Next
जो यंत्रावर विसंबला, त्याचा ‘प्रचार’ बुडाला...!
BOI
Monday, April 08, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गुगल ट्रान्स्लेट सेवा असो किंवा अन्य कोणतीही यंत्राधारित सेवा असो, ती आपल्याला भाषांतर करण्यासाठी बहुमोल मदत करू शकते; मात्र त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. मूळ भाषकांपर्यंत जायचे असेल, तर त्याला मानवी स्पर्श मिळणे अत्यावश्यक आहे, हा धडा अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या गफलतीतून मिळाला आहे.
..........
यंत्रे ही मानवाच्या मदतीसाठी असतात; मात्र यंत्रांवर पूर्णपणे विसंबून राहणे हे धोक्याचे असते. भाषेच्या बाबतीत तर ही गोष्ट नेहमी लक्षात घेण्यासारखी आहे. अमेरिकेतील अध्यक्षपद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जी गफलत केली, त्यातून हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे. अमेरिकन संस्कृतीचा डंका जगभर वाजत असताना व त्यामुळे जगभरातील मूळ भाषांच्या अस्तित्वावर गदा येत असताना खुद्द अमेरिकेत मात्र द्विभाषिक व्यवस्थेचे पडघम वाजत आहेत. शेजारच्या कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही इंग्रजीसह अन्य भाषेला व्यवहारभाषा म्हणून मान्यता मिळायची चिन्हे आहेत. ही दुसरी भाषा असणार आहे स्पॅनिश. या दुसऱ्या भाषेत संवाद साधताना राजकीय नेत्यांना ज्या कसरती कराव्या लागतात, त्याही या निमित्ताने पुढे आल्या. 

अमेरिकेच्या आजूबाजूला स्पॅनिश भाषक देशांची मोठी संख्या आहे. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषक निर्वासित मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतर करत असतात. त्यांच्यामुळे स्पॅनिश भाषकांची संख्या नजीकच्या काळात इंग्रजी भाषकांच्या संख्येला ओलांडून जाण्याची शक्याता निर्माण झाली आहे. तिथून सातत्याने निर्वासित येत असल्याने ‘त्या भाषेला मरण नाही’, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसचीही स्पॅनिश आवृत्ती ३० वर्षांपासून कार्यरत होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक मोहिमेत स्थलांतरित आणि स्पॅनिश भाषकांविरुद्ध भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्हाइट हाउसची स्पॅनिश आवृत्ती बंद करण्यात आली. ओबामांच्या काळात या आवृत्तीत हिस्पॅनिक समुदायाला उद्देशून माहिती असायची; मात्र ट्रम्प हा अपवाद, एरव्ही स्पॅनिश भाषक हे अमेरिकी नेत्यांसाठी हक्काचे मतदार आहेत. आजच्या घडीला या मतदारांकडे दुर्लक्ष करणे कोणालाही शक्य नाही. 

अमेरिकेच्या जनगणना खात्याच्या अंदाजानुसार, २०५० सालापर्यंत देशात हिस्पॅनिक-अमेरिकन वंशाच्या लोकांची संख्या तिपटीने वाढून ती १० कोटी ३० लाख होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येत त्यांचा वाटा २४.४ टक्के असेल आणि मूळ अमेरिकनांचा वाटा २०५०मध्ये ५०.१ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, असे या खात्याने म्हटले आहे. आजच्या घडीला अमेरिकेत दोन कोटी ७० लाख लॅटिनो मतदार असल्याचे व्होटो लॅटिनो या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या मतदारांना साद घालण्यासाठी सर्व नेत्यांनी स्पॅनिश भाषेतून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. 

प्रचाराची ही पद्धत रूढ होऊनही अनेक वर्षे झाली. जॉर्ज डब्ल्यू. बुश ज्युनिअर यांनी २००४ सालच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान हिस्पॅनिक लोकांमध्ये प्रचार करताना अनेकदा स्पॅनिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे मुख्य स्पर्धक जॉन केरी यांनीही तोच मार्ग चोखाळला होता. हे चालू असतानाच, २०१२ साली प्रचार करताना ओबामा यांनी हिस्पॅनिक मतदारांना रिझविण्यासाठी खास स्पॅनिश भाषेतील संकेतस्थळ चालू केले. त्यांच्या मुख्य संकेतस्थळाचीच ही स्पॅनिश आवृत्ती होती. त्याशिवाय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून स्पॅनिशमधून पत्रेही पाठविण्यात आली. त्यांचे अनुकरण सर्वच नेत्यांनी केले. त्यातही लॅटिनो किंवा हिस्पॅनिक मतदार हा डेमोक्रॅटिक पक्षाचा मूळ आधार मानला जातो. त्यामुळे त्या पक्षासाठी तो आवश्यक उपचार बनला आणि तेव्हापासून आपल्या संकेतस्थळाची स्पॅनिश आवृत्ती सुरू करण्याचा राजमार्ग तयार झाला. 

आता याच राजमार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात अनेकांची फजिती झाली आहे. त्याला कारण ठरला आहे त्यांचा आळस आणि गुगल ट्रान्स्लेट नावाच्या जादूच्या दिव्याची गंमत! इंग्रजीचा मजकूर स्पॅनिशमध्ये भाषांतरित करण्यासाठी गुगल ट्रान्स्लेटच्या सेवेचा वापर करण्याची युक्ती बहुतेक विद्यार्थी वापरतात. तीच युक्ती डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांनी वापरली. व्हाइट हाउसमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांनी हाच मार्ग चोखाळला. ‘गुगल ट्रान्स्लेट’वरील मजकूर त्यांनी मामुली फेरबदल करून वापरला. त्यामुळे अनेक गमतीजमती समोर आल्या आहेत. मतदारांसमोर भलताच संदेश गेल्याचीही उदाहरणेही घडली आहेत. 

स्रोत : Politico.com

पॉलिटिको या संकेतस्थळाने अशा अनेक उमेदवारांच्या संकेतस्थळांच्या स्पॅनिश आवृत्त्यांची तपासणी केली. तेव्हा त्या प्रत्येक संकेतस्थळांवर लहानमोठ्या अनेक चुका होत्या. यामध्ये किरकोळ मुद्रणदोषापासून अनाकलनीय लांबच लांब परिच्छेदापर्यंत अनेक गफलती दिसून आल्या. उदाहरणार्थ, भारतीय मूळ असलेल्या कमला हॅरिस यांच्या संकेतस्थळावर झालेली गंमत. आपण अमेरिकी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले जीवन ‘व्यर्थ’ घालविल्याचे त्यांनी एके ठिकाणी लिहिले होते. ‘जीवन घालविले’ असे त्यांना म्हणायचे होते. ‘गॅस्टर’ या क्रियापदाचा चुकीचा वापर झाल्यामुळे ही चूक झाली होती. अमेरिकी संसदेच्या एका कर्मचाऱ्याने ट्विटरवरून ही चूक लक्षात आणून दिली, तेव्हा हॅरिस यांनी नंतर आपली चूक सुधारली. आता त्यांचे स्पॅनिश संकेतस्थळ जवळपास त्रुटीमुक्त करण्यात आले आहे. तसेच एक मार्च रोजी त्यांनी नेवाडा येथे केलेल्या प्रचाराचे स्पॅनिश भाषांतर तातडीने पुरविण्यात आले होते.

गंमत म्हणझे ज्युलियन कॅस्ट्रो हे अध्यक्षपदाचे एक इच्छुक स्वतः हिस्पॅनिक (लॅटिनो) समुदायातील आहेत; मात्र त्यांचे स्पॅनिशचे ज्ञान जुजबी आहे. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे त्यांनी इंग्रजी व स्पॅनिश या दोन्ही भाषांमध्ये आपली उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याही स्पॅनिश संकेतस्थळात व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. ‘मी थोडेफार स्पॅनिश बोलतो; पण मी त्यात पारंगत नाही,’ असे कॅस्ट्रो यांनी एका मुलाखतीत सांगितले. यांच्याशिवाय बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरेन आणि अॅमी क्लोबुचर अशा अनेक इच्छुकांच्या संकेतस्थळांचीही पडताळणी करण्यात आली. तेव्हा थोड्या-फार फरकाने हेच चित्र आढळले. 

कोणत्याही व्यक्तीशी त्याच्या स्वतःच्या भाषेतून संवाद साधल्यास आपुलकी निर्माण होते. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी हा उपक्रम सुरू केलाय, त्यात वावगे काही नाही; मात्र त्यांचा चांगला हेतू राहिला भलतीकडेच आणि या विचित्र भाषांतरामुळे उलटाच परिणाम होण्याची शंका वर्तविण्यात येत आहे. हे उमेदवार सामान्य इंग्रजीतून स्पॅनिश भाषांतरही गांभीर्याने घेणार नसतील, तर आपल्या हितांसाठी ते काय प्रयत्न करणार, असा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

गुगल ट्रान्स्लेट सेवा असो किंवा अन्य कोणतीही यंत्राधारित सेवा असो, ती आपल्याला भाषांतर करण्यासाठी बहुमोल मदत करू शकते; मात्र त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. मूळ भाषकांपर्यंत जायचे असेल, तर त्याला मानवी स्पर्श मिळणे अत्यावश्यक आहे, हा धडा या निमित्ताने मिळाला आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search