Next
‘स्टार्स’च्या आठवणीतली दिवाळी
प्रेस रिलीज
Friday, November 02, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देत काही खास आठवणींचे गाठोडे उघडले आहे. काहींनी बालपणीच्या दिवाळीची सांगतानाच  आता तशी दिवाळी साजरी करता येत नसल्याची खंत व्यक्त केली, तर काहींनी दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
..........................................................................

‘किल्ले बनवण्यात रमायचो मी’- हरीश दुधाडे

हरीश दुधाडेस्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडेने दिवाळीची आठवण सांगितली आहे. दिवाळीमध्ये किल्ला बनवणे ही खास आठवण असल्याचे सांगत तो म्हणाला, ‘मी आणि माझा भाऊ लहान असताना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवायला घ्यायचो. छत्रपती शिवाजी महाराज दसऱ्यानंतर नवी मोहिम सुरू करायचे त्याचे प्रतिक म्हणून किल्ला बनवण्याची प्रथा आहे. कामाच्या निमित्ताने मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर किल्ला बनवणे शक्य झाले नाही; पण आजही अंगणभर मातीने माखून किल्ला बनवणे ही गोड आठवण आहे. यासोबतच दिवाळीचा फराळ म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय. गोड-धोड खाण्याची संधी हा सण देत असतो. मला फराळामध्ये शंकरपाळे विशेष आवडतात. चहासोबत शंकरपाळे खाण्याची मजा काही औरच. यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास यासाठी आहे, कारण मी राहत्या घराचा कायापालट करवून घेतलाय. इंटिरिअर बदलल्यामुळे घरात नवी ऊर्जा जाणवू लागलीय. याच नव्या ऊर्जेसोबत मी नव्या कामांचा शुभारंभ करणार आहे.’

‘दिव्यांच्या रोषणाईत हरवलेला तो दिवस’- नुपूर परुळेकर

नुपूर परुळेकर‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरने दिवाळीची खास आठवण सांगितली आहे. ती म्हणाली, ‘मी माझी आई आणि माझे बाबा असे आमचे खूप छोटेसे कुटुंब आहे. मला आठवते आहे, की एकदा दिवाळीच्या दिवशी रात्री माझे बाबा मला बाइकवरून घेऊन निघाले. कुठे जायचे हे काहीच ठरले नसल्यामुळे माझ्या मनात खूप प्रश्न होते. बाबांनी त्यादिवशी मला मुंबईदर्शन घडवले तेही मध्यरात्री. दिवसभर फटाके वाजवून अख्खी मुंबई निद्रावस्थेत असताना मी आणि माझे बाबा बाइकवरून फिरत होतो. दिव्यांच्या रोषणाईत झगमगणारी मुंबई मी त्यादिवशी अनुभवली. दिवाळीचा अर्थ म्हणजे फक्त फटाके वाजवून प्रदूषण करणे नव्हे, तर दिव्यांच्या उजेडाने अंधाराला प्रकाशात विलीन करणे हा सुद्धा आहे, हा कानमंत्र त्यादिवशी मला माझ्या बाबांनी दिला. दिवाळीचा तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.’

‘वृद्धाश्रमात जाऊन साजरी करणार दिवाळी’- एकता लब्दे

एकता लब्दे‘विठुमाऊली’ मालिकेतील रखुमाई म्हणजेच एकता लब्देचा आवडता सण म्हणजे दिवाळी. ‘दिवाळीच्या पहिल्या दिवशी सहकुटुंब सिद्धीविनायकाचे दर्शन घेणे हे मी नित्यनेमाने करते. दिवाळीची चाहूल लागली की घरातल्या साफसफाईपासून ते अगदी फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असायचा. शूटिंगमुळे आता ते शक्य होत नाही. पण यंदाच्या दिवाळीत वर्षभरात न भेटलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मी आवर्जून भेटणार आहे; तसेच यावर्षी एका वृद्धाश्रमाला भेट देण्याची माझी इच्छा आहे. माझ्याकडून त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’ असे एकताने सांगितले.

‘दिवाळी म्हटले की आठवतात पाटोदा लाडू’- अजिंक्य राऊत

अजिंक्य राऊत‘विठुमाऊली’ म्हणजेच अजिंक्य राऊतसाठी दिवाळी हा फक्त सण नाही, तर समृद्ध करणारा अनुभव आहे. उटणे, अभ्यंगस्नान, फराळ, दिव्यांची रोषणाई आणि आप्तेष्टांची भेट या साऱ्या गोष्टी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहेत. दिवाळी म्हटले, की मला आठवतात ते आजीच्या हातचे पाटोदा लाडू. लाडूचे नाव जितके इंटरेस्टिंग आहे तितकीच त्याची चवही. माझे आजोळ बीडचे. बीडमध्ये पाटोदा नावाचे एक छोटेसे गाव आहे. त्याच गावाच्या नावावरून लाडूंना पाटोदा लाडू हे नाव पडले. आजीने बनवलेल्या लाडूंची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळते आहे. यंदा आजीला महिनाभर आधीच लाडू बनवण्याची खास फर्माईश केली आहे. त्यामुळे भरपूर लाडू फस्त करणे हा माझा यंदाच्या दिवाळीचा अजेंडा आहे. शिवाय यावर्षी मी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचा कार्यक्रम जवळून अनुभवणार आहे. डोंबिवलीच्या फडके रोड इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मी जाणार आहे. ‘विठुमाऊली’ मालिकेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना ‘विठुमाऊली’चे दर्शन घेण्याचे निमित्त. त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे. दिवाळी गीते, दिव्यांच्या रोषणाईत झगमगून निघालेला आसमंत आणि चाहत्यांची अमाप गर्दी अश्या भारावलेल्या वातावरणात मी यंदा माझी दिवाळी सेलिब्रेट करणार आहे.

‘चकलीचे भन्नाट प्रयोग करून पाहिलेत’- संकेत पाठक

संकेत पाठक‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रम म्हणजेच संकेत पाठकसाठी दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल आणि खूप सारे शॉपिंग. लहानपणी नवे कपडे मिळण्याचे वर्षातले दोन हक्कांचे दिवस म्हणजे दिवाळी आणि वाढदिवस. त्यामुळे दिवाळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. आता मनात येईल तेव्हा शॉपिंग करता येते; पण लहानपणी नव्या कपड्यांसाठी दिवाळीची वाट पहावी लागे. फराळामध्ये मला चकली खूप आवडते. खायला आणि करायला देखील. क्रिस्पी चकली, त्रिकोणी आणि चौकोनी चकली असे बरेच वेगवेगळे प्रकार मी बनवले आहेत. यंदाही चकलीचा असाच एक भन्नाट प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न असेल.’

‘पहिला पगार आणि दिवाळी’- नम्रता प्रधान

नम्रता प्रधान‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रताला पहिल्या पगारातून दिवाळीसाठी घेतलेल्या खास भेटवस्तू आठवतात. पहिल्या पगाराची आठवण आपल्या प्रत्येकाच्याच मनात कायम जपलेली असते. माझ्यासाठी ही आठवण खूपच खास आहे, कारण माझा पहिला पगार दिवाळीतच झाला होता. त्यामुळे सर्व पैसे मी शॉपिंगवरच खर्च केले होते. यंदाही माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी खूप सारे शॉपिंग करणार आहे आणि माझ्यासाठी नवा मोबाइल खरेदी करणार आहे.’

‘लग्नानंतरचा पहिलाच दिवाळ सण’- संग्राम समेळ

संग्राम समेळ‘ललित २०५’ मालिकेतील नील म्हणजेच संग्राम समेळसाठी यंदाची दिवाळी खूपच स्पेशल आहे. त्याच्या लग्नाला यंदा दोन वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्यावर्षी त्याची पत्नी म्हणजेच पल्लवी प्रधान दिवाळीमध्ये शूटिंगसाठी बाहेरगावी होती. त्यामुळे दिवाळीचे सेलिब्रेशन एकत्र करता आले नाही. यंदा, मात्र संग्राम लग्नानंतरची पहिलीच दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. पल्लवीसाठी खास गिफ्टही घेणार आहे. बालपणीची दिवाळीची एक खास आठवण संग्रामने सांगितली आहे. लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत तो वाड्याला त्याच्या आजीकडे जात असे. सणांमागचे खरे महत्त्व आणि आजी-आजोबांनी लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर मनावर कोरले गेले असल्याचे संग्रामने सांगितले.

‘मित्रमैत्रीणींची भेट आणि देवाचा आशिर्वाद’- अमृता पवार

अमृता पवार‘ललित २०५’ मधली भैरवी म्हणजेच अमृता वर्ष गेली वर्षानुवर्ष दिवाळीत एक परंपरा कायम जोपासते आहे ती म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी मित्रपरिवारासोबत पार्लेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याची. शाळेत असल्यापासून सुरू असलेल्या या प्रथेत अद्याप खंड पडलेला नाही. त्यानिमित्ताने मित्रमैत्रीणींची भेटही होते. ‘मला स्वयंपाकाची फारशी आवड नाही, मात्र फराळ करायला खूप आवडते. आईला आवर्जून मदत करते. यंदा ‘ललित २०५’मुळे आणखी एक हक्काचे कुटुंब मिळाले आहे. त्यामुळे सेटवरही दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन करणार आहे,’ असे अमृताने सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search