पुणे : कृष्ण आणि कृष्णपर्व या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांची उत्सुकता नेहमीच चाळवत असतात. आणि म्हणूनच गायन, नृत्य, कविता, भजने यांमध्ये कृष्ण आपल्याला हमखास भेटतो. असाच कृष्ण अनुभविण्याची संधी येत्या रविवारी, २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील उर्वशी कला सृष्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्ण’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचे. या कार्यक्रमास सर्वांना खुला आणि विनामूल्य प्रवेश आहे.
श्रीकृष्ण व त्यांच्या आयुष्यावर आधारित अनेक कथांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून उर्वशी कला सृष्टीच्या संस्थापिका डॉ. उर्वशी श्रीवास्तव या स्वत: कथक, भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्याच्या एकल आविष्कारातून कृष्ण आपल्यासमोर साकारणार आहेत. या तीन तासाच्या कार्यक्रमात कृष्णावर आधारित गीते, भजने, रचना यांबरोबरच गीत गोविंदम, होळीच्या रचना यांवर डॉ. उर्वशी या नृत्य प्रस्तुती करणार आहेत.
डॉ. उर्वशी श्रीवास्तव या कथक, भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यांगना असून त्यांनी भरतनाट्यममध्ये पीएच.डी मिळविली आहे.
याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून आपल्या ताणतणावावर कशा पद्धतीने मात करावी या विषयातील त्या तज्ज्ञ आहेत. या विषयावर ‘स्ट्रेस मॅनेजमेंट अॅण्ड डान्स’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.
पारंपरिक नृत्य कलांचा प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पारंपरिक कला पोहोचावी या उद्देशाने २००३ मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे उर्वशी कला सृष्टीची स्थापना झाली. त्यानंतर २००६ पासून ही संस्था पुण्यात कार्यरत झाली असून, वाकड, बाणेर, पिंपळे सौदागर या भागात तिच्या शाखा आहेत.