Next
‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी’
BOI
Tuesday, January 16, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

‘प्लास्टिक पिशव्या द्या आणि कापडी पिशव्या न्या’ या उपक्रमात कापडी पिशव्यांचे अनावरण करताना सुभाष नाचणकर, सी. एल. धुमाळ, अनिकेत कोनकर, महेंद्र घागरे, राहुल पंडित, निमेश नायर आणि सिद्धेश धुळप

रत्नागिरी :
‘सार्वजनिक साफसफाई, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘प्लास्टिक पिशव्या द्या, कापडी पिशव्या घ्या’ यासारखा कल्पक उपक्रम ‘दी गिफ्ट ट्री’सारखी संस्था राबवते, तेव्हा तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. प्लास्टिमुक्त रत्नागिरीसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केले.

रत्नागिरीतील सिद्धेश धुळप या तरुणाने पर्यावरणविषयक कार्यासाठी स्थापन केलेली ‘दी गिफ्ट ट्री’ ही संस्था आणि पुणे येथील ‘हरितमित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ‘प्लास्टिक पिशव्या द्या आणि कापडी पिशवी घेऊन जा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात १४ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील मारुती मंदिर सर्कलमध्ये झालेल्या कार्यक्रमाने झाली. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल पंडित बोलत होते. BytesofIndia.com हे पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल या उपक्रमाचे ऑनलाइन मीडिया पार्टनर आहे.

राहुल पंडित म्हणाले, ‘प्लास्टिक कचऱ्याची अडचण दूर करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. रत्नागिरी नगरपालिकेला आजपर्यंत काही उपविधी (बायलॉज) मंजूर नव्हत्या; मात्र अलीकडेच ते मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा करणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला मिळाले आहेत; मात्र कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा भाग स्वच्छ ठेवला, तरी रत्नागिरी शहर खूप स्वच्छ राहू शकते.’

प्लास्टिक पिशव्या आणलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करताना नगराध्यक्ष राहुल पंडित आणि मान्यवर‘केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर अभियानांतर्गत रत्नागिरीचे सर्वेक्षण करण्यासाठी बाहेरून अधिकारी येतात, ते येथील स्वच्छतेचे विशेष कौतुक करतात. यामध्ये नागरिकांचे सहकार्य मोठे आहे,’ असेही पंडित यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. त्यांनी सिद्धेश धुळपसह अन्य आयोजकांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

‘सकारात्मक आणि समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या उपक्रमांना ‘बाइट्स ऑफ इंडिया’ हे पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देईल,’ असे ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे संपादक अनिकेत कोनकर यांनी सांगितले. ‘हरितमित्र परिवार’चे महेंद्र घागरे आणि सामाजिक वनीकरण विभागाचे सी. एल. धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. आशादीप संस्था, सक्षम ग्रुप आणि राजरत्न प्रतिष्ठान या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन संस्थांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘इव्हेंट मॅनिअॅक’ ही संस्था कार्यक्रमाची इव्हेंट पार्टनर होती.

कार्यक्रमस्थळी अनेक नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या जमा करून त्या बदल्यात कापडी पिशव्या नेल्या. या वेळी दी गिफ्ट ट्री संस्थेचे सिद्धेश धुळप, सामाजिक वनीकरण विभागाचे सुभाष नाचणकर, नगरसेवक निमेश नायर, सुदेश मयेकर, दिशा साळवी, शिल्पा सुर्वे, राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे, राही शिंदे, सक्षम ग्रुपचे प्रतिनिधी, आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर यांसह नागरिक उपस्थित होते. आशादीप संस्थेतील मुलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्याही या वेळी संस्थेतर्फे उपलब्ध करण्यात आल्या.

तुम्हाला हवीय कापडी पिशवी?

‘प्लास्टिक पिशव्या द्या आणि कापडी पिशव्या न्या’ हा उपक्रम रत्नागिरी शहरात सुरू राहणार असल्याचे ‘दी गिफ्ट ट्री’चे सिद्धेश धुळप यांनी सांगितले. नागरिकांनी प्लास्टिकच्या २० पिशव्या दिल्यास त्यांना एक कापडी पिशवी मोफत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. प्लास्टिक पिशव्या इकडे-तिकडे फेकल्या जाऊ नयेत आणि लोकांना कापडी पिशव्या वापरण्याची सवय लागावी, यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी काही संकलन केंद्रे सुरू करणार असून, सध्या एक केंद्र सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिक पिशव्या देण्यासाठी :

गायत्री आइस्क्रीम पार्लर, काँग्रेस भुवन, रत्नागिरी.

सिद्धेश धुळप :
९९७०३ ४८१९७

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search