Next
‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं
BOI
Tuesday, March 19, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


दिग्दर्शक सुजॉय घोषने निर्माता म्हणून बनवलेला ‘तीन’ हा चित्रपट म्हणजे २०१३मध्ये आलेल्या ‘मोन्ताज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. अत्यंत मोजके संवाद, घटनाप्रधान कथानक आणि पटकथा. व्यवस्थित वेळ देऊन केलेली, तरीही अजिबात संथ न वाटणारी प्रसंगांची उत्कंठावर्धक रचना, यांमुळे संपूर्ण सिनेमा कायम गंभीर टोन असूनही अत्यंत मनोरंजक वाटतो. ‘सायकॉलॉजिकल ड्रामा कम थ्रिलर’, असं याचं वर्णन करता येईल... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘तीन’ या बॉलिवूडपटाबद्दल...
.................
सुजॉय घोष‘झंकार बीट्स’, ‘कहानी’ असे जबरदस्त चित्रपट आणि ‘अहल्या’ हा लघुपट देणाऱ्या दिग्दर्शक सुजॉय घोषने निर्माता म्हणून बनवलेला ‘तीन’ हा चित्रपट म्हणजे २०१३मध्ये आलेल्या ‘मोन्ताज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. ‘युद्ध’ ही सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारी मालिका, तसेच नसिरुद्दिन शाहची भूमिका असलेला ‘मायकेल’ हा चित्रपट दिग्दर्शित करणारा रिभू दासगुप्ता ‘तीन’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. 

कोरियन चित्रपट पाहणं मी शक्यतो टाळतो. आजवर जे पाहिले, त्यातलं एकंदर वातावरण, त्या वातावरणात साकळलेला असह्य ताण, हिरवट-निळं कलर पॅलेट, अनावश्यक रक्तपाती मारामाऱ्या आणि अभिनयाला दिलेला फाटा इत्यादी गोष्टी न आवडल्यामुळे, कोरियन सिनेमाच्या वाटेला मी स्वत:हून जात नाही. या चित्रपटासंदर्भात आधी काहीही वाचलं नसल्यामुळे, चित्रपट सुरू झाला, तेव्हा काही काळ मला तो कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे असं वाटलं. परंतु नशिबानं, वर उल्लेख केलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट ‘तीन’मध्ये नव्हती. त्याऐवजी प्रमुख कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, सुरेख विणलेली पटकथा आणि अत्यंत हुशारीनं केलेलं संपादन, यांवर संपूर्ण सिनेमाचा डोलारा उभा राहिलाय. 

अमिताभ बच्चन नावाच्या जादूगारानं माझ्यावर कायमच गारूड केलं आहे. ७३व्या वर्षीही (तीन या चित्रपटाच्या वेळचं वय) ज्या जोमाने आणि तडफेने हा मनुष्य काम करतो, ते सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘तीन’ हा सिनेमा अमिताभ आणि फक्त अमिताभचा आहे. ‘जॉन बिस्वास’ या भूमिकेचं अमिताभने सोनं केलंय.

‘जॉन बिस्वास’ म्हणून अमिताभचा विचार करणं, त्याला भूमिका देणं, ही एक अद्भुत गोष्ट आहे. रिभू दासगुप्ताने हा विचार तरी कसा केला असावा, याचं आश्चर्य वाटतं. वयाच्या सत्तरीत असणारा, आपल्या अपंग बायकोसाठी स्वतः जेवण बनवणारा, आठ वर्षांपूर्वी किडनॅप झालेल्या आणि नंतर खून झालेल्या आपल्या नातीच्या खुन्याचा सातत्य आणि कमालीचा संयम ठेवून शोध  घेणारा, पोलिस स्टेशन्समध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये कधीतरी न्याय मिळेल या आशेने, चिकाटीने खेटे घालणारा, कधी लाचार-गरीब बिचारा, तर कधी अत्यंत कणखर आणि करारी असा हा ‘जॉन बिस्वास’ अमिताभने अत्यंत सफाईदारपणे साकारलाय. 

घरची जबाबदारी आणि नातीच्या खुन्याचा शोध घेताना ओढाताण होऊनही आपली सर्व कर्तव्यं मनोभावे पार पाडणारा, आपल्या नातीच्या कबरीसमोर रडणारा, अत्यंत हळवा असा आजोबा, अत्यंत निग्रही आणि करारीपणे शोध घेणारा आणि न्यायासाठी मनातून कायमच प्रज्ज्वलित असणारा ज्येष्ठ नागरिक, अशा एकाच भूमिकेत समाविष्ट असणाऱ्या अनेक भूमिका अमिताभने सहजी पेलल्या आहेत. ही भूमिका फक्त आणि फक्त अमिताभच करू शकतो याबद्दल कुणाचंही दुमत होणार नाही. अमिताभ, विद्या बालन, नवाजुद्दिन सिद्दिकी आणि सव्यसाची चक्रवर्ती असे एकसे बढकर एक कलाकार ‘तीन’मध्ये आहेत. 

नवाजुद्दिन सिद्दिकीआठ वर्षांपूर्वी ‘जॉन बिस्वास’च्या नातीचं म्हणजेच ‘अँजेला’चं कुणीतरी अपहरण केलं. नंतर तिचा खूनही झाला. या घटनेला आठ वर्षं लोटली, तरीही खुनी मोकाट हिंडतोय. ‘जॉन’च्या नातीच्या तपासाची जबाबदारी त्या वेळी पोलीस इन्स्पेक्टर मार्टिन दास (नवाझुद्दिन सिद्दिकी) यांच्याकडे होती. तो त्या तपासात अपयशी ठरला. (कदाचित, हे गिल्ट सहन न-झाल्यामुळे?) आता तो चर्चमध्ये फादर म्हणून वावरतोय. आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांची काळजी ईश्वर घेईल, असा त्याचा ठाम विश्वास आहे. साधारण हेच स्वरूप असणारी अपहरणाची घटना आत्ता, आजच्या काळात घडते आहे. ही केस सरिता सरकार (विद्या बालन) नावाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याकडे आहे. अपहरणाच्या केसेस हाताळण्याचा फारसा अनुभव नसल्याने आणि आठ वर्षांपूर्वी घडलेल्या आणि आजच्या घटनेत बरेच साम्य असल्याने, तिला या प्रकरणात ‘मार्टिन’ची मदत अपेक्षित आहे. 

या वेळी मनोहर (सव्यसाची चक्रवर्ती) नावाच्या ज्येष्ठ नागरिकाचा नातू किडनॅप झाला. कदाचित, या केसचा तपास सुरू असताना आपल्या नातीच्या खुन्यासंदर्भात काही धागेदोरे मिळतील या आशेवर जॉन बिस्वासही कधी मार्टिनला बरोबर घेऊन, तर कधी एकटा तपास करतो आहे. एका बाजूने सरिता तपास करते आहे. तर दुसऱ्या बाजूला जॉन तपास करतो आहे. पूर्वीचा अनुभवी, तरीही अपयशी पोलिस इन्स्पेक्टर आणि आताचा तटस्थ भूमिका जगणारा फादर मार्टिन, हे दोन्ही दृष्टिकोन आपल्या अनुभवाच्या कसोटीवर तपासत स्वतःचा एक तटस्थ, तरीही प्रॅक्टिकल असा दृष्टिकोन ठेवून या घटनेचा अंदाज घेतोय आणि आपापल्या तऱ्हेने शोध लावायचा प्रयत्न करतोय. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या ‘तीन’ दृष्टिकोनांतून पाहणारी ही तीन वेगवेगळ्या स्वभावाची पात्रं आहेत. 

तीन पात्रं, तीन दृष्टिकोन, एकच घटना तीन वेगवेगळ्या बाजूंनी पाहिली जाणं, या सर्व बाबींमुळे सिनेमाचं नाव ‘तीन’ ठेवलं असावं. सरिता सरकार ही व्यावहारिकदृष्ट्या, फार विचार न करता, पुरेसा वेळ न देता, पटकन निष्कर्षाप्रत येणारी, प्रसंगी अॅग्रेसिव्ह, लॉजिक फारसं तपासत न बसता, हाती लागलेला माणूसच खरा गुन्हेगार मानून त्याच्याकडून गुन्हा वदवू पाहणारी करारी, मूडी अशी पोलिस इन्स्पेक्टर विद्यानं चांगली उभी केली आहे. परंतु तिची भूमिका खूपच कमी आहे. नवाजुद्दिनच्या वाट्याला आलेली मार्टिन ही भूमिकाही मुळातच वीक आणि कन्फ्युज्ड आहे. त्यानं त्याचं काम इमानेइतबारे केलंय; पण भूमिकेच्या मूळ लिखाणात असलेल्या कमकुवतपणामुळे तो फारसा प्रभाव पाडू शकत नाही. या पात्राच्या भूमिकेचा थंडपणा आणि कन्फ्युजन नको इतकं आहे. कदाचित दिग्दर्शकानं हे मुद्दाम केलं असावं. सव्यसाची हा अभिनेताही अतिशय ताकदीचा. माझा अत्यंत आवडता, पण त्याचीही भूमिका फारशी लक्षवेधी नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा सिनेमा फक्त आणि फक्त अमिताभचा आहे. त्यानं जीव ओतून काम केलंय. बाकी कलावंतांना तो अक्षरशः खाऊन टाकतो! त्यांची ओळख केवळ सहायक अभिनेते एवढीच शिल्लक राहते. 

अत्यंत हुशारीने लिहिलेली पटकथा, त्याला साजेसं असं सफाईदार संपादन, वेगळ्याच जागी आणि वेगळ्याच पद्धतीने प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडणारे प्रसंग, गूढ आणि घनगंभीर वळणाचं साउंड डिझाइन, वेळ आणि साउंड एक्स्पान्शन तंत्रज्ञानाचा सुसंगत आणि सुयोग्य वापर, बांधीव आणि नेटकं दिग्दर्शन यांमुळे आपण नकळत कथेत गुंतत जातो. दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या मायासभेत फसत जातो आणि संपादकाच्या चक्रव्यूहात अडकत जातो.

हा सिनेमा पाहत असताना एकदाही लूज मोमेंट येत नाही. अत्यंत मोजके संवाद, घटनाप्रधान कथानक आणि पटकथा. व्यवस्थित वेळ देऊन केलेली, तरीही अजिबात संथ न वाटणारी प्रसंगांची उत्कंठावर्धक रचना, यांमुळे संपूर्ण सिनेमा कायम गंभीर टोन असूनही अत्यंत मनोरंजक वाटतो. ‘सायकॉलॉजिकल ड्रामा कम थ्रिलर’, असं याचं वर्णन करता येईल. ‘थ्रिल आणि चिल’ फॅक्टर अत्यंत प्रमाणात ठेवून दिलेल्या ‘लाइफ-लाइक ट्रीटमेंट’मुळे सिनेमाशी आपण सहज जोडले जातो आणि पाहताना मनातल्या मनात पडद्यावर सुरू असलेलं कोडं सोडवायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष अपहरण आणि खुनाची घटना पूर्वीची आणि आत्ताची, यापेक्षा ती का घडली आणि याचा आपापल्या परीने आणि कुवतीनुसार शोध घेणारी पात्रं, हा सिनेमाचा फोकस आहे. कुणी केलं?, का केलं? यापेक्षा, शोध घेण्याची अनेक स्तरांवर दाखवलेली प्रक्रिया पडद्यावर पाहणं अत्यंत रंजक आहे. 

प्रमुख पात्रं, त्यांची वेशभूषा, देहबोली, त्यांची आपापसांतली नाती/कनेक्शन, त्यांचे वेगवेगळे दृष्टिकोन, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, सिनेमाचा सीरियस टोन, फिकट रंगांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर, वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्शन डिझाइन, जुनं कलकत्ता, तिथल्या इमारती, त्यांचं टेक्श्चर, शहरी बकाल आणि भकासपणा, किंचित उदासीनता या सर्वांचं ‘तीन’ हे एक अभूतपूर्व असं कोलाज आहे. समांतर सिनेमाचे चाहते, वेगळी कथानकं आवडणारे, बौद्धिक करमणुकीची अपेक्षा करणारे आणि अमिताभचे चाहते अशा सर्व प्रेक्षकांचं समाधान करणारा हा सिनेमा आहे. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Munna About 209 Days ago
रिव्यु छान केलेत
2
0
Sulbha Rudra About 209 Days ago
Feeling of watching moovie in Cinemaghar
1
0
Ravindra Gandhi About 209 Days ago
Excellent
1
0

Select Language
Share Link
 
Search