Next
‘भाषा सेतू’च्या शताब्दीच्या निमित्ताने...
BOI
Monday, October 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:दक्षिण भारतीयांचे स्वभाषेवर प्रचंड प्रेम असते, यात कोणताही वाद नाही. तरीही हिंदी हा शब्द उच्चारताच संपूर्णच्या संपूर्ण दक्षिण भारत नाक मुरडतो, हे काही खरे नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या एका सोहळ्याने ही गोष्ट पुन्हा प्रकर्षाने समोर आणली. दक्षिणेतील राज्यांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी झटणारी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा या संस्थेच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनाचा तो सोहळा होता. भाषा सेतू बांधण्यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या शताब्दीच्या निमित्ताने विशेष लेख...
..........
दक्षिण भारत म्हटले की आपल्याकडे एक ठराविक प्रतिमा समोर येते. उग्र हिंदीविरोधी भावना आणि स्वभाषेचा कट्टर अभिमान हे त्या प्रतिमेतील मुख्य घटक असतात. यातील दुसरा घटक हा निर्विवादच म्हणायला पाहिजे. दक्षिण भारतीयांचे स्वभाषेवर प्रचंड प्रेम असते, यात कोणताही वाद नाही. किंबहुना, तमिळनाडूसारख्या राज्यातील लोकांची संपूर्ण अस्मिता एकवटलेली आहे; मात्र पहिल्या घटकाबाबत आपल्या समजुती घासून-पुसून आणि तपासून पाहण्याची खरोखर गरज आहे. तमिळनाडूतील हिंदीविरोधी आंदोलन ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. त्याची किंचित पुनरावृत्ती कर्नाटकात होताना दिसत आहे. तरीही हिंदी हा शब्द उच्चारताच संपूर्णच्या संपूर्ण दक्षिण भारत नाक मुरडतो, हे काही खरे नाही.विंध्य पर्वताच्या खालच्या बाजूलासुद्धा हिंदीचा प्रचार सुखेनैव चालू आहे. 

ही काहीशी दुर्लक्षित आणि उपेक्षित अशी गोष्ट आहे. आपल्याच समजुती नाकारण्याची जोखीम कुणाला उचलायची नसते. त्यामुळे कोणी त्याबद्दल बोलतही नाही. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या एका सोहळ्याने ही गोष्ट पुन्हा प्रकर्षाने समोर आणली. दक्षिणेतील चार राज्यांमध्ये (आणि आता पाच) हिंदीचा प्रचार करण्यासाठी झटणारी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा ही संस्था शताब्दी साजरी करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकतेच या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले. 

दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेसारख्या संस्थांनी भारताचे भावनिक ऐक्य जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सभेने २० हजार हिंदी प्रचारकांचे जाळेच उभे केले आहे. ही संस्था दक्षिण भारतातील अन्य भाषकांसाठी हिंदीच्या परीक्षा आयोजित करते. २०१७-१८मध्ये ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या साडेआठ लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत दोन कोटी विद्यार्थ्यांनी येथून हिंदीचे धडे घेतले आहेत, तर सुमारे सहा हजार व्यक्तींना पीएचडी, डी. लिट. आणि अन्य प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या नावांवर नजर टाकली, तरी तिची उंची लक्षात येते. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, आर. वेंकट रामन, न्या. रंगनाथ मिश्रा अशी मोठमोठी नावे या संस्थेशी जोडलेली आहेत. अशा या संस्थेने शंभर वर्षे पूर्ण करणे आणि तेही आपल्या नियत कार्यात कुठेही खंड येऊ न देता, ही कोणत्याही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी जी चतुःसूत्री दिली होती, त्यात स्वभाषेवर मोठा भर देण्यात आला होता. तमिळ महाकवी सुब्रह्मण्यम भारती यांनीही हिंदीचा प्रचार करण्याला महत्त्व दिले होते. या संदर्भात त्यांनी लोकमान्य टिळकांशी पत्रव्यवहार केला होता. त्यातील एक मूळ पत्र आजही त्यांच्या पाँडिचेरीतील संग्रहालयात पाहायला मिळते. 

मुळात सर्व भारतीय भाषांचा पाया आणि भावना एकच आहेत. याच एकतेला आणखी बळकटी आणण्याच्या हिशेबाने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा’ स्थापन केली होती. त्यांचे पुत्र देवदास गांधी हेच या संस्थेचे पहिले प्रचारक ठरले, यावरून त्यांनी या उपक्रमाला किती महत्त्व दिले होते याची कल्पना येईल. महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले. 

अर्थात महात्मा गांधी यांचा हिंदीबद्दलचा आग्रह एकांगी नव्हता. सर्व भारतीयांनी आपल्या मातृभाषेसोबतच आणखी किमान एक भारतीय भाषा शिकावी, असा त्यांचा आग्रह होता. वर्ध्याला त्यांनी १९४५मध्ये एक भाषण केले होते. त्यात त्यांनी उत्तर भारतीय लोकांना दक्षिण भारतातील किमान एक भाषा शिकण्याचा आग्रह केला होता. आपण तमिळ शिकल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने त्यांच्या आत्मकथेत केला आहे. मदुरै येथे महात्मा गांधी यांचे स्मारक आहे, तेथे तमिळमधून स्वाक्षरी केलेले त्यांचे पत्र प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे. अन् याच ठिकाणी हिंदी प्रचार सभेसारख्या संस्थेचे महत्त्व समोर येते. ‘एखादा हिंदीभाषक जेव्हा तमिळ, तेलुगू, मल्याळम किंवा कन्नड भाषा शिकतो, तेव्हा तो अतिशय समृद्ध परंपरेशी जोडला जातो. ही माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन संधी निर्माण करते,’ असे या शताब्दी सोहळ्यात बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. हे जोडले जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधील वैचारिक आदानप्रदान एकतर्फी असता कामा नये. आज देशात जवळपास सर्वत्र ‘हिंदी ही आपल्यावर लादली जात आहे’ अशी भावना निर्माण होत आहे. याला कारण हिंदीभाषकांकडून अन्य भाषा शिकण्यामध्ये दाखविण्यात येणारी अनिच्छा हेही आहे. स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्यात हिंदीभाषक कमी पडतात, असे सर्वसाधारण मत आहे. 

ही नकारात्मक प्रतिक्रिया दूर करायची असेल, तर अशा प्रकारचे उपक्रम आणखी वाढले पाहिजेत. अनुवाद साहित्याची मागणी अलीकडे खूप वाढलेली आहेच; मात्र येथील ९० टक्के अनुवाद इंग्रजीवर आधारित आहेत. अन्य भारतीय भाषांचे सोडून द्या, पण हिंदीतसुद्धा लिहिले जाणारे किती साहित्य मराठी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होते? ते आपल्याकडे यायला पाहिजे. यासाठी संस्थेच्या वतीने एक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यात तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांतील प्रत्येकी पाच महत्त्वाच्या ग्रंथांचा अनुवाद करण्यात येत आहे. याशिवाय तेलुगूतील काही कादंबऱ्यांचा अनुवाद संस्था हिंदीमध्ये करणार आहे. संस्थेने हिंदीसोबतच अन्य भाषांच्या प्रचाराचा विडा उचलण्यासाठी योग्य वेळ निवडली आहे. त्यातून हिंदीबाबतची नकारात्मकता दूर होण्यास मोठी मदत होऊ शकेल.  

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटले आहे, की वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले असले, तरी भारतीय साहित्याचा आत्मा एकच आहे. तो आत्मा प्रकट व्हायचा असेल, तर अशा प्रकारचे भाषा सेतू वरचेवर बांधले जायला हवेत. 

संस्थेची वेबसाइट : http://www.dbhpscentral.org/

(अलीकडेच होऊन गेलेल्या विश्व हिंदी संमेलनासंदर्भातील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search