याच जिल्ह्यात आहे. चेन्नई ट्रिपमध्ये कांचीपुरमसोबत ही ठिकाणे घेता येतील. या जिल्ह्याला लागूनच पुदुच्चेरी आहे. जवळचा विमानतळ चेन्नईला असून, कटपाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन सात किलोमीटरवर आहे. येथे चेन्नईवरून बसनेही जाता येते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी आहे. वेल्लोर, अर्काट येथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते. वेल्लोरहून चेन्नई १३५ किलोमीटरवर असून, बेंगळुरू २१० किलोमीटरवर आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

श्रीपुरमचे सुवर्णमंदिर

(वेल्लोर किल्ला, सुवर्णमंदिर तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About 334 Days ago
माहितीपूर्ण लेख!
1
0
वसंत लांडगे About
वेल्लोरची माहिती चित्तवेधक आहे.दक्षिण भारतात शिल्पकार खूप विकसित झाली होती.अप्रतिम नमुने पहायला मिळतात. धन्यवाद.
1
0
मोहन कुलकर्णी About
खूप छान वर्णन आणि माहिती! भाषा सौंदर्य छान!😊
1
0
जयश्री चारेकर About
सुंदर माहिती . सुवर्ण मंदिर व परिसर अप्रतीम आहे.
1
0
Shreyas Joshi About
सुंदर माहिती👌
1
0
Milind Lad About
Beautiful journey description with historical references assist with nice photos n video. Madhavji great efforts.
0
1

Select Language
Share Link
 
Search