Next
येऊरच्या सोनम तांदळाची चव न्यारी
कमी खर्चात दर्जेदार सेंद्रिय उत्पादनाची जंगलातील आदिवासींची परंपरा
प्रशांत सिनकर
Monday, August 27, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
मुंबई-ठाणे परिसरातील पर्यटकांचे हक्काचे पर्यटनस्थळ असलेले येऊर पावसामुळे हिरवेगार झाले आहे. या येऊरमध्ये गेल्यानंतर हिरव्याकंच निसर्गाच्या सान्निध्यातील रानवाटांवरून फिरताना मध्येच जमिनीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांवर भातशेती केलेली पाहायला मिळते. कोणतीही कृत्रिम रसायने किंवा उपकरणे न वापरता अत्यंत कमी खर्चात भातशेती करण्याची परंपरा येथील आदिवासींनी टिकवून ठेवली आहे. आकाराने बारीक, रंगाने लालसर आणि अत्यंत पौष्टिक व चवदार अशा सोनम जातीच्या तांदळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन हे शेतकरी घेतात. स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून, नैसर्गिक पद्धतीने शेती करून हे आदिवासी आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत. 

मुंबई-ठाण्याचे हृदय म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते. या उद्यानाचा भाग असलेले येऊर पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. वर्षाचे बाराही महिने या परिसरात पर्यटकांची वर्दळ असली, तरी पावसाळ्यात येऊरची नजाकत काही औरच असते. जंगलाच्या पायवाटेने जात असताना एवढ्या गर्द रानात अचानक भातशेती बघून पर्यटकांना कुतुहल वाटते. ती भातशेती म्हणजे तेथील आदिवासींची रोजीरोटी आहे. 

एकीकडे राज्यात, देशात अनेक ठिकाणी रासायनिक खतांसारख्या गोष्टींवरील अवलंबित्व वाढल्यामुळे, तसेच अन्य अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. त्यातूनच मग काही शेतकरी कर्जबाजारी होतात आणि काही जण आत्महत्येसारखा दुर्दैवी पर्याय स्वीकारतात. या पार्श्वभूमीवर येऊर गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी शेतीचे बाह्य गोष्टींवरील अवलंबित्व वाढवलेले नाही. कुटुंबाच्या वर्षभराच्या उपजीविकेसाठी नाचणी व तांदळाचे उत्पादन, खर्च भागविण्यासाठी पालक, मेथी यांसारख्या भाजीपाला उत्पादन, पशुपालन आणि मासेमारी यांवर या आदिवासींचा चरितार्थ चालतो. त्यांच्यापर्यंत शेतीचे कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान पोहोचलेले नाही; मात्र हे आदिवासी अवघ्या एक ते दोन गुंठ्यांमध्ये सुमारे २०० किलो तांदूळ पिकवून सुखाने जगताना दिसतात. पाळलेल्या दुभत्या जनावरांच्या शेणापासून बनलेल्या सेंद्रिय खताचा वापर शेतात केला जातो. 

येऊर आणि परिसरात पसरलेल्या पाड्यांमध्ये बहुतांश आदिवासी शेतकरीवर्ग आहे. पाचवडपाडा, येऊर गाव, वणीचा पाडा आदी ठिकाणचे आदिवासी शेतकरी हा बारीक आणि उच्च प्रतीचा सोनम तांदूळ पिकवतात. शहरी बाजारपेठांमध्ये हा तांदूळ सहसा दिसत नाही. बाजारात ग्राहकांना पॉलिश आणि काही वेळा कृत्रिम सुगंध असलेला तांदूळ मिळतो. तो दिसायला चांगला असला, तरी येथील आदिवासींकडून पिकविला जाणारा तांदूळ त्यापेक्षा अधिक पौष्टिक असतो. हे आदिवासी वर्षभर खाण्यासाठी हा तांदूळ घरातच ठेवतात. घरखर्चासाठी भातासोबत पालक, मेथी, मुळा यांसारख्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात या आदिवासींची शेती असून, पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यावर ही शेती केली जाते. बहुधा या शेतकऱ्यांच्या गरजा सीमित असल्यामुळे ते कर्जबाजारी होताना दिसत नाहीत. 

शेतकरी म्हणतो...
पाचवडपाडा परिसरात राहणारे प्रकाश भांगरे यांनी दिलेली माहिती त्या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रातिनिधिक आहे. ‘आमचे सात जणांचे कुटुंब आहे. त्यापैकी दोन जण मजुरीचे काम करत असून, एक मुलगा आणि दोन मुली शिक्षण घेत आहेत. आमच्या पाड्यात नळाचे पाणी नाही, की वीजही नाही. एका ओढ्याजवळील दीड-दोन गुंठे शेत तयार करून त्यामध्ये आम्ही भात आणि भाजीपाला घेतो. आमच्याकडे शेतीची कोणतीही यंत्रे नसून, आम्ही सर्वजण हाताने शेती करतो. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने आमची ओढ्यातील शेती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते; पण या वर्षी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा सुमारे २०० ते ३०० किलो तांदूळ तयार होईल असे वाटते,’ असे त्यांनी सांगितले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 149 Days ago
Is it possible to use their knowledge in other places ?
0
0

Select Language
Share Link
 
Search