Next
‘यू-ट्यूब चॅनेलद्वारे प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी’
प्रा. क्षितिज पाटुकले यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, April 18, 2019 | 01:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘सोशल मीडियाच्या युगात आपली सर्जनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलेब्रिटी बनण्याची संधी यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे’, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, यू-ट्यूबर आणि ‘साहित्य सेतू’चे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले. 

‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ने आयोजित केलेल्या लेखक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी ‘यू-ट्यूब चॅनेलची उपयुक्तता’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह बंडा जोशी आणि शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

‘तंत्रज्ञानाने लाखो तरुणांना डिजिटल मीडिया व्यापण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे तयार होत आहेत. लेखक, कवी, प्रकाशक, कलाकार आणि ज्यांच्याकडे कोणत्याही निर्मितीची व सादरीकरणाची किमान क्षमता आहे अशी व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून त्याच्याकडे एक साधन आणि शस्त्र म्हणून पाहणे ही काळाची गरज आहे. स्मार्टफोनचा कल्पक उपयोग करून आज कित्येक युवक-युवती यू-ट्यूबच्या माध्यमातून उत्तम कमाई करताना दिसतात. यू-ट्यूबचे माध्यम हे आपल्या क्षमतांची परिणामकारकता वाढविण्यासाठी पूरक आणि सहाय्यक आहेत’, असे प्रतिपादन क्षितीज पाटुकले यांनी केले. 

यू-ट्यूब चॅनेल साठी सबस्क्रायबर व व्ह्यूज यांचा गुणाकार कसा करायचा याचे कोडेही पाटुकले यांनी उलगडून दाखवले. पुढे ते म्हणाले, ‘भविष्यातील भारतासाठी उपयुक्त सामाजिक साक्षरतेचे साधन म्हणून यू-ट्यूब चॅनलचा प्रभावी वापर करता येऊ शकेल. सध्या यू-ट्यूब चॅनलवर स्टँड-अप कॉमेडी व करमणुकीच्या कार्यक्रमांची चलती आहे. मात्र त्याचबरोबर लहान मुले, युवक, शेतकरी, कामगार, गृहिणी, नेते, प्राध्यापक, लोकसाहित्यिक, ग्रामीण कलाकार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, गायक, नर्तक, कवी, व्याख्याते, संगीतकार, चित्रकार यांनादेखील यू-ट्यूब चॅनेल सुरू करता येऊ शकते. त्याचबरोबर विविध संस्था, महाविद्यालये, कंपन्या, लोकसमूह यांनादेखील यू-ट्यूब चॅनेलद्वारे विविध संधी निर्माण झाल्या आहेत.’

एकदाच निर्मिती, निरंतर उत्पन्न आणि कमाई थेट आपल्या बँक खात्यात जमा, ही यू-ट्यूब चॅनेलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. हे सांगताना पाटुकले यांनी यू-ट्यूब चॅनलद्वारे कमाई करणाऱ्या ‘रायन’ या अमेरिकेतील आठ वर्षे वयाच्या मुलाचे उदाहरण दिले. तसेच मधुरा रेसिपी, भाऊचा धक्का, विष्णू वजार्डे, संदीप यादव या यू-ट्यूब चॅनेलची उदाहरणे दिली. टू-जी पासून फाईव्ह-जी पर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास व नोकियाच्या हँडसेट पासून आधुनिक आयफोनसारख्या स्मार्टफोनची वाटचालही त्यांनी विषद केली. यू-ट्यूब चॅनेलचे आर्थिक गणित उलगडून दाखवताना चॅनेल निर्मितीसाठी घ्यावी लागणारी काळजी व सावधानता यावरही त्यांनी भाष्य केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सोशल मीडिया व यू-ट्यूबद्वारे ग्रामीण व विदेशातील मराठी बांधवांना महाराष्ट्र साहित्य परिषदेशी कसे जोडले आहे त्याचा वस्तुपाठ सादर केला. कार्यक्रमाला लेखक-प्रकाशक आणि युवकांनी गर्दी केली होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search