Next
ज्वालामुखीमुळे काही क्षणांत जमिनीत गडप झालेले इटलीतील शहर - पॉम्पे
BOI
Sunday, June 09, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पॉम्पेचे अवशेष आणि पाठीमागे व्हेसुव्हियस पर्वत

२४ ऑगस्ट इसवी सन ७९ या दिवशी इटलीतील समृद्ध असे पॉम्पे शहर नजीकच्या ‘व्हेसुव्हियस’ पर्वतामधील निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने अल्पावधीत अतितप्त राखेखाली गडप झाले. किमान दहा हजार लोक क्षणार्धात मृत्युमुखी पडले. त्या वेळची शहराची स्थिती तब्बल १५०० वर्षे जमिनीखाली टिकून होती. त्यानंतर झालेल्या उत्खननातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर या वेळी लिहीत आहेत या अनोख्या घटनेबद्दल... (पूर्वार्ध)
............
तो दिवस होता २४ ऑगस्ट इसवी सन ७९. इटलीतील समृद्ध पॉम्पे शहरात एकाच वेळी अनेक व्यवहार चालू होते. संगीत, लोकप्रिय खेळ, दुकानांमधील खरेदी-विक्री, गजबजलेली मद्यालये आणि वेश्यागृहे - एक ना अनेक. कोणालाही अशी कल्पना येण्याची काही शक्यताच नव्हती, की त्या सर्वांचा तो जीवनातील अखेरचा दिवस होता. रोमन लोकांची अग्निदेवता ‘व्हल्कानेलिया’ हिचा उत्सव आदल्या दिवशीच मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला होता.

एकाएकी नजीकच्या ‘व्हेसुव्हियस’ पर्वतामधील निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि अल्पावधीतच संपूर्ण पॉम्पे शहर त्याच्या अतितप्त राखेखाली गडप झाले. आजूबाजूच्या काही गावांनाही प्रचंड विनाशाला सामोरे जावे लागले. किमान दहा हजार लोक क्षणार्धात मृत्युमुखी पडले. संपूर्ण पॉम्पे शहरच तमाम स्थावर-जंगमासह १५ ते २० फूट भूमिगर्भात गायब झाले.

इसवी सनपूर्व सातव्या शतकात पॉम्पे वसले गेले. त्यानंतर ३०० वर्षांनी ते रोमन आधिपत्याखाली आले. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी तिथे सुमारे ११ हजार लोकवस्ती होती, जी पूर्णपणे नामशेष झाली. पॉम्पे हे एक प्रसिद्ध बंदर होते. प्रचंड मोठे अम्फिथिएटर आणि क्रीडांगण तिथे होते. पाणीपुरवठ्याची विशेष यंत्रणा शहरात होती. आताच्या सानो (जुन्या सार्नस) नदीच्या मुखाजवळ या शहराचे स्थान आहे. आजूबाजूस छोटी उपनगरे पसरली होती. ‘व्हेसुव्हियस’ पर्वत तिथून आठ किलोमीटर अंतरावर होता. शहराची व्याप्ती १७० एकर एवढी होती.

पुरातत्त्वामधील संशोधनात उत्खननाला फार मोठे महत्त्व आहे. प्राचीन स्थळांचे संदर्भ मिळाल्यानंतर त्या जागी काळजीपूर्वक खोदकाम करण्यात येते. जमिनीखाली नेमके काय दडले आहे, याची आधी कल्पना नसते. वस्तू आणि वास्तूचे नुकसान न होता पुरावे उजेडात आणावे लागतात. बऱ्याच वेळा हवामान (ऊन, पाऊस इत्यादी) आणि ‘खजिना’ हाती लागावा या आशेने होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या यांमुळे अर्धवट पुरावे हाती लागतात. त्यावरून काढलेले निष्कर्ष चुकीचे/अपुरे ठरू शकतात.पॉम्पे या शहराची गोष्ट एकदम वेगळी होती. ज्या क्षणाला ते शहर राख आणि दगड-धोंड्यांखाली गाडले गेले, त्या वेळी लोकांची आणि इमारतींची जी स्थिती होती, ती तशीच्या तशी पुढे शेकडो वर्षे टिकून राहिली. त्याला कोणी धक्का लावण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच पुरातत्त्वाच्या इतिहासात पॉम्पेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्णपणे जमिनीखाली न गेलेल्या वास्तूंना (चोर व हवामानाचा) थोडाफार धक्का पोचला. परंतु एकेकाळचे एक समृद्ध शहर तिथे पाताळात असेल, अशी शंका कोणालाच आली नाही.

आत्यंतिक वेदनेचा अखेरचा क्षण

हजारो टन राखेखाली त्या शहराचे रहिवासी मृत्युमुखी पडले, याचा पत्ररूपी पुरावा ज्युनिअर प्लिनीने (एक इतिहासकार) मागे ठेवला होता. त्याने दूरवरून ज्वालामुखीचा उद्रेक स्वत: पाहिला होता. त्याचे लष्करी अधिकारी काका (सीनिअर) प्लिनी त्या वेळी लोकांचे बचावकार्य करताना मरण पावले होते. त्यानंतर सुमारे १५०० वर्षांनी इसवी सन १५९९मध्ये त्या जागेचा प्रथम शोध लागला. पुढे १७४८ साली एका स्पॅनिश इंजिनीअरने तिथे गंभीरपणे उत्खननाचा प्रयत्न केला. हवा आणि दमटपणाच्या अभावामुळे जमिनीखालच्या सर्व वस्तू (लोक आणि इमारती) जशाच्या तशा टिकून राहिल्या होत्या. त्यामुळे त्या काळातील शहराचे जीवन सूक्ष्म तपशीलासह उजेडात आले. मृत मानवी शरीराच्या जागी राखेमध्ये पोकळ्या निर्माण झाल्या होत्या. तिथे प्लॅस्टर भरण्यात आले. असे शेकडो पुतळे तयार झाले. ज्या स्थितीत त्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्या पुरातत्त्वज्ञांना जशाच्या तशा सापडल्या.

मृत व्यक्तींचे प्लॅस्टर साचेइसवी सनपूर्व चौथ्या शतकात संपूर्ण शहराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. इ. स. ७९मध्ये असलेल्या रस्त्यांच्या पातळीपर्यंत राख/मातीचे ढिगारे उत्खननात उपसण्यात आले. काही ठिकाणी त्याखालीही उत्खनन झाले. जुन्या वस्त्यांचे पुरावे त्या जागी मिळाले. नेहमीप्रमाणे प्राण्यांची हाडे, खापरे आणि वनस्पतींचे पुरावेही उपलब्ध झाले. सध्याचे ‘अपोलो’ देवतेचे देऊळ इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात बांधण्यात आले होते. शहरातील ते महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते. रोम आणि दक्षिण इटलीबरोबर येथून समुद्रमार्गे व्यापार चालत असे.

उत्खनित शहराचे पहिल्या शतकातील रोमन जीवन आपल्यासमोर स्पष्ट उभे राहते. सार्वजनिक बाजा, सभागृहे, स्नानगृहे. असंख्य घरे आणि काही आलिशान बंगले. भिंतींवर मिळालेली चित्रे आणि चिन्हांमुळे माहितीचा प्रचंड खजिनाच खुला झाला. सुतार, सोनार, लोहार अशा व्यावसायिकांची दुकाने लक्षणीय होती. दारूचे गुत्ते आणि वेश्यांची वस्ती ही आणखी काही वैशिष्ट्ये. भडक आणि शृंगारिक चित्रे जागोजागी रेखाटलेली दिसतात. लैंगिक व्यवहार त्या वेळी खुले असावेत, असे त्यावरून कळून येते. आधुनिक विद्वानांच्या मते त्या वेळचे विशाल अॅम्फिथिएटर हा अत्याधुनिक स्थापत्याचा नमुना होता. विशेषत: गर्दीला नियंत्रणात ठेवण्याची विशेष व्यवस्था तिथे होती.

त्या काळातही पर्यटक बाहेरून त्या जागी येत असत. त्यातले काही दुदैवाचे बळी ठरले असणार! रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरे आणि दुकाने उभी होती. रस्ते प्रशस्त होते. विविध प्रकारची धान्ये पिकवण्यासाठी तिथली जमीन भरपूर सुपीक होती. व्हेसुव्हियस पर्वताच्या भोवतालीसुद्धा शेती पसरलेली होती. पाणीपुरवठा मुबलक होता. इटलीत आज अस्तित्वात असलेल्या द्राक्षांच्या मळ्यांप्रमाणे त्या काळातील लोकही लागवड करत होते. मद्यनिर्मिती हा तिथला मोठा व्यवसाय होता. भरपूर विहिरीही तिथे सापडल्या. फळे, भाजीपाला, डाळी मुबलक पिकत होत्या. भाजीविक्रीसाठी मोठ्या मंडयासुद्धा होत्या. थंड आणि गरम पेयांसाठी बार व उपहारगृहांचे अस्तित्व असल्याचे समोर आले. एक हॉटेल तर चक्क १० हजार चौ. फूट मोठे होते!

माउंट व्हेसुव्हियस

इसवी सन ७९च्या आधी, ६२ साली सुमारे पाच-सहा रिश्टर स्केलचा भूकंप पॉम्पेत झाला होता. ज्वालामुखीचा धोका मात्र शहरवासीयांच्या ध्यानात आला नव्हता. पूर्वीच्या भूकंपात घरे, मंदिरे, पूल, रस्ते इत्यादी मोठ्या प्रमाणात नष्ट झाले होते. ते सर्व पुन्हा उभारण्यात आले होते. काही वास्तू ७९पर्यंत तशाच पडक्या अवस्थेत उभ्या होत्या. बरेचसे नागरिक अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते.

माउंट व्हेसुव्हियस

ज्वालामुखीच्या अभ्यासकांना असे लक्षात आले होते, की राखेखाली गुदमरून लोकांना मृत्यू आला अशी आधीची समजूत होती, ती योग्य नसून त्या वेळच्या २५० अंश सेल्सिअस इतक्या प्रचंड उष्णतेमुळे लोक क्षणार्धात गतप्राण झाले. ज्यांनी इमारतींचा आश्रय घेतला होता, तेही त्यातून सुटले नाहीत. राखेचा पंधरा-वीस फुटांचा थर त्यानंतर रचला गेला. बचावलेल्या प्लिनीच्या लेखनातून त्या काळातील ‘आँखो देखा हाल’ आपल्याला कळतो.

उद्रेकानंतर शहर जमिनीखाली गडप झाल्यावर पुढे शेकडो शतके ते विस्मरणात गेले. सन १५९८मध्ये, अडलेला ‘सानो’ नदीचा प्रवाह मार्गी लावण्यासाठी काही खोदकाम करण्यात आले. त्या वेळी प्राचीन भिंती आणि त्यावरील काही चित्रे उजेडात आली. फौंटाना नावाच्या आर्किटेक्टला बोलावण्यात आले. त्याने आणखी काही उत्खनन करून (आपल्या अजिंठ्याप्रमाणे) नवीन भित्तिचित्रे शोधून काढली. तो शोध तिथेच थांबला. ती चित्रे उत्तान असल्यामुळे सामान्य जनतेपासून दूर ठेवण्यात आली.

पॉम्पेचे उत्खनन

१७४८मध्ये एका स्पॅनिश इंजिनीअरच्या नेतृत्वाखाली पॉम्पेचे खऱ्या अर्थाने उत्खनन सुरू झाले. त्यात रस ज्वालामुखीच्या घळी प्रकट झाल्या. मृतांच्या पोकळीच्या जागी प्लॅस्टर भरण्यात आले. अजूनही तशीच पद्धत चालू आहे. परंतु प्लॅस्टरऐवजी रेझिनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मानवी हाडांना धक्का न पोहचता त्यांचा अभ्यास करता येतो. उत्खननात मिळालेल्या असंख्य वस्तू नेपल्स शहरातील ‘नॅशनल आर्किऑलॉजिकल म्युझियम’मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.

गेली २५० वर्षे पॉम्पे हे जगातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून गणले जाते. दर वर्षी सुमारे २५ लाख लोक तिथे भेट देतात. १९९७मध्ये ‘युनेस्को’ने त्याला ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा दिलेला आहे. प्राचीन अवशेषांना इजा पोहोचू नये, म्हणून खास काळजी घेण्यात येते. हॉटेल्स, गाइड्स, गाड्या/बसेस इत्यादींना भरपूर आर्थिक प्राप्तीच्या संधी तिथे मिळत असतात. शहराच्या अर्थकारणातील तो एक महत्त्वाचा भाग आहे.

‘पॉम्पे’ या नावाने २०१४मध्ये एक चित्रपट बनवण्यात आला आहे. दूरदर्शनवर तो बऱ्याच वेळा दाखवला जातो.

(या लेखाचा उत्तरार्ध पुढील आठवड्यात...)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 71 Days ago
In terms of intensity , the explosion of Krakatoa exceeded that of Vesuvius . But it did not destroy a town like Pompey . Only historians and specialists know about it . Life is like that .
0
0

Select Language
Share Link
 
Search