Next
राकेश मेहरा, जॉर्ज क्युकर, व्हित्तोरिओ डे सिका
BOI
Saturday, July 07, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘भाग मिल्खा भाग’सारखा चरित्रपट करून गाजलेला दिग्दर्शक राकेश मेहरा, अभिनेत्रींचा दिग्दर्शक म्हणून गाजलेला जॉर्ज क्युकर आणि तब्बल चार वेळा दिग्दर्शनाचं ऑस्कर मिळवणारा व्हित्तोरिओ डे सिका यांचा सात जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा परिचय...
.....
राकेश ओमप्रकाश मेहरा 

सात जुलै १९६३ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला राकेश ओमप्रकाश मेहरा हा २१व्या शतकातला उमेदीचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. जाहिरात क्षेत्रासाठी डॉक्युमेंटरीज तयार करून त्याने करिअरची सुरुवात केली. कोक, पेप्सी, अमेरिकन एक्स्प्रेस, टोयोटा यांसारख्या अनेक नामवंत ब्रँड्ससाठी त्याने जाहिराती बनवल्या. एक म्युझिक व्हिडिओ बनवताना त्याला अमिताभ बच्चनबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच पुढे त्याने अमिताभ बच्चनला घेऊन ‘अक्स’ सिनेमा बनवला. त्याला जाणकारांची पसंती मिळाली; पण तो फारसा चालला नाही. कविता गाडगीळ यांनी आपल्या एअरफोर्स पायलट मुलाच्या मृत्यूनंतर दिलेल्या लढ्यापासून प्रेरणा घेऊन त्याभोवती कथा विणून त्याने ‘रंग दे बसंती’ हा सिनेमा बनवला आणि त्या चित्रपटानं प्रचंड यश संपादन केलं. स्क्रीन, झी सिने आणि फिल्मफेअरबरोबरच मानाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा त्याला मिळाला. त्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेला ‘देल्ही-सिक्स’ काही चालला नाही; पण नंतर भारताचा प्रख्यात धावपटू मिल्खासिंगच्या जीवनावर बेतलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा अफाट गाजला आणि त्याही सिनेमाला पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार मिळाले. अलीकडेच त्याचा ‘मिर्झिया’ नावाचा सिनेमा येऊन गेला. त्याला फारसं यश मिळालं नाही. पण त्याच्याकडे एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं.
....     

जॉर्ज क्युकर 

सात जुलै १८९९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जॉर्ज क्युकर हा जवळपास पन्नास वर्षं उत्तमोत्तम दर्जेदार सिनेमे देणारा ख्यातनाम दिग्दर्शक. शिकागोमधून स्टेज मॅनेजर म्हणून त्याने करिअरला सुरुवात केली. पुढे हॉलिवूडमध्ये जाऊन त्याने डायलॉग डायरेक्टर म्हणून ‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ या गाजलेल्या सिनेमासाठी काम केलं. ‘टार्निश्ड लेडी’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिलाच सिनेमा. त्यानंतर त्याने ‘गर्ल्स अबाउट टाउन’ आणि ‘वन अवर विथ यू’ हे दोन सिनेमे केले. त्याला खरी संधी दिली ती डेव्हिड सेल्झनिकने. ‘व्हॉट प्राइझ हॉलिवूड?’ आणि ‘ए स्टार इज बॉर्न’ हे त्याचे सिनेमे गाजले. नंतर आलेल्या ‘डिनर अॅट एट’ आणि ‘लिटल विमेन’चं लोकांनी चांगलं स्वागत केलं. त्यानंतर डेव्हिड कॉपरफिल्ड, सिल्व्हिया स्कार्लेट, रोमिओ अॅन्ड ज्युलिएट, कॅमिल, हॉलिडे, दी विमेन अशी दर्जेदार सिनेमांची रांगच लागली. क्युकरचा तोपर्यंत सर्वांत गाजलेला सिनेमा ठरला तो म्हणजे कॅरी ग्रांट, ऑड्री हेपबर्न आणि जेम्स स्ट्युअर्टचा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा ‘फिलाडेल्फिया स्टोरी.’ त्यानंतरचा त्याचा गाजलेला सिनेमा म्हणजे इंग्रिड बर्गमनचा ‘गॅसलाइट.’ त्याचा ‘अॅडम्स रिब’ हा सिनेमासुद्धा लोकप्रिय झाला. ए लाइफ ऑफ हर ओन, बॉर्न येस्टरडे, पॅट अँड माईक, भोवानी जंक्शन, लेट्स मेक लव्ह असे सिनेमे करत करत त्याचा आणखी एक मास्टरपीस सिनेमा आला तो म्हणजे ‘माय फेअर लेडी.’ यात रेक्स हॅरीसन आणि ऑड्री हेपबर्नने कमाल केली होती. ‘लव्ह अमंग दी रुइन्स’ आणि ‘दी कॉर्न इज ग्रीन’ हे त्याचे नंतरचे काही ठळक सिनेमे. स्पेन्सर ट्रेसी, लॉरेन्स ऑलिव्हिए अशा नटांबरोबर सिनेमे करत असताना क्युकरने प्रामुख्याने कॅथरीन हेपबर्न, जीन हार्लो, नॉर्मा शिअरर, जोन क्रॉफर्ड, जॅकलीन बिसेट, ऑड्री हेपबर्न, ग्रेटा गार्बो, रोझलिंड रसेल, क्लॉदेट कॉल्बर्ट, विव्हियन ली, लाना टर्नर, एव्हा गार्डनर, मेरलिन मन्रो, जेन फोंडा अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर उत्तमोत्तम सिनेमे केले. त्यामुळे तो ‘अभिनेत्रींचा दिग्दर्शक’ म्हणूनही ओळखला गेला. त्याला उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पाच वेळा ऑस्करचं नामांकन मिळालं होतं आणि एकदा ऑस्कर मिळाला. २४ जानेवारी १९८३ रोजी त्याचा लॉस एंजेलिसमध्ये मृत्यू झाला.
.....

व्हित्तोरिओ डे सिका 

सात जुलै १९०२ रोजी लाझिओमध्ये (इटली) जन्मलेला व्हित्तोरिओ डे सिका हा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून विख्यात आहे. १९४० आणि ५० या दोन दशकांचा काळ आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या संदर्भात सुवर्णयुगच मानला जातो. त्या काळात जे वास्तववादी दिग्दर्शक ठसा उमटवून गेले त्यांत डे सिकाचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्याने दिग्दर्शित केलेल्या चार फिल्म्सना ऑस्करचा बहुमान मिळाला आहे. शू शाइन, बायसिकल थीफ, येस्टरडे टुडे अॅन्ड टुमॉरो, दी गार्डन ऑफ दी फिन्झी कॉन्टिनीज असे ते चार जबरदस्त सिनेमे होते. ‘बायसिकल थीफ’ तर भल्याभल्यांनी कौतुक करून अभ्यासावा असाच! त्याला ‘फेअरवेल टू आर्म्स’मधल्या भूमिकेबद्दल अभिनयासाठीसुद्धा त्याला ऑस्कर नामांकन मिळालं होतं. १३ नोव्हेंबर १९७४ रोजी त्याचा फ्रान्समध्ये मृत्यू झाला. 

यांचाही आज जन्मदिन :

भाषाशास्त्रज्ञ रामकृष्ण गोपाळ भांडारकर : सात जुलै १८३७-२४ ऑगस्ट १९२५ (त्यांच्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link