Next
ऑफिस बॉय झाला गीतकार
प्रेस रिलीज
Wednesday, December 13, 2017 | 05:34 PM
15 0 0
Share this article:

स्वप्नील जोशी व नीलेश उजाळमुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले; मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या गीतकाराचीही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.

ऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा प्रवास नीलेश उजाळ या नव्या दमाच्या तरुण गीतकारानं केला आहे. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग नीलेशच्याच लेखणीतून उतरलं आहे. मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा नीलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष. संगीतकार नीलेश मोहरीरनं आपलं एखादं तरी गाणं संगीतबद्ध करावं, हे त्याचं स्वप्नही या टायटल साँगच्या रुपानं स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे.

नीलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. गाणं लिहिण्याच्या आपल्या अनुभवाविषयी तो म्हणाला, “नकळत सारे घडले, या मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर यांनी माझ्या काही कविता वाचल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणं लिहायला सांगितलं. मी ती कथा वाचली आणि गाणं लिहून दिलं. श्रावणीताईंना ते गाणं आवडलं आणि 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आलं. मी खूपच नशीबवान आहे की, मला स्टार प्रवाह सारखी मोठी वाहिनी ही संधी देत आहे. यासाठी श्रावणी ताईंचा आणि स्टार प्रवाहचा मी ऋणी आहे.” 

या गाण्याला संगीतबद्ध केले आहे नीलेश मोहरीरने. 'नकळत सारे घडले' या नव्या टायटल साँगविषयी नीलेश म्हणाला, “हे गाणं करण्याचा माझा अनुभव कमाल होता. स्वप्नीलनं मला गाण्याचे शब्द पाठवले. स्वप्निलनं मला नीलेशबद्दल सांगितलं आणि मला सुखद धक्का बसला. कारण, त्यानं अत्यंत सोपे आणि ओघवते शब्द लिहिले होते. मला आनंद आहे की, हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नीलेश उजाळच्या कामाचं चीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही."

अभिनेता स्वप्नील जोशी याच्या ‘जीसिम्स’ या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत काम करत आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search