Next
कोल्हापूरची ‘क्रिकेट’क्वीन अनुजा
BOI
Friday, February 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अनुजा पाटील

पुण्याची स्मृती मानधना किंवा कोल्हापूरची अनुजा पाटील, या मुलींनी भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्राला संधी मिळवून दिली आहे. केवळ संधी दिली इतकेच नव्हे, तर संघातील आपले स्थानही पक्के केले आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मुली निदान किक्रेटमध्ये तरी यशस्वी होताना दिसत नव्हत्या. अनुजा आता केवळ पंचवीस वर्षांची असून तिच्यासमोर खूप मोठी कारकीर्द घडविण्याची संधी आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख क्रिकेटपटू अनुजा पाटीलबद्दल...
....................
कोल्हापूरचे नाव घेतले, की लगेच समोर येतो तो रांगडा कुस्तीचा खेळ; पण क्रिकेटच्या आवडीने थेट भारताच्या महिला ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झालेल्या मराठमोळ्या अनुजा पाटीलने या शहरात वेगळाच पायंडा पाडला. अनुजाकडून प्रेरणा घेत आता याच मातीत अनेक मुली क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी सज्ज होतील.

१९९२ साली कोल्हापुरात कुस्तीच्या वातावरणात जन्मलेली अनुजा क्रिकेटकडे कशी वळली, याचे सर्व शहराला कौतुक वाटत आहे. तिचे बाबा सॉ मिलमधून निवृत्त झाले आहेत, तर काका पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. घरातून अनुजाच्या कारकिर्दीला पूर्ण पाठिंबा आहे. पाटणे हायस्कूलमध्ये शिकत असताना तिने भोसले सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर अनिल सांगावकर यांच्याकडे ती सध्या सराव करते. वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजही आहे.

शालेय, महाविद्यालयीन, क्लब आणि जिल्हा व राज्य स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने अनुजाची वर्णी महाराष्ट्राच्या संघात लागली आणि आता तर राष्ट्रीय पातळीवर ‘अ’ संघाचे नेतृत्व करताना तिला महाराष्ट्राच्या संघनेतृत्वाचा अनुभव कामी येणार आहे. मागील वर्षी महत्त्वाच्या ठरलेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी महिला ‘अ’ संघाच्या कर्णधारपदीही तिची नियुक्ती करण्यात आली होती.  

कोल्हापूर व पुण्यात असताना रोज पाच-पाच तास सराव करण्याबरोबरच अनुजा आपल्या तंदुरुस्तीबद्दलही दक्ष आहे. कोल्हापूरमध्ये तर ती सराव करत असताना तिला पाहण्यासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी आणि सेल्फी काढण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यासाठीही शेकडो क्रिकेट रसिक मैदानावर गर्दी करतात. एक मुलगी साध्या कौटुंबिक वातावरणात वाढलेली, परंतु स्वप्न मात्र देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे, हेच अनुजाने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. 

२०१२मध्ये श्रीलंकेत झालेल्या टी-२० स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या अनुजाने त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आजवर ११ टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत अनुजाने गोलंदाजीत चमक दाखवत ५२ बळी घेतले आहेत. याशिवाय तिने श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया, थायलंडचेही दौरे केले आहेत. २०१२च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ती भारताकडून तीन सामने खेळली आहे. त्यातील पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध महत्त्वाच्या क्षणी उत्तम खेळी करत संघाला आश्चर्यकारक विजय मिळवून दिला होता. दरम्यान, तिने भारताचा महिला संघ, इंडिया ग्रीन संघ, महाराष्ट्र संघ आणि इंडिया रेड आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

पुण्याची स्मृती मानधना किंवा कोल्हापूरची अनुजा पाटील, या मुलींनी भारतीय संघात महाराष्ट्राला संधी मिळवून दिली आहे. केवळ संधी दिली इतकेच नव्हे, तर आपले संघातील स्थानही पक्के केले आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मुली निदान क्रिकेटमध्ये तरी यशस्वी होताना दिसत नव्हत्या. अनुजा आता केवळ पंचवीस वर्षांची असून तिच्यासमोर खूप मोठी कारकीर्द घडविण्याची संधी आहे. २००९पासून ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. २०१३मध्ये अनुजा सर्वांत जास्त स्पर्धा खेळली व त्यात केलेल्या कामगिरीमुळेच तिला भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. आजवर ५५ टी-२० लढतीत तिने १५५ धावा केल्या आहेत. २१ बळीही मिळवले आहेत. या लढतींमध्ये तिने घेतलेले झेलही खूप चर्चिले गेले आहेत.  

भारतीय खेळाडू आता क्षेत्ररक्षणात परदेशी संघांच्या तुलनेत सरस ठरत असल्याचे पुरुष संघापाठोपाठ आता महिला संघानेही सिद्ध केले आहे. अनुजा आजवर वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक चार सामने खेळली आहे. तिची भारतापेक्षा परदेशातील, विशेषतः बँकॉकमधील कामगिरी जास्त चर्चेत राहिली आहे. तिथे तिने नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, थायलंड संघांविरुद्ध धावाही केल्या आहेत आणि गोलंदाजीतही चमक दाखवली आहे.  

मिताली राजकोल्हापूर - पुणे आणि आता भारतीय संघाची कर्णधार असा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. तिच्या कामगिरीचा आजवरचा आलेख पहिला, तर ती मिताली राजप्रमाणे प्रदीर्घ काळ भारतासाठी खेळू शकेल असे वाटते. अर्थात त्यासाठी पुढील काळात तिला भरीव आणि सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.

मध्यंतरी अनुजा एका मोठ्या वादात सापडली होती. श्रीलंकेत तिच्यासह खेळणाऱ्या एका खेळाडूच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यावर काही आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबाबत अनुजाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या वेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने तिचे सदस्यत्वही रद्द केले होते. नंतर महाराष्ट्र क्रिकेट संघाने हे प्रकरण सोडवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सुपूर्द केले होते. हा खटला अद्याप सुरू आहे असे सांगण्यात येते.

त्या वेळी आपली कारकीर्द धोक्यात येईल अशी भीती वाटल्याने अनुजाकडून ही चूक झाली होती, असे कोल्हापूर संघटनेचे काही पदाधिकारी म्हणत होते. अखेर माफीनाम्यानंतर हा तिढा सुटला व अनुजासाठी क्रिकेटची कारकीर्द पुन्हा एकदा सुरू झाली. आता तिने मागचे सगळे विसरून कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले, तर भारताला एक भक्कम अष्टपैलू खेळाडू मिळेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search