Next
‘इंग्लिश मीडियम शाळेला एम. एन. जोशी सरांचे नाव’
BOI
Friday, February 01, 2019 | 12:25 PM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमात बोलताना अॅड. बाबा परुळेकर

रत्नागिरी :
 ‘एम. एन. जोशी सर म्हणजे चालताबोलता शब्दकोश होते, संगीतप्रेमी होते. एकंदरच त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. ते शेवटपर्यंत शाळेसाठी कार्यरत होते. त्यामुळे शाळा हेच त्यांचे खरे स्मारक. त्यामुळेच संस्थेच्या इंग्लिश मीडियम शाळेला त्यांचे नाव दिले जाणार आहे,’ अशी घोषणा दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी केली. इंग्लिश मीडियम शाळेत जोशी यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम नुकताच झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी जोशी यांचे नातेवाईक वसंत बर्वे, विजया बर्वे, मुकुंद केळकर, संस्थेच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, सीए श्रीरंग वैद्य, अॅड. विनय आंबुलकर उपस्थित होते. 



परुळेकर म्हणाले, ‘जोशी सर म्हणजे चालत बोलता शब्दकोश. त्यांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटक, तबलावादनात रुची होती. संस्कृत काव्य कशी वाचावीत, हे ते प्रत्येकाला सांगत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या ‘सप्तबंदी’चे त्यांनी मराठी, इंग्रजीत भाषांतर केले. ते स्मारकात कोरून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नावाने शाळा मानांकित होणार आहे. वयाच्या ८९-९०व्या वर्षीसुद्धा ते भर दुपारी मारुती मंदिरपासून झाडगावपर्यंत चालत आले होते. प्रत्येक गोष्टीची अनुभूती महत्त्वाची असे ते सांगायचे. ते संस्थेचे सीईओ होते. शाळेच्या अंकांचे संपादक होते. फाटक हायस्कूलच्या अटल टिंकरिंग लॅबचा उद्घाटन सोहळा हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला.’

संस्थेच्या सचिव दाक्षायणी बोपर्डीकर म्हणाल्या, ‘आम्ही विद्यार्थी असताना शिक्षकांचा ५४ दिवस संप झाला. होता. त्या वेळी दहावीचा अभ्यासक्रम जोशी सर व अन्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी बोलावून पूर्ण करून घेतला. त्याही काळात त्यांच्यावर टीका झाली; पण विद्यार्थ्यांसाठी त्यांची अपार मेहनत आजच्या शिक्षकांनी घेण्यासारखी आहे. प्रत्येक गोष्ट करण्यामागे शाळेसाठी योगदान हा त्यांचा हेतू असायचा. त्यांचे हस्ताक्षर सुरेख होते. शिक्षकाच्या आयुष्यात फक्त विद्यार्थी महत्त्वाचे असतात, हे तत्त्व ठेवूनच ते काम करायचे. आजच्या शिक्षकांनी जोशी सरांचा आदर्श ठेवावा.’

वसंत बर्वे म्हणाले, ‘मामाबद्दल खूप आठवणी आहेत. मामा वर्षातून दोन-तीन दिवस आमच्या घरी यायचा तो सुकामेवा घेऊन. अंगात कायम पांढरा पायजमा व सदरा हाच वेश असायचा. शेक्सपीअर व महाकवी कालिदासावर बोलायला त्यासा आवडायचे. त्याचा अभ्यास सर्वगामी असायचा. मी त्याचा विद्यार्थी नसलो, तरी माझी बहीण याच शाळेत विद्यार्थिनी होती. म्हणून मला शिकव असे मी मामाला सांगायचो. मग मामाने मला इंग्लिश व्याकरणातील ‘जिरंड’ हा प्रकार शिकवला.’

मुकुंद केळकर यांनीही जोशी सरांच्या अनेक आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. कोणतेही काम स्वतः शिकून करण्याची त्यांची हातोटी होती. एकदा त्यांनी गवंड्याकडून ओटीवरची लादी कशी घालतात, हे निरीक्षणाने शिकून घेतले आणि काही महिन्यांत घरातील सर्व लाद्या त्यांनीच घातल्या. त्यांना सुतारकाम, बागकाम, गवंडीकामाची आवड होती. त्यासाठी सर्व साधने, उपकरणेही त्यांनी ठेवली होती. ते सखोल अभ्यास करत. रेडिओवर रात्री शास्त्रीय संगीत ऐकून गानसमाधी घ्यायची त्यांना आवड होती. प्रत्येक राग ते समजून घ्यायचे. त्यांचे ज्ञान अगाध होते. ते स्वतः नारळाच्या झाडावर चढून नारळही पाडत. हिराच्या केरसुण्या बांधत. निसर्गाच्या जवळ जायचा त्यांचा प्रयत्न असायचा. एकदा मी भाऊबीजेला गेलो असता ते म्हणाले, ‘जिलबीचा बेत करू या.’ आणि त्यांनी स्वतः उत्कृष्ट जिलेबी बनवली. पु. ल. देशपांडे व सरांची भेट झाली असती, तर त्यांच्यावर ‘पुलं’नी नक्कीच काहीतरी लिहिले असते. वेद, पुराणे, स्मृती या गोष्टींवरही सरांचा अभ्यास होता. ते भारतभर फिरले होते. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो.’

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर करताना मुग्धा भट-सामंत

जोशी सरांना शास्त्रीय संगीताची आवड असल्याने शास्त्रीय गायिका मुग्धा भट-सामंत यांचा त्रिवेणी कार्यक्रमही या वेळी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सामंत यांनी राग दुर्गा ऐकवला. त्यात तराणा, बंदिश सादर केली. नंतर भासे जनात राया, लागी कलेजवाँ कट्यार, सत्य वदे वचनाला नाथा, विष्णुमय जग ही पदे सादर करून, ‘अच्युता अनंता’ या भैरवीने सांगता केली. हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (संवादिनी), मिलिंद लिंगायत (पखवाज), संकेत पाडळकर (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले. विश्वेश जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search