Next
मेरा जीवन कोरा कागज़...
BOI
Sunday, April 07, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अनेक चित्रपटांमधून अभिनयाचा वेगळा आविष्कार दाखवून एक काळ गाजविणाऱ्या अभिनेत्री म्हणजे जया भादुरी-बच्चन. नऊ एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्या औचित्याने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या त्यांचे अभिनयसामर्थ्य दाखविणारे ‘मेरा जीवन कोरा कागज़... ’ हे गीत...
..........
वैजयंतीमाला, मधुबाला, मीनाकुमारी अशा चित्रपटसृष्टीतील रूपसुंदरींची भुरळ मला कॉलेजजीवनात पडली होती; पण त्या साऱ्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्याने व पडद्यावर एकेका महान नायकांबरोबर त्यांना बघत असल्यामुळे त्या खूप खूप दूरच्या वाटायच्या! आणि चित्रपटाची नशा माझ्यावर अंमल करत असतानाच्या ‘त्या’ काळात बदामी डोळ्यांची हेमा मालिनीही लांबचीच वाटायची; पण आपल्या बरोबरची, जवळची अशी वाटावी, अशी एक अभिनेत्री होती. 

जेमतेम पाच फुटांच्या आतबाहेर अशी ‘तिची’ उंची! तब्येतीने तशी ‘ती’ यथातथाच होती; पण ‘तिचा’ चेहरा मात्र तरतरीत, टवटवीत असायचा. तो गोल आणि नितळ होता व बोलकाही होता. डोळे मोठ्ठे होते; पण पाणीदार होते. डोळ्याचे केस दाट व लांबसडक! केशरचना अशी, की एक बट स्वतंत्रपणे दिसायची, तिच्या चेहऱ्याची शोभा वाढवायची. मला वाटते, एके काळी अभिनेत्री साधनाची केशरचना त्या काळातल्या तरुणींनी आपलीशी केली होती. आणि साधनानंतर ‘हिचीच’ ही केसाची बट, केशरचना अनेक तरुणींनी उचलली आणि त्या स्वत: ला ‘जया भादुरी’ समजायला लागल्या होत्या!

होय! वाचकहो त्या काळातल्या माझ्यासारख्या अनेक तरुणांना जया भादुरी आवडायची! तिची ती दोन खांद्यांवरून पदर घेण्याची पद्धत, एक वेणी, स्वतंत्र अस्तित्व दाखवणारी केसाची बट या गोष्टी अनेक तरुणींनी उचलल्या होत्या व तीही अशी जया भादुरी अनेकांना आपल्या बरोबरीची वाटे! एकदम साधीसुधी; पण तरीही आकर्षक आणि सुंदर!

... पण भोपाळमधील एका पत्रकाराची मुलगी असणाऱ्या जया भादुरीजवळ फक्त एक आकर्षक रूपच होते असे नव्हे, तर त्याच्या जोडीला अभिनयाची जाणही होती. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्या अभिनयाला तिने झळाळी प्राप्त करून घेतली. त्यातील बारकावे शिकून घेतले होते. तेव्हा तेथे अनिल धवन, शत्रुघ्न सिन्हा हे तिचे सहाध्यायी होते. 

जया भादुरी ‘त्या’ वयात आपलीशी वाटायची; पण तिची माहिती मिळाल्यावर कळले, की ती आपल्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. नऊ एप्रिल १९४८ ही तिची जन्मतारीख! तिच्या वाढदिवसाच्या निमिताने तिच्याबद्दल काही लिहावे, ही काही वर्षांपूर्वीची इच्छा आज पूर्ण होत आहे. आता अर्थात ती ७१ वर्षांची झाली आहे. त्यामुळे तिला एकेरी नावाने संबोधणे भूतकाळात घडायचे, तसे आता न घडता ‘त्यांना’ हा शब्दप्रयोग आवश्यक ठरतो. तशातच ‘त्या’ विवाहानंतर सौ. बच्चन आहेत. महानायकाची पत्नी असल्यानेही आदरयुक्त संबोधणेच योग्य ठरते. आणि या दोन्हीबरोबरच आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अभिनेत्री जया भादुरी! 

होय! ‘त्यांनी’ आपल्या पहिल्या चित्रपटापासून आपल्या अभिनयसामर्थ्याची झलक दाखवण्यास सुरुवात केली होती. हृषीकेश मुखर्जींचा ‘गुड्डी’ हा सिनेमा तसा नायिकाप्रधानच होता. सिनेमाचे वेड असलेली शाळकरी वयातील ‘ती’ जया भादुरी अनेकांना आज आठवत असेल! त्या पहिल्या चित्रपटातच तिला एक संवाद होता. ‘ऐसी अॅक्टिंग की, के मीनाकुमारी की छुट्टी कर दी!’ तिचा हा संवाद भविष्यकाळातील जया भादुरी या अभिनेत्रीच्या कर्तृत्वाच्या संदेश देणारा इशारा होता. 

जया भादुरी यांच्या कामात एक लोभस सहजता होती. आपल्या नैसर्गिक व लाघवी सहजतेने त्यांनी अल्प कालावधीत प्रेक्षकांना जिंकून घेतले. अर्थात त्यांनी जेमतेम २५ चित्रपटांत काम केले. त्यातील बहुतेक चित्रपटांतील ‘त्यांच्या’ भूमिकेचे रसिकांनी कौतुक केले. ‘त्यांची’ चित्रपटाची निवडही अचूक असायची! (अपवाद - एक नजर, बन्सी बिर्जू , दुसरी सीता) त्यामुळेच ‘त्यांची’ ‘जंजीर’मधील चाकू-सुऱ्यांना धार लावणारी आवडायची, तसेच ‘त्यांचे’ मिली, कोशिश, कोरा कागज़, सिलसिला हे चित्रपट आवर्जून त्यांच्या कामाकरिता बघावे असे होते. 

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांचे जास्त चित्रपट आहेत; पण संजीवकुमारबरोबरही त्यांनी तोडीस तोड अभिनयाचे रंग दाखवले होते. त्याची साक्ष अनामिका, नौकर, नया दिन नयी रात आणि कोशिश हे चित्रपट देतात. जितेंद्र, मनोजकुमार, रणधीर कपूर, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, अनिल धवन, विजय आनंद अशा नायकांबरोबर काम करून चित्रपट क्षेत्रात आपली एक वेगळी मुद्रा उठवू शकणाऱ्या जया भादुरी यांचा तीन जून १९७३ रोजी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर विवाह झाला आणि अल्प कालावधीतच ‘त्या’ संसारात रमल्या! चित्रपटसृष्टीत रोज नवीन नायिका येत असते आणि जुन्यातील एक चित्रपटसृष्टीतून बाहेर पडत असते; तसेच तेव्हा घडले. 

जया भादुरी नावाची नटी ‘अँग्री यंग मॅन’ची पत्नी म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे काळ बदलत गेला आणि जया भादुरी यांचा सुरुवातीच्या काळातला रसरशीत चेहराही ओढलेला, निबर असा दिसू लागला. अशा जया भादुरी ‘सिलसिला’ चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांपुढे आल्या! पण ‘सिलसिला’ चालला नाही. त्यामागची कारणे अनेक आहेत; पण त्यामधील एक कारण प्रेक्षकांना भावलेली जया भादुरी त्यात दिसली नाही, हे आहे. जया भादुरी पुन्हा पडद्याआड गेल्या! आणि पुन्हा काही काळ गेल्यावर ‘फिजा’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा काही चित्रपटांमधून ‘त्या’ चरित्र नायिकेच्या भूमिकेत दिसून आल्या; पण... अब वो बात नहीं रहीं! आणि काळाच्या ओघात हे असेच घडायचे, अशी समजूत आमच्या मनाने घातली. 

जरा सा उसको  छुआ तो उसने मचा दिया शोर’ असे गाणारी ‘शोर’मधील जया भादुरी, ‘शोले’मध्ये अखेरीस अमिताभ मरण पावतो, तेव्हा शोक करणारी जया भादुरी, ‘कोशिश’मध्ये एकही संवाद नसतानाही चेहऱ्यावरच्या रेषारेषांतून बोलणारी जया भादुरी अशी तिची अनेक रूपे आमचा चित्रपटाचा आनंद द्विगुणित करणारी होती हे मात्र विसरता येत नाही. ‘रुठे रुठे पिया...’, ‘मैंने कहाँ फुलोंसे...’, ‘चक्कू छुरीयाँ धार करा लो..’, ‘पल्लो लटके रे मारो...’, ‘अगर साज छेडा तराने बनेंगे...’,  ‘सा रे के सारे ग म को लेकर...’ अशी त्यांच्यावर चित्रित झालेली गीते आजही पुन्हा बघताना ‘त्यांचे’ ते लोभसवाणे रूप मनाला आनंद देते.

अमिताभ बच्चन यांचीच नव्हे, तर अभिषेक बच्चन यांचीही कारकीर्द उभारण्यात जया भादुरी यांचा मोठा सहभाग आहे. ‘अभिमान’ चित्रपट, त्यातील गीते आणि त्यामधील त्यांची भूमिका त्यांच्या जीवनाशी निगडित होती, असा समज चित्रपटप्रेमींनी करून घेतला. त्यात कितपत तथ्य आहे, हा प्रश्न तसा अनुत्तरितच आहे; पण एवढे खरे, की आपल्या अभिनयाचे वेगळे पैलू दाखवून नंतर फक्त घर-गृहस्थी सांभाळणाऱ्या जया भादुरी या ‘त्या’ विशिष्ट काळानंतर फक्त ‘गुड्डी’ न राहता बच्चन कुटुंबीयांचा आधारस्तंभ बनून गेल्या, जो स्तंभ पतीला व मुलांना दोघांनाही सांभाळून घेतो. 

अशा जया भादुरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांच्यावर चित्रित झालेले आणि किशोरकुमार यांनी तन्मयतेने गायलेले एक ‘सुनहरे गीत’ आपण आज पहाणार आहोत. १९७४च्या दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘कोरा कागज़’ चित्रपटातील हे गीत आहे. संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने तीनच गाणी या चित्रपटाकरिता संगीतबद्ध केली होती; पण तिन्ही गीते वेगवेगळ्या भावनांची होती व त्या अनुषंगाने सुमधुर संगीतामध्ये ती गुंफली होती. तोच प्रकार गीतकार एम. जी. हशमत यांचा - चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने लिहिलेली तीनच गीते - अत्यंत समर्पक आशयाची! 

‘कोरा कागज़’ चित्रपटाची कथा तशी सर्वसामान्य कुटुंबात घडणारी! मुलगी लग्न करून सासरी पाठवल्यावर तिच्या संसारात त्या मुलीच्या आई-वडिलांनी नको इतका हस्तक्षेप केला, (सभ्य भाषेत सांगायचे, तर नको इतके नाक खुपसले की) तर एकमेकांशी मिळतेजुळते घेत संसार करणाऱ्या त्या पती-पत्नीच्या संसाराची कशी वाताहत होते, याची कहाणी म्हणजे ‘कोरा कागज़’ हा चित्रपट होता. विजय आनंद आणि जया भादुरी हे चित्रपटाचे नायक-नायिका होते. 

संसारात अशी स्थिती वाट्याला आलेल्या पत्नीच्या मनात भावभावनांचे काय वादळ उद्भवते, ते दर्शवणारे गीत शायर एम. जी. हश्मत यांनी अत्यंत उत्कृष्ट शब्दांत, उपमांचा वापर करून लिहिले होते. कल्याणजी-आनंदजी यांची प्रभावी चाल व वाद्यमेळ आणि किशोरकुमार यांचा ‘शोर’ न करणारा दर्दभरा आवाज! हो - नायिकेची मन:स्थिती दाखवणारे, पण नायिकेच्या तोंडी नसलेले हे गीत एका चेहराविरहित आवाजाचे आहे. हिंदी चित्रपटातील या पद्धतीची गीते हा एक स्वतंत्र विषय आहे. 

तर हे असे वेगळे, पण सुनहरे, दर्दभरे गीत नायिकेची मन:स्थिती कशा स्वरूपात व्यक्त करते बघा - 

जो लिखा था आँसुओंके संग बह गया

कवी येथे मानवी जीवनाला कागदाची उपमा देतो. आपण जन्माला येतो तेव्हा आपले जीवन कोऱ्या कागदासारखे असते. पुढे आपण लहानाचे मोठे होतो आणि ओघानेच आपल्या जीवनात आलेल्या प्रिय व्यक्तीचे (व्यक्तींचे) व आपले छान जमून जाते. त्यांच्याशिवाय आपले जीवन जगणे शक्यच होत नाही. ओघानेच आपल्या जीवनरूपी कोऱ्या कागदावर आपण त्यांचे नाव लिहितो. 

(पण माझे दुर्दैव बघा, की) माझे जीवन कोरा कागद होते आणि ते अखेरपर्यंत तसेच राहिले. माझ्या जीवनाचा हा कोरा कागद कोराच राहिला. (त्याच्यावर मी काही लिहिले नाही असे नाही; पण) जे काही लिहिले, ते अश्रूंमुळे पुसले गेले. (जे माझ्या जीवनात सर्वस्व बनून आले ते दुरावले गेले व मी एकटीच राहिले.) 

मुखडा असा दोन ओळींत प्रभावी करून ही शोकांतिका पुढे सांगताना कवी लिहितो - 

एक हवा का झोका आया टूटा डाली से फूल 
ना पवन की ना चमन की किसी की है ये भूल 
खो गयी खुशबू हवा में कुछ न रह गया

(नियतीचे) वारे कसे वाहिले बघा, की त्यामुळे (माझ्या प्रीतीचे) फूल फांदीवरून तुटून पडले. (त्यामध्ये) ना वाऱ्याचा दोष होता, ना त्या बगीच्याची चूक होती; (पण) कोणाची तरी चूक होती एवढे खरे! (आणि या साऱ्या प्रकारामुळे त्या फुलाचा सुगंध - प्रीतीचे सौख्य) हवेमध्ये तो सुगंध विरून गेला आणि (माझ्याजवळ) काहीही राहिले नाही!

या अशा प्रकारामुळे माझी अवस्था आता कशी झाली आहे, तर - 

उडते पंछी का ठिकाना मेरा न कोई जहाँ 
ना डगर है ना खबर है जाना है मुझको कहाँ 
बन के सपना हमसफर का साथ रह गया

इकडे तिकडे फक्त उडत राहणाऱ्या पक्ष्याचे मुक्कामाचे ठिकाण कोठे असते? तशीच माझी अवस्था झाली आहे. माझे काही जग, माझी दुनिया काही राहिलीच नाही. मला कोठे जायचे आहे, त्याची वाट मला ज्ञात नाही. ते ठिकाण कोणते, ते मला माहीत नाही. जीवनसाथीदाराचा सहवास हे फक्त स्वप्नच बनून राहिले. ते सत्यात उतरलेच नाही. 

असे हे सुनहरे गीत आणि त्या वेळच्या पडद्यावर दिसणाऱ्या जया भादुरी अभिनयाचा वेगळा आविष्कार दाखवतात! 
एके काळी आकर्षक चेहऱ्याने रसिकांना भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Smita. Janwadkar. Miraj. About 166 Days ago
Best. Articles. & Songs
0
0
Dnyaneshwar Ithape About 166 Days ago
Beautiful information
0
0

Select Language
Share Link
 
Search