Next
माझा अनवट मित्र हिरालाल!
BOI
Sunday, July 15, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘किमया’ सदरात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर आज सांगत आहेत हिरालाल या त्यांच्या अनवट मित्राची गोष्ट...
...........
आपला मित्रपरिवार खूप मोठा असला, तरी त्यातले अगदी निवडक ‘जिवलग’ असतात. मग त्यांचं शिक्षण, ज्ञान, अनुभव, वय, जात-पात या गोष्टी काहीही असोत. हिरालाल जैन हा त्यातलाच एक खास मित्र. तो खरोखर अस्सल, पण उपेक्षित कलाकार होता.

माझ्या महाविद्यालयीन वयात, पुण्याच्या एस. पी. कॉलेजसमोरील प्रसिद्ध ‘उदय विहार’ हॉटेलमध्ये त्याला वेटर म्हणून काम करताना बऱ्याच वेळा पाहिलं होतं. आधी काही काळ बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’ नाटक कंपनीत तो कपडेपट सांभाळत असे. ‘वऱ्हाडी मानसं’, ‘स्वयंसिद्धा’, ‘करायला गेलो एक’ ही कंपनीची नाटके चालू होती. त्यात अभिनयाची संधी मात्र त्याला मिळाली नाही.

हिरालाल वयानं माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. उंची बेताची, केस कुरळे आणि नर्तकासारखे वाढलेले, रंग काळा पण चेहरा आकर्षक. पुढे योगायोगाने माझी त्याची भेट दुसऱ्या एका नाटक कंपनीत झाली. त्याचं असं झालं. अप्पासाहेब इनामदारांची ‘कलासंगम’ ही नाटक कंपनी होती. विनोदवीर प्रकाश इनामदार हा त्यांचाच मुलगा. त्यांच्या ‘थांबा थोडं दामटा घोडं’ या लोककवी मनमोहन लिखित नाटकाचे प्रयोग चालू होते. त्यात दिवेकर गुरुजी नावाचे एक वयस्कर कलाकार ‘गुरुजीं’ची (भटजी) भूमिका करत होते. आजारी पडल्यामुळे त्यांना नव्या दौऱ्यावर जाणं शक्य नव्हतं. प्रकाश माझा मित्र. मी शाळा-कॉलेजमध्ये नाटकात काम करायचो, हे त्याला ठाऊक होतं. राहायला आम्ही जवळ-जवळ होतो. एक दिवस मला तो रस्त्यात भेटला. त्यानं मला विचारलं, ‘आमच्या नाटकात काम करणार का? गुरुजींची भूमिका आहे. काम थोडंच आहे. पाठांतराचा फारसा प्रश्न नाही.’ मी बहिस्थ विद्यार्थी म्हणून बीए करत होतो. गणपती जवळ आले होते. मी लगेच ‘हो’ म्हणालो आणि माझे दौरे सुरू झाले. दोन वर्षं मी ‘कलासंगम’मधे होतो. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात फिरलो.

हिरालालनं ‘श्री स्टार्स’ सोडलं होतं. ‘कलासंगम’ला रंगमंच व्यवस्थेसाठी माणूस हवाच होता. त्यांचे कलापथकाचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते. हिरालाल कथ्थक नृत्य शिकला होता. कंपनीच्या दृष्टीनं तो खूपच उपयुक्त ठरला. तो आणि मी जवळजवळ एकाच वेळी कंपनीत दाखल झालो. तो ‘उदय विहार’च्या जागेतच राहत होता. आमची ‘गट्टी’ जमायला काहीच वेळ लागला नाही. आमची जुन्या चित्रपट संगीताची आवड समान होती. त्याच्याकडे तीन मिनिटांच्या (७८ rpm) जवळजवळ २०० ध्वनिमुद्रिका होत्या. पुढे काही दिवसांनी मी त्या विकत घेतल्या. त्याच्याबरोबर नेहमी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. त्याचा लहानपणापासूनचा खडतर जीवनप्रवास मला समजला. तो फारच नाट्यपूर्ण होता. मी त्या वेळी त्याला म्हणालो की, ‘मी तुमच्यावर एक पुस्तक लिहिणार!’ आणि, त्याची कहाणी वहीत लिहायला सुरुवातही केली. जवळपास २०० पानं लिहून झाली. नंतर, लेखन हाच माझा व्यवसाय होऊनही ते पुस्तक मात्र आजतागायत होऊ शकलं नाही. आता त्याला जाऊनही बरीच वर्षं झाली. आमची मैत्री होऊन ४० वर्षं उलटून गेली. निदान एका लेखाच्या स्वरूपात का होईना, त्याच्या स्मृतीला उजाळा द्यावा, असं वाटल्यामुळे ही लेखनांजली!

हिरालाल मूळ सोलापूरचा. घरची परिस्थिती गरिबीची. आई-वडील मिळतील ती कामं करून आपलं आणि एकुलत्या एक मुलाचं पोट कसंबसं भरायचे. हिरालाल सात-आठ वर्षांचा असतानाच एका अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाला. तो अनाथ झाला. त्यांचे एक लांबचे नातलग घरी आले. त्याला ते बरोबर नेतील अशी अपेक्षा होती; पण ते तसेच निघून गेले. हिरालाल लहान होता; पण त्याला परिस्थितीची जाणीव झाली होती. त्याचं घर झोपडपट्टीत होतं. तिथेच तो राहिला. जैन आडनावाचं एक कुटुंब त्याला खायला देत असे. आजूबाजूच्या लोकांच्या आश्रयावर तो वाढू लागला. पालक जैन होते म्हणून त्यानं जैन आडनाव लावायला सुरुवात केली.

त्यांच्या झोपडीजवळ एक लहानसं चित्रपटगृह होतं. चार पैसे मिळावेत म्हणून हिरालाल त्याच्या झाडझुडीचं काम करू लागला. त्या वेळी तिथे ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट जोरात चाललेला होता. गोपीकृष्ण आणि संध्या यांची नृत्ये आणि वसंत देसाईंचं अवीट गोडीचं संगीत. हिरालालनं तो चित्रपट ७२ वेळा पाहिला. आपणही नर्तक व्हावं, असं बीज त्या वेळीच त्याच्या मनात रोवलं गेलं. साधारण १०व्या वर्षी तो चालू रहाटगाडग्याला कंटाळला. एक दिवस दौंडच्या दिशेनं जाणाऱ्या एका रेल्वेत विनातिकीट बसला आणि कुठल्यातरी स्टेशनवर उतरला. जवळच्या एका हॉटेलमधे ‘काम मिळेल का’ विचारून तो तिथला ‘पोऱ्या’ बनला आणि हॉटेल जीवनाशी त्याचं दीर्घ काळासाठी नातं जुळलं. पुढील दोन वर्षांत त्यानं सोलापूर-पुणे मार्गावर पाच-सहा हॉटेल्समध्ये काम केलं. जेवणखाण व राहण्याची सोय होत होती. त्यामुळे पगार किरकोळ असला तरी बिघडत नव्हतं.

आणि अशा रीतीनं तो १२व्या वर्षी पुण्यातील ‘मथुरा भुवन’ या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यांची दोन जागी हॉटेल्स होती. एक मंडईत आणि दुसरं (त्या वेळच्या) मिनर्व्हा थिएटरच्या समोरील गल्लीच्या कोपऱ्यावर. तिथे आजूबाजूला वेश्यावस्ती होती-आजही आहे. हॉटेलच्या डोक्यावरसुद्धा काही बायका राहत होत्या. बहुतेक शर्मा आडनावाच्या एक वृद्ध बाई आणि त्यांची मुलं हॉटेल चालवत होती. हिरालाल पडेल ती सर्व कामं करत होता. कष्ट आणि विश्वाीस यांच्या जोरावर हळूहळू तो त्या कुटुंबाचाच एक घटक बनला. त्याला मुलासारखी वागणूक मिळत होती. शर्मा आजीबाई धार्मिक होत्या. त्यांच्याबरोबर हिरालालनं चार धाम आणि अन्य काही यात्रा केल्या.

तिथेच त्याच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू झालं. तो काळा असला तरी ‘स्मार्ट’ होता. शिवाय लांबसडक कुरळे केस. त्यानं नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुदैवानं, ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटाचे प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक बाळासाहेब गोखले त्याला गुरुजी म्हणून लाभले. आघाडीच्या अनेक सिनेतारकांनी सुरुवातीला त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं होतं. हिरालालनं प्रचंड कष्ट घेऊन कथ्थक नृत्य आत्मसात केलं. नंतर हौशी नाटकमंडळींबरोबर नाटकात कामं करायला सुरुवात केली. मालकीणबाईंचं प्रोत्साहन होतंच. त्यानं अनेक स्त्री भूमिका केल्या. सगळ्यात गाजली ती त्याची ‘झाशीची राणी.’ गणपती आणि मेळ्यांमध्ये त्याच्या नृत्याचे कार्यक्रम होत असत.

मालकीणबाई वारल्यानंतर तो ‘उदय विहार’ हॉटेलात दाखल झाला. नाटक कंपन्या बदलत बदलत तो ‘श्री स्टार्स’पर्यंत पोचला. काम म्हणजे कपडेपट सांभाळणे आणि रंगमंच व्यवस्था. पगार बेताचाच होता. एक सांगण्यासारखी गंमत म्हणजे कलाकारांना (मग तो नायक असो वा हिरालालसारखे कामगार) दिवसाचा भत्ता तीन रुपये ३० पैसे असे. काळ आहे सन १९६२ ते ६५चा. तेव्हा राइस प्लेट दीड रुपयात आणि चहा १५ पैशांत मिळे. असे दोन वेळचे तीन रुपये ३० पैसे! समजा मुंबईत संध्याकाळचा प्रयोग असेल, तर कंपनीची गाडी दुपारी एकनंतर निघे. अशा वेळी भत्ता एक रुपया ६५ पैसेच मिळे. केवळ गंमत म्हणून हे सांगितलं आहे. बाबूराव गोखल्यांचा मुलगा अतुल हा माझा भावेस्कूलमधील वर्गमित्र होता. कंपनीला काटकसर करावी लागायची, त्यात गैर काहीच नाही. मग अशा वेळी कलाकार काय म्हणायचे? ‘मालकांनी ३०-४० रुपये वाचवले ना, तर आता बघा वाटेत टायरच पंक्चर होईल!’ आणि खरंच व्हायचं हो! असो. नाटक कंपनीच्या दौऱ्यातील अनुभव सांगायचे झाले, तर त्याचं एक पुस्तक होईल.

नंतर हिरालाल ‘कलासंगम’मध्ये दाखल झाला. कामं तीच, फक्त ‘प्रमोशन’ म्हणजे कलापथकाच्या कार्यक्रमांत १५-२० मिनिटं नृत्य करण्याची संधी मिळायची. तिथेच आमची ओळख झाली आणि पुढे घट्ट मैत्री. त्या वेळी तो ‘उदय विहार’मध्ये फक्त राहत होता. वेटर म्हणून काम बंद केलं होतं. त्याला भेटायला कोणी आलं, तर चहापाणी, नाश्ता त्याच हॉटेलमध्ये होत असे. बिलाची रक्कम मालक लिहून ठेवायचे. काही काही वेळा ती दीड-दोन हजारांपर्यंत जाई; पण मालकांनी कधीही कटकट केली नाही किंवा हिरालालनं एक रुपयासुद्धा बुडवला नाही. पैसे हातात आले, की थोडे-थोडे चुकते करायचा.

त्याच्या जीवनातील सांगण्यासारखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्याचं लग्न! आम्हा कोणालाही काहीच कल्पना नसताना त्यानं अचानक एक दिवस लग्न ठरल्याचं जाहीर केलं. मुलगी सांगलीची होती. अप्पासाहेब इनामदार त्यांचा वडीलधारी सल्ला न घेतल्याबद्दल नाराज झाले; पण आम्ही बहुतेक कलाकार कंपनीच्या गाडीनं सांगलीला गेलो. पत्ता शोधत शोधत ठिकाण गाठलं. रस्त्यातच मांडव घातला होता. आमच्या कंपनीचे मॅनेजर रामशंकर (हे पायपेटी वाजवत) तो परिसर बघून म्हणाले, ‘रवी, गडबड दिसतेय!’ खरोखरच, तो सांगलीतला ‘रेडलाइट’ विभाग होता. अप्पासाहेब आणि प्रकाशही बरोबर होते. आमचं जंगी स्वागत झालं. लग्न त्याच दिवशी होतं. मुलगी पाहिली. ती देखणी होती. वीस एक वर्षांची असेल. हिरालाल तीसचा तरी होता.

तिथल्या बायकांनी आमचा ताबा घेतला. म्हणजे गंभीर काही नाही! अप्पासाहेब सोडून आम्हा सगळ्यांच्या अंगाला ओली हळद फासली. मग आमच्या आंघोळी झाल्या. लग्न लागलं. वरातही निघाली. सांगलीच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. हिरालालचा सगळ्यात ‘जवळचा’ म्हणजे मीच. तिथली पद्धत अशी, की त्या व्यक्तीनं/नातलगानं (म्हणजे मी) उभ्या खंजिरावर लिंबू खोचून सर्वकाळ वावरायचं. रस्त्यावरून वरात जातानासुद्धा! खंजीर खाली ठेवला आणि तो मुलीकडच्या कोणाला मिळाला तर ते सांगतील तेवढा दंड! (आठवा : ‘जूते दे पैसे लो’ - हम आपके है कौन). मी कशाला खाली ठेवतोय! माझी अवस्था काही का असेना! असा तो थोडक्यातला लग्नप्रसंग. हिरालाल नववधूसह तिथेच (हनिमूनसाठी) थांबला आणि आम्ही पुण्याला परतलो. दुर्दैवानं ते लग्न जेमतेम वर्षभर टिकलं आणि मुलगी सांगलीला ‘स्वगृही’ परतली.

पुढे काही दिवसांनी हिरालालनं ‘कलासंगम’ कंपनी सोडली. तो मुंबईला गेल्याचं समजलं. आधी तिथल्या एक-दोन ठिकाणी काम करून प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’मध्ये तो दाखल झाला. पणशीकरांचा स्वीय सहायकच बनला. त्यांची चांगली बडदास्त तो ठेवायचा. क्वचित अधूनमधून आमची भेट व्हायची. मध्ये काही वर्षं गेली. एका नव्या नाटकात त्याला छोटी भूमिकाही देण्यात आली. ते काम मी दूरदर्शनवर पाहिलंही. त्यालाही बराच काळ लोटला. शेवटी न राहवून मी राजहंस प्रकाशनामधून पणशीकरांचा फोन क्रमांक घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी फोन लावला. विशेष म्हणजे त्यांनीच तो उचलला.

‘तुमच्याकडे हिरालाल जैन काम करत होता ना?’ मी विचारलं. 

ते ‘हो’ म्हणाले.

‘मग सध्या तो कुठे आहे?’ मी.

‘अहो, तो दोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये वारला,’ पणशीकर म्हणाले.

‘बापरे! काय झालं काय?’

त्यांनी सांगितलं, की हृदयविकाराच्या झटक्यानं तो एकाएकी गेला. मला प्रचंड दु:ख झालं. जवळचा एक मित्र गेला होता. त्याच्यावर पुस्तक लिहिणं राहून गेलं. अजूनही ते काम झालं नाही. होणार का नाही, ते माहीत नाही. 

... पण, ‘‘मित्रा, या लेखाद्वारे मी तुला श्रद्धांजली वाहतो!’ 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search