Next
बांधकाम क्षेत्रातील पहिल्या रोबोटिक आकृतिबंधाचे सादरीकरण
‘बीएनसीए’सह देशातील २० विद्यार्थ्यांचा अनोखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प
BOI
Tuesday, July 23, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) सहा विद्यार्थिनींसह देशभरातील २० विद्यार्थ्यांनी रोबोटच्या मदतीने तयार केलेल्या पहिल्या आकृतीबंधाचे सादरीकरण केले. ‘बीएनसीए’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील वास्तूरचनाशास्त्र, तसेच बांधकाम व्यवसायाला हा आकृतीबंध समर्पित करण्यात आला.

स्पेनमधील कॅटलोनिया येथील इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स आर्किटेक्चर व ‘बीएनसीए’तर्फे कार्यशाळेचा हा उपक्रम राबवण्यात आला असून, रोबोट्स इन कन्स्ट्रक्शन ही त्याची मध्यवर्ती संकल्पना होती. त्यातून या आकृतीबंधात अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्यांचा उपयोग करण्यात आला असून, ‘बीएनसीए’च्या डिजिटल फॅब्रिकेशन लॅबोरेटरीत रोबोटचा वापर यासाठी करण्यात आला. २.५ मीटर रुंद, ३.२ मीटर उंच असणार्‍या उमलत्या फुलाचे प्रतिक असणार्‍या तीन पाकळ्या यातून उभारण्यात आला. प्रचलित बांधकाम तंत्राला पूर्ण छेद देताना यात अ‍ॅल्युमिनियमचे १०५ पत्रे भक्कमपणा, समतोल आणि कलात्मकता या तीनही दृष्टीने आकृतीबंधाच्या स्वरूपात उभारण्यात आले होते.

रोबोटचा वापर काही प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात व पुण्यात विशेषत: वाहननिर्मिती क्षेत्रात केला जातो. या क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हे सादरीकरण झाले. त्यावेळी ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, डिजिटल आर्किटेक्चर विभागप्रमुख प्रा. धनश्री सरदेशपांडे, प्रा. स्वप्नील गवांदे, देवा प्रसाद, स्पेनमधील इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स आर्किटेक्चरतर्फे चिराग रंगोलिया, कुणालजीत सिंग चढ्ढा, टाटा मोटर्स कंपनीच्या ऑटोमोशन व रोबोटिक्स विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. अमित भिंगुर्डे आणि गोदरेज कंपनीच्या डिझाइन लॅबोरेटरीचे सहप्रमुख हेन्री स्कुपविनझ उपस्थित होते. सादरीकरणातील ‘बीएनसी’च्या सहा विद्यार्थिनींमध्ये झेबा अन्सारी, अंकिता मानकर, राधिका कुलकर्णी, मिताली अलकरी, गुंजन गांगुर्डे आणि दिशा मोगल यांचा समावेश होता.

या वेळी बोलताना डॉ. कश्यप म्हणाले, ‘रोबोटच्या मदतीने बांधकामे देशातही सुरू होऊन डिजिटल आर्किटेक्चर व रोबोट्चा वापर वाढावा असा त्यामागचा आमचा हेतू आहे. यासाठी औद्योगिक संस्था आणि शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन रोबोटच्या मदतीने बांधकाम क्षेत्रात कोणत्या नव्या शक्यता अजमावता येतील. यासाठी ‘बीएनसीए’ नजिकच्या भविष्यात या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील परिषद घेण्यास तयार आहे. देशभरात रोबोटिक्स तंत्रज्ञान व त्याची आव्हाने पोचावीत, अशी आमची उद्दिष्टे आहेत.’

डिजिटल आर्किटेक्चरच्या विभागप्रमुख प्रा. सरदेशपांडे म्हणाल्या, ‘रोबोटचा वापर करणारे ‘बीएनसीए’ हे देशातील पहिले महाविद्यालय असून, त्यासाठी लागणारी एंड इफेक्टर्स ही महत्त्वाची उपकरणे तेथील प्रयोगशाळेत स्वयंपूर्ण पद्धतीने तयार केली आहेत. प्रा. देवा प्रसाद यांनी अशा प्रकारची दहा एंड इफेक्टस तयार केले असून, त्याचा वापर धातू, प्लास्टिकच्या पत्र्यांना आकार देणे, त्रिमितीय मातीची छपाई, हॉट वायर कटिंग अशी सर्जनशील कामांसाठी केला जातो.’

‘विद्यार्थी दशेतच रोबोटची उपयोगिता व नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी आम्ही ‘बीएनसीए’मध्ये रोबोटचा वापर यापूर्वीच सुरू केला आहे. कार्यशाळेत रोबोटच्या मदतीने उभारण्यात आलेल्या अ‍ॅल्युमिनियम हा आकृतीबंध हा भविष्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एक पुरावा आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. 

संकल्पनेच्या पातळीपासून ते प्रत्यक्ष उभारणीपर्यंत हा आकृतींबंध उभारण्यास सर्व २० विद्यार्थी व मार्गदर्शकांनी दिवसरात्र काम केल्याचे प्रा. गवांदे म्हणाले. रोबोटचा वापर हा वेळ आणि शक्ती या दोन्ही दृष्टिने किफायतशीर असून, खर्चातही मोठी बचत होऊ शकते; तसेच बांधकाम क्षेत्रात तो अधिक सर्जनशील पद्धतीने वापरला जाऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले. चढ्ढा यांनी इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स रिसर्च या संस्थेची माहिती सांगितली.

‘बीएनसीए’सह जगभरात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयावर १६ शहरांमध्ये एकाच वेळी अशा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रोबोटच्या मदतीने काम करण्याचा आनंद व अनुभव आम्हाला घेता आल्याची भावना ‘बीएनसीए’ची विद्यार्थिनी झेबा अन्सारी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search