Next
बोलक्या पुस्तकाची कहाणी
BOI
Monday, May 07, 2018 | 02:34 PM
15 0 0
Share this story


वाचन कमी होतंय, अशी ओरड अलीकडे आपल्याला सतत ऐकू येते. अशा वेळी वाचनसंस्कृतीचं जतन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात असल्याचंही दिसतं. जागतिक पुस्तक दिन अलीकडेच होऊन गेला. तसंच ‘भिलार’ या देशातल्या पहिल्या पुस्तकांच्या गावालाही नुकतंच (चार मे) एक वर्ष पूर्ण झालं. या औचित्याने, माणसं आणि पुस्तकं यांच्यातल्या जुन्या मैत्रीला नवी ओळख देण्यासाठी एका पुस्तकानंच पुढाकार घेतला, तर काय होईल, याचं कल्पनाचित्र रंगवणारी ही कहाणी.... 
............ 
एक आटपाट नगर होतं. त्यात ‘ग्रंथालय’ नावाचं एक मोठं घर होतं. त्या घरात एक कुटुंब राहत असे. त्यात ‘आत्मचरित्र’ नावाचे आजोबा, ‘कादंबरी’ नावाची आजी, ‘ग्रंथ’ नावाचे बाबा, ‘कथा’ नावाची आई, ‘प्रवासवर्णन’ नावाचा दादा, ‘कविता’ नावाची ताई आणि ‘बालकथासंग्रह’ नावाचा चिमुकला अशी मंडळी राहत होती. एका बंद काचेच्या कपाटात त्यांचं आयुष्य खूप छान चाललं होतं. 

एक दिवस खेळताना अचानक चिमुकल्याला त्यांच्या घराजवळ एक नवीन प्राणी दिसला. सुरुवातीला तो खूप घाबरला, ओरडू लागला. तितक्यात त्याचे आजोबा आले. त्यांनी विचारलं, ‘काय झालं..?’ त्यावर तो म्हणाला, ‘मी आत्ता इथे एक मोठ्ठा प्राणी पाहिला..’, ते ऐकून आजोबांनी इकडे-तिकडे पहिले आणि ते त्याला म्हणाले, ‘अरे.. घाबरू नकोस. तो  आपला मित्र, मनुष्यप्राणी आहे. मी जसा तुझा आजोबा आहे, तसेच तेही माणसांमधले आजोबा आहेत. ते आपलं घर स्वच्छ करायला आले असतील. आज ‘जागतिक पुस्तक दिन’ आहे ना..! म्हणजे आपल्या सगळ्यांचा आणि आपल्या ह्या घराचा वाढदिवस. याच आजोबांनी आपलं हे घर बनवलं होतं. मी आणि तुझी आजी लहान असताना, तेच आम्हाला इथे घेऊन आले होते..’ 

हे ऐकल्यावर बालकथासंग्रह थोडा शांत झाला. आता त्याला या नवीन प्राण्याबद्दल म्हणजेच त्या मनुष्यरूपी आजोबांबद्दल कुतूहल वाटू लागले. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी तो आजोबांना म्हणाला, ‘त्यांच्या अजून काही गमती-जमती असतील, तर सांगा ना..’ त्यावर आजोबा बोलते झाले, ‘अरे, ही सगळी माणसं आम्हाला आपल्या या घरून त्यांच्या घरी घेऊन जायची किंवा आपल्या घरी राहूनच, इथे बसूनच आमच्यातील गोष्टी वाचायची. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायचो. एकूणच काय तर, पुस्तकं आणि माणसं पूर्वी एकमेकांचे छान मित्र होते.’ त्यावर बालकथासंग्रह आजोबांना म्हणाला, ‘मी तर असं कधी पाहिलं नाही, की कोणी माणूस मला कधी घरीही घेऊन गेला नाही. माझ्याशी आजवर कोणी अशा गप्पाही मारल्या नाहीत. त्यावर आत्मचरित्र आजोबा त्याला म्हणाले, ‘अरे.. हल्ली माणसं पुस्तकं वाचत नाहीत किंवा खूप कमी वाचतात. टीव्ही, रेडिओ, लॅपटॉप, कम्प्युटर यांमध्ये जास्त वेळ घालवतात.’  यावर बालकथासंग्रह म्हणाला, ‘हे चित्र बदलता येईल का आजोबा..? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी त्या माणसातील आजोबांशी बोलू का..?’ आत्मचरित्र आजोबा म्हणाले, ‘अरे वा चालेल ना.. हे चित्र बदलता आलं तर खूप छान होईल.’ हे बोलताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यावर बालकथासंग्रह म्हणाला ‘आजोबा रडू नका.. ते जुने दिवस आपण नक्की परत आणू, ज्यांत पुस्तकं आणि माणसं एकमेकांचे मित्र होते.

एवढं बोलून बालकथासंग्रहाने माणसातील आजोबांना हाका मारण्यास सुरुवात केली, ‘आजोबा.. ओ आजोबा.. इकडे इकडे.. मी बोलतोय, बोलकं पुस्तक. इकडे या ना.. मला तुमच्याशी बोलायचं आहे’, हे असं सगळं ऐकून मनुष्यरूपातील आजोबांना खूप गंमत वाटली. ते काठी टेकवत टेकवत काचेच्या कपाटाकडे गेले आणि त्याला म्हणाले, ‘बोल रे.. माझ्या छोट्या दोस्ता, मित्रा.. काय म्हणतोस..? कशी काय आठवण काढलीस या आजोबांची..?’ त्यावर बालकथासंग्रहाने आत्मचरित्र आजोबा आणि त्याच्यामधला संवाद त्यांना सांगितला आणि म्हणाला, की ‘हे चित्र आपण बदलू. माझ्याकडे एक आयडिया आहे.’ आजोबाही खूश झाले आणि म्हणाले, ‘अरे वा.. काय आहे तुझी आयडिया.?’  त्यावर तो म्हणाला, ‘मला तुमच्या या शबनममधून तुमच्या घरी घेऊन चला आणि तुमच्या नातवंडांजवळ सोडून द्या. पुढे मी करीन काय ते.’ 

ठरल्याप्रमाणे माणूस आजोबा बालकथासंग्रहाला घरी घेऊन आले. सगळ्या नातवंडांना त्यांनी आवाज देऊन बोलावलं. माझ्याकडे एक गंमत आहे आणि मी ती आता सगळ्यांना देणार आहे. असं सांगूनही कोणीच बाहेर येईना. सगळी मुलं गेम्स, टीव्ही, मोबाइल आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्यग्र होती. आजोबांनी दोन-तीन वेळा आवाज दिल्यावर आणि आजीनं दटावल्यावर एकेक जण बाहेर येऊ लागले. बंड्या येतानाच वैतागून म्हणाला, ‘काय हो आजोबा..? काय गं आजी.. काय आहे? आमचा मस्त गेम्सचा डाव रंगला होता. फिनिशिंगला आला होता.’ तेवढ्यात आजोबांची शबनम उड्या मारू लागली आणि आतून आवाज आला, ‘नमस्कार मित्रांनो..’ हा प्रकार मुले आश्चर्याने बघत होती. बंड्याने शबनम उघडली आणि त्यातून बालकथासंग्रह उडी मारून बाहेर आला. तो बोलू लागला, ‘मी आहे बोलकं पुस्तक.’ बनी म्हणाली, ‘बोलकं पुस्तक’ ही काय भानगड आहे..?’  पुस्तक म्हटल्यावर मुलं एकसुरात म्हणाली, ‘ए तू अभ्यास किंवा तसं एखादं बोअरिंग समर कॅम्पवालं पुस्तक तर नाहीस ना?’ यावर बालकथासंग्रह म्हणाला, ‘अरे मी तुमचा मित्र आहे, मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार, शूरवीरांच्या, परीच्या, प्राणी-पक्ष्यांच्या, साहसी कथा, गाणी, छान गमती-जमती. मग करणार ना माझ्याशी मैत्री?’ 

सगळ्यांना आता मजा येऊ लागली. ‘हो तू आमचा मित्र..’, असं सगळे एकसुरात म्हणाले. त्यावर बालकथासंग्रह त्यांना म्हणाला, ‘मी रोज खूप गोष्टी सांगीन; पण त्यात एक अट आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या आई-बाबांना घेऊन माझ्या घरी यायचं आणि माझं घर स्वच्छ करायचं. त्यातल्या माझ्यासारख्याच काही मित्रांना घरी घेऊन यायचं. त्यांच्याशी गप्पा मारायच्या’, हे ऐकून सगळे खूप खूश झाले आणि त्यानुसार कामाला लागले. ग्रंथालयात येऊन सगळे रोज नवीन गोष्टी ऐकू लागले. ग्रंथालय स्वच्छ करू लागले. नवीन नवीन पुस्तकमित्र घरी घेऊन जाऊ लागले. सुरुवातीला ही सगळी मुलं आजी-आजोबांसोबत येऊ लागली. मग हळूहळू आई-बाबांच्या मागे लागून त्यांना घेऊन येऊ लागली. असं करत करत शहरातील बरीचशी माणसं त्या बालकथासंग्रहाच्या घरी, म्हणजेच ग्रंथालयात येऊ लागली. 

असं करता करता एक वर्ष लोटलं आणि पुन्हा एकदा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणजेच बोलक्या पुस्तकाचा वाढदिवस आला. आता नियमितपणे त्या ग्रंथालयात येणाऱ्या सर्व आबालवृद्धांनी हा पुस्तकाचा वाढदिवस जोमात साजरा करण्याचं ठरवलं. त्यानुसार ग्रंथालयातल्या पुस्तकांनी आणि माणसांनी मिळून तो खूप जोमात साजरा केला. आत्मचरित्र आजोबा आणि माणूस आजोबा या दोघांनीही चिमुकल्या बोलक्या पुस्तकाला जवळ घेतलं. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते दोघेही त्याला म्हणाले, ‘जिंकलंस मित्रा.. आमचे जुने दिवस तू आम्हाला परत आणून दिलेस. माणसं आणि पुस्तकं यांच्यातली ही मैत्री अशीच टिकवून ठेव..’ 

या कथेतली पुस्तकं आणि माणसं यांची नव्यानं मैत्री होऊन, वाचन संस्कृती पुन्हा रुजली. तशीच ती तुम्हां-आम्हांमध्येही रुजो, हीच सदिच्छा. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण... 

- प्रसाद कुलकर्णी, मुक्त लेखक, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swamini.. About 282 Days ago
kaka gosht khupch mast lihily..mala khup aavdli
0
0
Ashwin Channe About 287 Days ago
Too good story, but true.
0
0
Ravindra Muley About 287 Days ago
फारच सुंदर कल्पना! वाचनाकडे वळावे यासाठीची तळमळ कथेतून व्यक्त होतेय
0
0
kiran warke About 288 Days ago
nice
0
0

Select Language
Share Link