Next
भारताची निर्यात ३३१ अब्ज डॉलरवर; वाढीचा नवा विक्रम
मार्च महिन्यात ११ टक्के वाढ; व्यापारी तुटीत घट
BOI
Tuesday, April 16, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली गेली असून, तब्बल ३३१ अब्ज डॉलरची एवढ्या मूल्याची निर्यात भारतातून झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निर्यातीत नऊ टक्के वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये नोंदवण्यात आलेला निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे. केंद्र सरकारने १५ एप्रिलला जाहीर केलेल्या निर्यातीबाबतच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. 

जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असूनदेखील, मार्च २०१९अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३३१ अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातव्यापाराची नोंद करण्यात आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३१४.४ अब्ज डॉलर्सची निर्यात करून उच्चांक गाठला गेला होता. तो विक्रम यंदा मोडीत निघाला आहे. मार्च महिन्यात निर्यात व्यापारात ११ टक्के वाढ झाली. ऑक्टोबर २०१८नंतर एका महिन्यात सर्वाधिक मोठी वाढ मार्च २०१९मध्ये नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये १७.८६ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. या आर्थिक वर्षात निर्यातीत पेट्रोलियम क्षेत्राने २८ टक्के, प्लास्टिक क्षेत्राने २५.६ टक्के, रसायने क्षेत्राने २२ टक्के , औषधनिर्माण क्षेत्राने २२ टक्के आणि अभियांत्रिकी क्षेत्राने ६.३६ टक्के वाढ नोंदवली आहे.

‘सेझ’मधील निर्यातीत दमदार वाढ 

माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्यात व्यापारात दमदार वाढ झाल्याने विशेष आर्थिक क्षेत्राने (सेझ) निर्यात व्यापारात तब्बल ३० टक्के वाढ नोंदवली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योगांकडून नऊ हजार ४५० कोटी रुपये मूल्याची निर्यात झाली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत ३० टक्के वाढ झाली आहे. यात सर्वाधिक वाटा माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती कंपन्यांचा असून, वाहननिर्मिती, रसायने, अभियांत्रिकी उद्योगांनीही चांगली कामगिरी बजावल्याने निर्यात वाढीत विशेष आर्थिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 

व्यापारी तुटीत मार्चमध्ये घट, वार्षिक पातळीवर मात्र ९ टक्के वाढ 

निर्यातीत भरघोस वाढ झाल्याने आयात आणि निर्यातीतील तफावत म्हणजे व्यापारी तुटीत मार्चमध्ये घट झाली. मार्च २०१९मध्ये, मार्च २०१८च्या तुलनेत व्यापारी तूट घटून १०.८९ अब्ज डॉलर्सवर आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च २०१८मध्ये व्यापारी तूट १३.५१ अब्ज डॉलर्स इतकी होती. 
मार्च महिन्यात कपड्यांच्या निर्यातीत ११.०२ टक्के वाढ होऊन, ती ३२.५५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. कपडे आयातीतही मार्च महिन्यात १.४४ टक्क्यांनी वाढ होऊन, ती ४३.४४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्चमध्ये तेल आणि सोन्याची आयात वाढली. तेलाच्या आयातीत ५.५५ टक्क्यांनी वाढ होऊन ती ११.७५ अब्ज डॉलर्सपर्यंत, तर सोन्याच्या आयातीत ३१.२२ टक्के वाढ होऊन ती ३.२७ बिलियन डॉलर्सवर पोहोचली.

वार्षिक तुलनेत मात्र २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये व्यापारी तूट नऊ टक्क्यांनी वाढली आहे. २०१८-१९मध्ये ती १७६.४२ अब्ज डॉलर्स नोंदवली गेली असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षात ती १६२ बिलियन डॉलर्स इतकी होती. या आर्थिक वर्षात आयात ८.९९ टक्क्यांनी वाढून ५०७.४४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

निर्यातवाढीच्या विक्रमाबाबत बोलताना ‘ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मोहित सिंघला म्हणाले, ‘जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती असूनदेखील, निर्यात व्यापारात भारताची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. निर्यात व्यापारात आणखी वाढ करण्यासाठी सरकारने खाद्यपदार्थ किंवा तत्सम पदार्थ आणि पारंपरिक वस्तूंच्या निर्यातीवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्यातीतील वाढ सातत्यपूर्ण आणि गतिमान राहील आणि जागतिक पातळीवरील अस्थिरतेतही आपल्याला दीर्घकाळ टिकून राहता येईल.’ 

‘जागतिक आणि देशांतर्गत अडचणी असूनदेखील निर्यात व्यापारातील वाढ सकारात्मक आहे. तरीदेखील सरकारने ‘जीएसटी’मध्ये सवलत व इतर काही सवलती, योजना आणणे आवश्यक आहे,’ असे निर्यातदारांची संघटना असलेल्या ‘फियो’चे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता यांनी सांगितले.

- २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ
- तब्बल ३३१ अब्ज डॉलर्स मूल्याचा निर्यात व्यापार
- जागतिक मंदीतही नऊ टक्के वाढ साध्य 
- ऑक्टोबर २०१८नंतर प्रथमच मार्च महिन्यात ११ टक्के वाढ 
- ‘सेझ’मधून होणाऱ्या निर्यातीत ३० टक्के वाढ 
- माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती क्षेत्रातील निर्यातीत वाढ 
- मार्च महिन्यात व्यापारी तुटीत घट 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search