Next
कचरा नव्हे, ही तर संपत्ती!
कचरा पुनर्वापरामध्ये दापोलीच्या निवेदिता प्रतिष्ठानचे उल्लेखनीय कार्य
BOI
Tuesday, October 09, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेली गिफ्ट आर्टिकल्स

रत्नागिरी :
कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण; पण बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार केल्या आहेत. ही संस्था प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून गिफ्ट आर्टिकल्स, थर्माकोलपासून गोंद (ग्ल्यू), फ्लेक्स-बॅनरपासून ऑफिस फोल्डर तयार करते. लवकरच शेण- गोमूत्रापासून तयार केलेली प्रेझेंट पाकिटे उपलब्ध केली जाणार आहेत. ही पाकिटे वापरानंतर फाडून कुंडीत टाकल्यावर झेंडूची रोपे तयार होतात.

निवेदिता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. संस्थेने टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेल्या विटा संपूर्ण पावसाळाभर पाण्यात ठेवून निरीक्षण करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची उपयुक्तता सिद्ध झाली. संस्थेने दापोलीत रविवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या आणि थंड पेयांच्या बाटल्या आणि ज्याप्रमाणे आपण इस्त्रीला कपडे देतो त्याप्रमाणे प्लास्टिकचा स्वच्छ केलेला कचरा स्वीकारला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच संकलन केंद्र असून, या केंद्राकडे स्वच्छ प्लास्टिक कचरा देऊन निसर्गरक्षणाचे एक वर्तुळ आपण पूर्ण करू शकतो. नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवेदिता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.

दापोलीतील जालगाव येथील सिद्धिविनायक रेसिडेन्सी हे गृहसंकुल संस्थेच्या प्रयत्नांतून कचरामुक्त झाले आहे. या गृहसंकुलात ओल्या कचऱ्याचे खत तयार होते. प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवला जातो आणि सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून ते झाडांना घातले जाते. इतर भंगार, कचरा भंगारवाला घेऊन जातो.

संस्थेतर्फे सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉयरही अवघ्या पाच हजार रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक गृहसंकुल, लेडीज हॉस्टेल, महिलाश्रम आणि पाच घरे मिळून असा एक डिस्ट्रॉयर बसवण्यात आला, तर स्वच्छता होऊ शकते आणि आरोग्यरक्षणही होईल, असा त्यांचा आशावाद आहे. प्रतिष्ठानने शंभर टक्के नैसर्गिक सॅनिटरी नॅपकिनही उपलब्ध केले आहेत. हे नॅपकिन आठ दिवसांत जमिनीत मिसळून जातात. याचा वापर महिलांनी केला, तर आरोग्यरक्षण आणि पर्यावरण संतुलनासाठी हातभार लागेल. 

निवेदिता प्रतिष्ठान, समर्थ भारत व्यासपीठ, अँटी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण सेवा संस्था केअर फॉर नेचर या संस्थांच्या माध्यमातून ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विशेष सहयोगाने ठाणे येथे ३० सप्टेंबर २०१८ रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेमधील चर्चेनुसार पर्यावरण रक्षणार्थ आवश्यक असा मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.

मार्च २०१८मध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दापोलीत एक निवेदन देण्यात आले. कोकणातील प्रत्येक तालुक्यात कचरा पुनर्वापर प्रकल्प उभा करावा आणि कोकण एक आदर्श मॉडेल म्हणून देशासमोर ठेवावे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, त्या वेळी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे राज्याचे वनमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय वन अधिकारी, दापोलीचे तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी आणि वन विभाग दापोली अशा सर्वांना एक निवेदन देण्यात आले होते. १३ कोटी रोपांची लागवड करताना होणारा १३ कोटी प्लास्टिक पिशव्यांचा म्हणजेच सुमारे ४३ हजार किलो कचरा प्रतिष्ठानकडे पाठवल्यास त्याचे सुयोग्य नियोजन करून तो पुनर्वापर प्रकल्पांकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद केले होते; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे परांजपे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी यंत्रणेकडे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे ते म्हणाले आणि सर्वसामान्यांप्रमाणेच वन मंत्रालयालाही दंड करणार का, असा सवालही परांजपे यांनी उपस्थित केला. 

प्लास्टिकच्या पुनर्वापरासंदर्भात निवेदिता प्रतिष्ठान प्रशिक्षणही देते आणि संस्थेने विविध ठिकाणी इको सेंटर्सही उभी केली आहेत. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परांजपे यांनी केले आहे. 

संपर्क :
प्रशांत परांजपे, मु. जालगाव, घर नं. ५५४, दाभोळ मार्ग, ता. दापोली, जि. रत्नागिरी
मोबाइल : ९५६११ ४२०७८
फोन : (०२३५८) २८३२१४

निवेदिता प्रतिष्ठानची इको सेंटर्स
दापोली : मिलिंद जोशी, मधु मिलिंद फार्मा, गिम्हवणे, दापोली
चिपळूण : अनिकेत बापट, जितेंद्रिय, डॉ. आंबेडकर भवनाशेजारी, चिपळूण प्रांत ऑफिसच्या मागे
रत्नागिरी : गौरी सावंत, बाळकृष्ण अपार्टमेंट, साळवी स्टॉप.
सिंधुदुर्ग : मैत्रेयी बांदेकर, समर्थ कृपा कॉम्प्लेक्स, धुरीवाडा, मालवण
ठाणे पश्चिम : जाई कुलकर्णी, ए ५, ६०३, हायलँड गार्डन, ढोकाली, ठाणे
ठाणे पूर्व : स्मिता कुलकर्णी, १/७, कांचनगंगा सोसायटी, मीठबंदर रोड, जिजामाता मंदिराजवळ.

(प्रशांत परांजपे यांचे विचार सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
नूतन प्रशांत परांजपे About 133 Days ago
आमच्या निवेदिता प्रतिष्ठानया संस्थेच्याआणि बाबांच्या पर्यावरण विषयी कार्याची उत्तम दखल घेऊन अचूक वृत्तसंकलन केल्याबद्दल खूप अभिनंदन आणि आभार. नूतन प्रशांत परांजपे.
2
0

Select Language
Share Link