Next
संगीत : विद्या की कला?
BOI
Tuesday, April 23, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


लोकप्रिय संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ यातील कविराज ‘बांके बिहारी’ या पात्राच्या तोंडी लेखकानं मोठी मार्मिक विधानं घातली आहेत. तो म्हणतो, ‘बाहेरून आत येते ती विद्या आणि आतून बाहेर येते ती कला.’ ताल शिकवता येतो, पण लय वरून येतानाच घेऊन यावी लागते, ती शिकवता येत नाही. मला वाटतं विद्या आणि कला यांतील हाच फरक लक्षात घेतला पाहिजे... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत, संगीत ही विद्या आणि कला म्हणून पाहताना त्यातील फरकांबद्दल...
..........................
संगीत शिकणं ही विद्या आत्मसात करणं आहे, तर शिकलेल्या विद्येचं सादरीकरण ही कला आहे. अर्थातच कोणत्याही संदर्भात विद्या आणि कला यांतील हा फरक असतोच. जसं निरनिराळ्या पाककृती पुस्तकांवरून समजून घेणं, निरनिराळ्या पदार्थांचे गुणधर्म माहीत करून घेणं, त्यांचा उपयोग करून नवनवीन पौष्टिक, पण चवदार पाककृती तयार करणं, हा पाकशास्त्राचा अभ्यास झाला आणि यानुसार प्रत्यक्ष चवदार पदार्थ बनवणं आणि तो कलात्मकरीत्या सर्व्ह करणं ही झाली पाककला.

तसं पाहिलं तर ‘विद्या’ आणि ‘कला’ या दोन्ही एकमेकांना पूरक असतात. विद्या ही कलेचा पाया भक्कम करते, परंतु शिकलेली विद्या ही कलेच्या अभावानं, मनोरंजन करण्यास निरुपयोगी ठरते. शेवटी कोणतीही कला ही तिच्या सादरीकरणातून रसिकांना आनंद देण्यासाठी असते, पण तो आनंद देण्याची क्षमता कलाकारात निर्माण करण्याचं काम विद्या करत असते. जसं आधी शास्त्रशुद्ध रीतीनं इमारत उभी करावी लागते, मग तिच्यावर कलाकुसरीनं सुशोभीकरण करता येतं. 

प्रथम विद्या आणि नंतर कला, हे विधान संगीताच्या संदर्भात अगदी बरोबर लागू पडतं. संगीताची मूलतत्त्वं, राग, राग नियम, राग सादरीकरणातील विविध अंगं - आलाप, तान, बोलआलाप, बोलतान, सरगम, लयकारी, विविध गीतप्रकार, निरनिराळ्या तालांतील सोप्या-अवघड बंदिशी, तराणे या सर्वांचं प्राथमिक ज्ञान मिळतं ते विद्याभ्यासातूनच. हे सर्वप्रथम माहित करून घेणं केव्हाही आवश्यकच. याच विद्येच्या भक्कम पायावर बहरलेली कला चिरंजीव ठरते. ही विद्या आत्मसात करण्यासाठी आखून दिलेली योग्य वाट म्हणजे, संगीत विशारद सारख्या पदवी परीक्षेचा आखून दिलेला अभ्यासक्रम. त्या पदवीच्या विद्याभ्यासानंतर, जेव्हा पुढील शिक्षण सुरू होतं, तेव्हा कलेचा विकास सुरू होतो आणि ते उच्च शिक्षण घेताना हा आधीचा शास्त्रशुद्ध पाया उपयोगी पडतो. 

तसं पाहिलं, तर विद्या ही पुस्तकांद्वारे मिळू शकते, पण संगीताच्या बाबतीत ही विद्यासुद्धा गुरुमुखातून मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच तिला ‘गुरुमुखी विद्या’ म्हटलं जातं. ही विद्या गुरूकडून शिकत असतानाच, योग्य गुरूंकडून, योग्य रीतीनं मिळाली, तर अधिक उत्तम. त्यातून गुरू स्वत: मैफली करणारा कलाकार असला (परफॉर्मिंग आर्टिस्ट), तर सुरुवातीपासूनच शिष्याला, सादरीकरणासाठी महत्त्वाची असलेली कलात्मक दृष्टी लाभते आणि कलात्मक सादरीकरणाला पूरक अशा गोष्टी सुरुवातीपासूनच शिकायला मिळतात. आवाज लावण्याची पद्धत, स्वरांचा लगाव, त्यातील गोडवा, प्रसन्न चेहऱ्यानं गाणं, शब्दोच्चार चांगले असणं, उत्तमोत्तम बंदिशींची निवड करणं, शब्द-स्वर-ताल-लय यांची उत्तम सांगड घालून भावपूर्ण स्वराविष्कार करणं, अशा गायन - वादनाचं सौंदर्य वाढवणाऱ्या एक नाही अनेक गोष्टी विद्याभ्यासातून माहिती होतात. 

विद्याभ्यासाच्या कालावधीत एखादा पदवीपर्यंत नेणारा अभ्यासक्रम, डोळसपणे, प्रामाणिकपणे, रियाजाने आत्मसात करून घेतला, तर या पदवीच्या अभ्यासानं तयार झालेला भक्कम पाया, पुढे कलेच्या सादरीकरणाला उपयोगी पडतो. परंतु अभ्यास, रियाज न करता केवळ पास होण्यापुरते मार्क मिळवून पदवी प्रमाणपत्रासाठी केलेली खटपट ही, गुरू-शिष्य आणि परीक्षा पद्धती या सर्वांनाच बदनाम करणारी ठरते.

या पदवीनंतर कलाकार म्हणून त्या शिष्याचं खरं शिक्षण सुरू होतं. या काळात आपल्या गुरूंच्या कार्यक्रमात, तानपुऱ्यावर साथ करून, मैफल रंगवण्याचं तंत्र अनुभवून शिकता येतं. आत्मसात केलेल्या विद्येचं कलेत रुपांतर करताना, त्यात स्वत:चा विचार असणं आवश्यक असतं.

या विद्याभ्यासानंतर होणारा कलेचा विकास साधताना, आणखी काही गोष्टींची आवश्यकता असते. स्वत:ची कला खुलवताना, रियाजाची आवश्यकता, गुरूंचं योग्य मार्गदर्शन, याबरोबरच इतरांच्या कलेचा आस्वाद घेणं, त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करणं आवश्यक असतं. स्वभावात मृदूता, संवेदनशीलता, स्वरभाव जोपासण्याची सौंदर्यदृष्टी यावी लागते. रागांची शुद्धता, ताल-लयींवरची पकड यांवर कटाक्षानं लक्ष ठेवायचं असतं. चमत्कृतीच्या हव्यासापायी किंवा लोकानुनय करण्याच्या मोहापायी स्वत:ची गायकी बिघडू नये, याची काळजी घ्यावी लागते. 

विद्येच्या शास्त्रशुद्ध पायावर कलेचा मनोरा उभा करताना, कलाकारानं त्या कलेला पूर्णपणे शरण जावं लागतं. कलेला संपूर्णपणे वाहून घेण्याची भावना अंगी बाणवली, तर त्याला स्वत:च्या कलेत स्वरांची अनुभूती, लयीची मजा आणि उत्स्फूर्तता अनुभवायला मिळते. कला सादर करताना, कलाकाराने स्वत: त्यातला आनंद घेतला, तर तो श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आणि मैफलीचे सूर जुळून येतात. 

या संगीत कलेच्या क्षेत्रात लोकप्रियता मिळवणं आणि मिळालेली लोकप्रियता किती काळ टिकून ठेवता येणं, हे आधी मिळालेल्या तालमीवर, केलेल्या अभ्यासावर अवलंबून असतं. तुटपुंज्या ज्ञानावर अधिक काळ तग धरता येत नाही, कारण श्रोत्यांना सतत नवनवीन राग-बंदिशी, गीतप्रकार हवे असतात. त्यांना सतत नवीन काहीतरी ऐकवण्यासाठी, कलाकाराला सतत विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वत:ला सिद्ध करावं लागतं. त्याची प्रत्येक मैफल ही जणू, रोज नव्याने परीक्षाच असते. अशा वेळप्रसंगी निरनिराळ्या गुरूंकडून विद्याभ्यास चालू ठेवून, नवीन आत्मसात केलेले, शिकलेले राग आपल्या पद्धतीनं मांडण्याचा वैचारिक रियाजही सतत करावा लागतो. ही विद्या आणि कला यांची सांगड घालणं ज्याला समजतं- जमतं, तोच यशस्वी कलाकार म्हणून दीर्घ काळ रसिकांच्या मनावर राज्य करू शकतो.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kedar Pravin Dhokarikar About 145 Days ago
Thank you so much for this Article
0
0

Select Language
Share Link
 
Search