Next
डायनासॉरची कहाणी!
BOI
Sunday, August 11, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पृथ्वीवरील महाकाय, चित्रविचित्र असे डायनासॉर प्राणी संपूर्णपणे नष्ट झाले, त्याला नुकतीच साडेसहा कोटी वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांचा विशेष लेख...
............
डायनासॉरला ‘न्याय’ देणारा ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट खूपच गाजला. ‘ज्युरासिक वर्ल्ड’सुद्धा अलीकडेच आपण पाहिला. हे अजस्र प्राणी अचानक काही एका महाअरिष्टामुळे पृथ्वीतलावरून कायमचे अदृश्य झाले. त्यानंतर अन्य प्रजातींचे आणि सस्तन प्राणी निर्माण झाले, टिकू शकले. पृथ्वीच्या ४५० कोटी या आयुर्मानाच्या तुलनेत मनुष्यप्राण्यांचे अस्तित्व केवळ २० लाख वर्षांचे आहे.

काय आहे डायनासॉरची कहाणी?
डायनासॉर प्राणी असंख्य प्रकारचे आणि आकारमानाचे होते. पृथ्वीच्या सर्व भूभागावर त्यांचे अस्तित्व होते. काळ्या डोमकावळ्याच्या आकारापासून ८०-९० फुटांपर्यंतचे डायनासॉर्स ‘गुण्यागोविंदा’ने एकत्र नांदत होते. काही दोन पायांवर, तर काही चार पायांवर फिरत असत. वजनामुळे सगळ्यांचीच गती संथ होती, असे नव्हते. काही प्राणी मोठ्या पक्ष्यांप्रमाणे वेगाने, सडपातळ पायांवर पळू शकत. त्यातले काही आपल्या अणकुचीदार वाकड्या दातांनी फक्त मांस भक्षण करत, तर काही आपल्या खिळ्यासारख्या दातांनी वनस्पतींवर उदरभरण करत. काहींना तर दातच नसत. त्यांना मऊमऊ फळे, कीटक आणि अंड्यांवर प्राणरक्षण करावे लागे. त्यांच्या कोट्यवधी वर्षांच्या उपस्थितीत अन्य कोणतेही प्राणी जमिनीवर अस्तित्वात नव्हते. त्यामुळे सर्वत्र एकाच प्रजातीची भरभराट होत राहिली. सुमारे ३० कोटी वर्षे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वर्चस्व राहिले. वृक्षवल्ली आणि जंगले विपुल प्रमाणात होती. अन्य प्राणी नसल्यामुळे डायनासॉर्स एकमेकांनाही खात असत, जे आपण चित्रपटांत बघतो. ‘शाकाहाऱ्यां’ना घासफुशीची कमतरता नव्हती.

अमेरिकेतील नॅचरल हिस्ट्री म्युझियम

‘ज्युरासिक’ काळात, सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी त्यांचा उदय झाला आणि पृथ्वीतलावर अन्य कोणतेही प्राणी टिकू शकले नाहीत. अंदाजे सात कोटी वर्षे त्यांच्यातच नवनव्या प्रकारच्या प्रजाती निर्माण होत राहिल्या. हा कालावधी तसा फारच मोठा होता. त्या वेळचे हवामान सौम्य होते. वेगवेगळे ऋतू फारसे नव्हतेच. त्यामुळे असंख्य प्रकारच्या वनस्पती, वृक्षराजी निर्माण झाली आणि वाढली. सुरुवातीला एकाच मोठ्या भूभागावर डायनासॉर्सची वस्ती होती; परंतु सर्व खंडांमध्ये त्यांचा संचार होण्यासाठी कुठलाच अडथळा नव्हता. अंटार्क्टिका सोडून प्रत्येक खंडात, जमिनीखालच्या खडकांमध्ये त्यांचे अवशेष मिळालेले आहेत. एका ठराविक थरानंतर त्यांचे पाषाणभूत पुरावे (फॉसिल्स) मिळणे पूर्णपणे बंद झाले. तो काळ सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा आहे. त्याच काळात, पाण्यातील लहानमोठे प्राणी, उडणारे प्राणी इत्यादीसुद्धा नामशेष झाले. काही सस्तन प्राणी, पक्षी आणि अन्य सरपटणारे प्राणी टिकाव धरू शकते; तरी त्यांचे प्रमाणही प्रचंड घटले.

लॉस्ट वर्ल्ड पार्क

हे डायनासॉर्स आणि अन्य पशु-पक्षी अचानक कसे नष्ट झाले, हे कोडे शास्त्रज्ञांना अद्याप विश्वसनीयदृष्ट्या सुटलेले नाही. त्याबाबत अनेक सिद्धांत पुढे आले. पृथ्वीवर नाना प्रकारचे उत्पात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते प्राणी समूळ नष्ट झाले असावेत, हा त्यातला एक. देवानेच सर्व प्राण्यांना निर्माण केले आणि उत्क्रांतीच्या प्रवाहात त्यातल्या काही ‘निवडक’ प्रजातींना कायमचे नामशेष केले, हा एक लोकप्रिय धार्मिक सिद्धांत होता. विज्ञानाच्या कसोटीवर तो टिकणे शक्यच नव्हते. सन १८२०च्या दरम्यान इंग्लंडमध्ये प्रथमच ‘ही डायनासॉरची हाडे’ म्हणून ओळखली गेली आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला. ‘प्रचंड मोठा भयानक सरडा’ असे त्याचे वर्णन केले गेले. 

डायनासॉर्सची हालचाल संथ आणि बुद्धी मंद असल्यामुळे, त्यांच्यापेक्षा हुशार, आक्रमक सस्तन प्राण्यांपुढे त्यांचा टिकाव लागू शकला नसावा ही एक उपपत्ती होती. त्यांची पिल्ले अंड्यांमधून बाहेर येत. ती अंडी खाण्याची ‘गोडी’ काही अन्य प्रजातींच्या प्राण्यांना लागली आणि त्यांच्या खाण्याचा सपाटा विरुद्ध नव्याने पिले जन्माला घालण्याचा डायनासॉरचा वेग यात मोठी तफावत पडल्याने एक काळ असा आला, की त्यांचे अस्तित्वच कायमचे नष्ट झाले. हा एक विचार काही काळ लोकांना पटण्यासारखा ठरला. प्रतिकूल वातावरणामुळे ‘महिलांनी’ लहान आकाराची अंडी घातली, आणि नि:शक्त प्राण्यांची नवी पिढी जन्माला येऊन त्यांचा विनाश झाला, हा एक शास्त्रविचार होता! हवामानातील प्रचंड बदल किंवा त्या प्राण्यांच्या लोकसंख्येचा विस्फोट, ही त्यामागची कारणे असू शकतात.

डायनासॉर्स खादाड होते. प्रत्येक जण दिवसाला एक टन वनस्पती खात असे. तेवढी जंगले आणि वृक्ष आपल्या ग्रहावर होते. पुढे नव्या प्रकारच्या वनस्पती निर्माण झाल्या आणि त्या बिचाऱ्या प्राण्यांना ‘पचल्या’ नाहीत. पोटे बिघडू लागली, त्यातून त्या रोगाच्या साथीमुळे प्राणी धडाधड मरू लागले. काही वनस्पती विषारीसुद्धा असतील. मिळणाऱ्या हाडांच्या अवशेषांवरून त्या दिशेने अभ्यासाचा प्रयत्नही शास्त्रज्ञांनी केला.

काही वेळा प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष (जीवाष्म) अचानक सापडतात. खाणकाम, रस्तेबांधणी करताना तसा शोध लागतो. हजार फूट खोदकाम झाल्यावर डायनासॉर्सची मोठमोठी हाडे मिळालेली आहेत. गेल्या सुमारे १०० वर्षांत जाणीवपूर्वक उत्खननेसुद्धा होत आलेली आहेत. त्यातून होणाऱ्या अभ्यासानंतर नवे निष्कर्ष काढता येतात. खोलवर, दगडांच्या थरांमध्येच नेहमी, नष्ट न होणाऱ्या हाडांचा ‘खजिना’ मिळतो. बर्फाळ प्रदेशात जमिनीखाली डायनासॉरची अंडीदेखील सापडली आहेत. असे अवशेष वर काढणे (जरी ते दगडासारखे घट्ट, टणक असले तरीही) हे फारच अवघड काम असते. त्यांचे तुकडे सहज पडू शकतात. त्यासाठी काळजीपूर्वक आधी दगड शक्यतो बाजूला केले जातात. बारीकसारीक तपशीलांची नोंद करून छायाचित्रे घेण्यात येतात. अवशेषांची स्थिती आणि आकारमान महत्त्वाचे असते. हाडे बाहेर काढण्यापूर्वी त्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पदार्थांचा लेप दिला जातो. संपूर्ण सांगाडा उभा होण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो. युरोप-अमेरिकेतील अद्ययावत संग्रहालयांमध्ये असे सांगाडे बघावयास मिळतात. काही वेळा पूर्ण सांगाडा तयार करण्यासाठी, कल्पनेने कृत्रिम भाग (हाडे) बनवावे लागतात. काही ठिकाणी डायनासॉर्सची खास मोठी दालने तयार केलेली आहेत. उदा. अमेरिकास्थित ‘उटाह’ राज्यातील राष्ट्रीय उद्यान.

ज्वालामुखींचे एकाच वेळी ठिकठिकाणी होणारे उद्रेक, हेसुद्धा प्राण्यांवरील अरिष्टांचे कारण सांगितले जाते. अतिउष्णता, कार्बन-डाय-ऑक्साइडसारखे विषारी वायू, लाव्हाचे प्रवाह यांच्या परिणामस्वरूप प्राणी नष्ट तर झालेच; जोडीला उपलब्ध अन्नसाठा प्रचंड कमी होऊन डायनासॉर्सची प्रजनन शक्तीसुद्धा घटली असावी, असा एक सिद्धांत आहे. अर्थात वरील सर्व सिद्धांतांना मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे काही वैश्विअक महाआपत्ती त्या नाशाला कारणीभूत असू शकेल काय, याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळवीर, भू-वैज्ञानिक, भू-पदार्थ-वैज्ञानिक यांची मदत घेण्यास सुरुवात झाली.

अशा प्रयत्नांमधून पुढे आलेली एक उपपत्ती म्हणजे एखाद्या ताऱ्याचा झालेला मृत्यू! अशा वेळी प्रचंड किरणोत्सर्जन होत असते. ते अंतराळातून दूरवर जाऊन पोहोचते. आपल्या आकाशगंगेत अशा घटना वारंवार घडतात. तथापि, प्रचंड अंतरांमुळे पृथ्वीवर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. सुमारे पाच कोटी वर्षांत एकदा, एखादा सुपरनोव्हा पृथ्वीच्या ‘जवळ’ येऊन नष्ट पावतो आणि त्याच्या किरणोत्साराने प्रचंड प्रमाणात विनाश घडू शकतो. (फक्त पृथ्वीवरच नव्हे, तर आकाशगंगेतील अन्य नजीकच्या ग्रहांवर सुद्धा). अशाच वेळी डायनासॉर्सचा आकस्मिक संपूर्ण नायनाट झाला असावा किंवा कॅन्सरसारखे विकार होऊन काही कालावधीत ते नष्ट झाले असतील.

सर्वांत मान्यताप्राप्त सिद्धांत म्हणजे एखादा धूमकेतू किंवा लघुग्रहाची पृथ्वीला झालेली टक्कर. जमिनीखाली एका विशिष्ट कालावधीतला, एक इंच जाडीचा लालसर-भुऱ्या रंगाचा थर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाला आढळला. त्याचे नमुने त्याने पदार्थवैज्ञानिक आणि रसायन शास्त्रज्ञांकडून तपासून घेतले. त्यात आढळलेले जड धातूचे कण पृथ्वीवर कोसळणाऱ्या उल्कांमध्ये सापडत होते. अन्य द्रव्येसुद्धा बाहेरच्या विश्वाउतील होती. त्याचा अर्थ अवकाशातून एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असावा. मंगळ आणि गुरूच्या मधील अवकाशात असे हजारो लहानमोठे ‘ग्रह’ फिरत असतात. त्यातील किमान ९-१० किलोमीटर व्यासाचा एक लघुग्रह ताशी ७०-७५ हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीवर आदळला. त्या जागी (लोणारसारखे) एक प्रचंड विवर तयार झाले. जून १९८७मध्ये समुद्राखाली ४५ किलोमीटर लांबीचे विवर कॅनडाच्या दोन अभ्यासकांना आढळले. त्यातही वरील जड धातूचे (इरिडियम) अंश मिळाले.

त्या प्रचंड धडकेमुळे पृथ्वीवरील सर्व वातावरणात धुळीचे ढगच्या ढग पसरले. त्यामुळे सर्व जीवमात्रांना आवश्यक असलेले सूर्यकिरण अडले आणि कित्येक महिने सर्वत्र अंधार दाटला. तापमान खूपच खाली गेले. काही प्राणी आणि वनस्पती गोठल्यामुळे नष्ट झाल्या. नवी निर्मिती थांबली. अन्नाच्या अभावामुळे राहिलेले प्राणी मरून गेले. धूमकेतूचे वजन लघुग्रहापेक्षा कमी असते. कारण त्याचा बहुतेक भाग वायूने बनलेला असतो. अर्थात काही भाग दगडांचाही असतो. तो वेगाने पृथ्वीवर आदळल्यास मोठे विवर तयार होऊन, ग्रह हादरू शकतो. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अशीच एक मोठी धडक पृथ्वीला बसली होती, हा स्पष्ट पुरावा शास्त्रज्ञांना आता मिळाला आहे. त्या धक्क्यामुळे पृथ्वीवर किमान आठ जागी प्रचंड भेगा पडल्या, असे आढळले. दर चौरस इंचाला १३ लाख चौरस पौंडांचा आघात देणारी ती धडक होती. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तेवढी क्षती होऊ शकत नाही. जमिनीखाली त्या कालावधीच्या स्तरांमध्ये ठिकठिकाणी ‘इरिडियम’ही आढळले. डायनासॉर्सचा विनाश त्या ‘धडके’मुळे झाला, हा सिद्धांत तूर्त मान्य झालेला आहे.

उद्या कदाचित नवा, अधिक ग्राह्य सिद्धांत येऊ शकेल; मात्र ते अजस्र प्राणी पृथ्वीवरून त्या काळात कायमचे नामशेष झाले. हे एकमेव सत्य आहे. 

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search