Next
‘भाजपच्या विराट मेळाव्याला तीन लाख कार्यकर्ते येणार’
प्रेस रिलीज
Thursday, April 05, 2018 | 04:26 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘सहा एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महामेळाव्यासाठी पक्षाचे राज्यभरातील किमान तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, या मेळाव्यानंतर कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी (चार एप्रिल) सांगितले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, महिला मोर्चा अध्यक्ष ॲड. माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह व गणेश हाके उपस्थित होते.

खासदार रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, ‘सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या महामेळाव्यास राज्यातील तीन लाख कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. सभेला संबोधित करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच पक्षाचे राज्यातील केंद्रीय मंत्री, प्रभारी, सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत.’

त्यांनी सांगितले, ‘१९८० साली मुंबईत भाजपची वाटचाल सुरू झाली. २०१३ साली डिसेंबरमध्ये याच परिसरात भाजपची विराट महागर्जना रॅली झाली आणि परिवर्तन घडले. स्थापना दिनाच्या विराट महामेळाव्यानंतर भाजप कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील.’

‘राज्याच्या विविध भागांमधून मुंबईकडे येण्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. भाजपचे विराट स्वरूप मुंबईत बघायला मिळणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राज्यातून २८ रेल्वेगाड्यांनी कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच बसेस, जीप, कार अशा ५० हजार गाड्यांनी कार्यकर्ते येणार आहेत. मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी आशिष शेलार आणि त्यांची टीम काम करत आहे,’ असे दानवे यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘मेळाव्याच्या ठिकाणी तीन लाख कार्यकर्ते बसतील एवढा भव्य मंडप, प्रमुख मार्गदर्शकांच्या व्यासपीठाच्या व्यतिरिक्त आमदार, खासदारांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी दुसरे व्यासपीठ केले आहे. महिलांना थांबण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कुर्ला, बांद्रा, सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार असून, तेथून कार्यकर्त्यांची सभास्थळी ने-आण करण्याची व्यवस्था केली आहे.’

आशिष शेलार म्हणाले, ‘महामेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे गुरुवारी सायंकाळी मुंबईत आगमन होईल. विमानतळापासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत युवा मोर्चाचे कार्यकर्ते बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करणार आहेत. शुक्रवारी महामेळाव्याला संबोधित केल्यानंतर शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक होणार आहे.’

दरम्यान, या मेळाव्याला पक्षाच्या बूथ स्तरापासून ते प्रदेश पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले होते. त्यांनी पक्षाचे आमदार, विभागीय संघटनमंत्री, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटन महामंत्री, मंडलाध्यक्ष तसेच किसान मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जनजाती मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी अशा हजारो पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून समूह संवाद साधला. त्या वेळी हे आवाहन केले. त्यांनी मंगळवारी (तीन एप्रिल) सायंकाळी बीकेसी येथे सभास्थळाची आणि तेथे होत असलेल्या तयारीचीही  पाहणी केली आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search