Next
जंगल : अंगावर काटा आणणारा थरार
BOI
Tuesday, January 22, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


सुशांत सिंगचं दुर्गा सिंग म्हणून केलेलं मोअर दॅन परफेक्ट कास्टिंग, उर्मिला मातोंडकरचा उत्कृष्ट अभिनय, अतिशय वेगळा विषय, तो जिवंतपणे मांडणारी जयदीप साहनीची पटकथा आणि या सगळ्याला साजेसं असणारं राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन हे ‘जंगल’ सिनेमाचं वैशिष्ट्य. १८ वर्षं होऊनही आजही ताजातवाना वाटणारा हा चित्रपट राम गोपाल वर्मांच्या उत्कृष्ट कलाकृतींपैकीच एक म्हणावा लागेल... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ या चित्रपटाबद्दल...
...........................
कुख्यात गुन्हेगार वीरप्पन२०००मध्ये प्रदर्शित झालेला ‘जंगल’ हा राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सिनेमा थरारपटांमधला ‘कल्ट मूव्ही’ आहे. मुळात आपल्याकडच्या सिनेमांमध्ये हा जॉनर फार कमी प्रमाणात दिसून येतो. वीरप्पन नावाच्या चंदन तस्करी, जनावरांची बेकायदा शिकार, अपहरण, हत्या यांसारखे गुन्हे करणाऱ्या कुविख्यात गुन्हेगारानं, अनेक वर्षं कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या सीमेवर वसलेल्या जंगलांमध्ये दडून बसत आपल्या प्रशासनाला गुंगारा दिला. अनेक शूर आणि कर्तबगार पोलिस अधिकारी ठार मारले. लष्करी अधिकाऱ्यांचीही हत्या केली. अनेक मैल पसरलेल्या या घनदाट अरण्याच्या परिसरात, तंत्रज्ञान आजच्याइतकं प्रगत नसताना वीरप्पनला शोधणं हे अत्यंत कष्टाचं व जिकिरीचं काम होतं. 

‘जंगल’ चित्रपटातल्या मुख्य खलनायकाचं, म्हणजे दुर्गा नारायण चौधरीचं पात्र हे गुन्हेगार वीरप्पनवर आधारलेलं आहे. नायक सिद्धार्थ (फरदीन खान) आणि नायिका अनू (उर्मिला मातोंडकर) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. याबद्दल त्यांच्या घरी काहीच कल्पना नसते. अनूच्या घरचे तिचं लग्न ठरवण्याच्या तयारीत असतात. अनूच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा, अनूसाठी स्थळ म्हणून त्यांना योग्य वाटत असतो. तेव्हा अनू आणि त्याची गाठभेट होईल आणि त्या निमित्तानं दोन्ही कुटुंबांची अनेक वर्षांनी एकमेकांशी निवांत भेटही होईल अशा उद्देशानं ते शहरापासून दूर असलेल्या एका जंगल रिसॉर्टमध्ये काही दिवस राहण्याकरिता बुकिंग करतात. 

आता हा जंगल रिसॉर्ट असतो, त्याला लागून असणाऱ्या जंगलात दरोडेखोर दुर्गा नारायण चौधरी आणि त्याच्या टोळीचं वास्तव्य असतं. जंगल भागात आलेल्या पर्यटकांचं अथवा पोलिस अधिकारी/पत्रकारांचं अपहरण करून, त्यांना ओलीस ठेवून सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेणं, हे दुर्गा सिंगचं नेहमीचं धोरण असतं. गावकरी, खेडूत, आदिवासी, पोलिस आणि कदाचित मंत्री-संत्री अशा सर्व पातळ्यांवर दुर्गा सिंगने आपली माणसं पेरून ठेवलेली असतात. संधान सांधलेलं असतं. अत्यंत पक्क्या बांधणीच्या नेटवर्किंगमुळे, त्याला पकडणं ही गोष्ट जवळपास अशक्यप्राय होऊन बसलेली असते. सिनेमा सुरू होतानाच भारतीय सैन्याच्या मोठ्या तुकडीवर दुर्गा सिंग हल्ला करतो आणि त्या तुकडीतले बरेचसे लोक यमसदनास पाठवतो. या हल्ल्यामुळे चवताळलेला कमांडर शिवराज, दुर्गा सिंग आणि त्याच्या टोळीच्या मागे हात धुवून लागतो. सुरुवातीच्या एका मिशनमध्ये या टोळीतला एक साथीदार मोठ्या शर्थीनं त्यांच्या हाती लागतो. त्याला पकडल्यानंतर टोळीचा माग काढण्याकरिता त्याची चौकशी सुरू होते, तर त्याला सोडवण्याकरिता, दुर्गा सिंगची टोळी जंगलाजवळ असणाऱ्या रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांचं अपहरण करते. 

अनू दुर्गा सिंगच्या तावडीत सापडली आहे म्हटल्यावर सिद्धार्थला चैन पडत नाही. तो तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. दुसरीकडे पर्यटकांना सोडवून दुर्गा सिंगला पकडण्याकरिता पोलिस आणि शिवराजच्या अधिपत्याखाली असलेले स्पेशल टास्क फोर्स सैनिक शर्थीचे प्रयत्न सुरू करतात. मग सुरू होतो पाठशिवणीचा थरारक खेळ. जंगलातली झाडं, झाडी, झुडपं, ओहोळ, रौद्र दऱ्या, जनावरं हे सगळं जवळून जिवंतपणे दाखवणारा विजय अरोराचा कॅमेरा, संदीप चौटाचं अतिशय सुयोग्य असं संगीत –पार्श्वसंगीत, द्वारक वॉरियरचं साउंड डिझाईन, राम गोपाल वर्माचं ब्रिलीयंट दिग्दर्शन, जयदीप साहनीची कथा-पटकथा आणि संवाद आणि सर्व कलाकरांचा उत्तम अभिनय, यामुळे ‘जंगल’ची भट्टी मस्त जमली आहे. 

राम गोपाल वर्मा२०००मधील बॉलिवूड चित्रपटांवर नजर टाकली, तर लक्षात येतं, की त्या काळाच्या मानानं हा प्रयत्न खूप वेगळा आणि दर्जेदार स्वरूपाचा होता. राम गोपाल वर्माच्या नावाचा दबदबा ‘सत्या’ या १९९८मध्ये आलेल्या चित्रपटामुळे पसरला होता. ‘सत्या’नंतर रामूने अनेक वर्षं काही अतिशय वेगळ्या विषयांवरचे चित्रपट दिग्दर्शित केले. सत्यघटनांशी साधर्म्य असणाऱ्या जंगलातल्या दरोडेखोरांच्या टोळीनं केलेलं पर्यटकांचं अपहरण आणि या घटनेचं उपकथानक म्हणून प्रेमकहाणी मांडण्याची संकल्पनाच मुळात अभिनव आहे. जंगल परिसरात असणारी गूढता, शांतता, बारीक-सारीक आवाज, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहराप्रमाणे वातावरणात घडणारा बदल इत्यादी गोष्टी, तसंच पार्श्वसंगीतकार, ध्वनीआरेखनकार आणि छायांकन दिग्दर्शकानं अतिशय बारकाव्यानं टिपल्या आहेत. 

झाडांच्या फांद्यांवरून, झाडा-झुडपांमधून, जाळ्यांमधून जेव्हा कॅमेरा संथ गतीनं फिरतो, सिद्धू आणि अनूबरोबर पळत पळत कधी अचानक एखाद्या खोल दरीत झेपावतो, तेव्हा त्या जंगलाचा प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखा भास होतो. जंगल, त्याच्या आजूबाजूचं जीवन, दुर्गा सिंग, त्याची टोळी, टोळीतली माणसं, त्यांची आपांपसातली वैशिष्ट्यपूर्ण भाषा, सिग्नलिंग करायची पद्धत, मॉब सीन्स, पाठलागांचे छातीत धडकी भरवणारे सीन्स रामगोपाल वर्मा नावाच्या जिनियसनं कमाल सुंदर पद्धतीनं चित्रित केले आहेत. सुशांत सिंगचं दुर्गा सिंग म्हणून केलेलं मोअर दॅन परफेक्ट कास्टिंग, उर्मिला मातोंडकरचा उत्कृष्ट अभिनय, अतिशय वेगळा विषय, तो जिवंतपणे मांडणारी जयदीप साहनीची पटकथा आणि या सगळ्याला साजेसं असणारं राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन हे ‘जंगल’चं विशेष. 

अठरा वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमा आजही तितकाच ताजा आणि थरारक वाटतो हे नमूद करावंसं वाटतं. कल्ट सिनेमाची मुख्य ओळख कुठल्याही काळात रिलिव्हंट वाटणं, ही असते. छायांकनाचं गरीला टेक्निक, नेहमीपेक्षा एकदमच वेगळं असं, तरीही सुयोग्य पार्श्वसंगीत आणि ध्वनी आरेखन यामुळे तर या थरारचित्राला अतिशय उठावदारपणा आला आहे. सुरुवातीच्या जवानांच्या पलटणीवरच्या हल्ल्याच्या प्रसंगापासून ते अगदी शेवटच्या प्रसंगापर्यंत एकही लूज मोमेंट या सिनेमात नाही. सुरुवातीची काही मिनिटं वगळता हा सिनेमा ‘एज ऑफ दी सीट’ स्वरूपाचा अनुभव देतो. अनू आणि सिद्धार्थला एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, अनूला सोडविण्याकरिता सिद्धार्थचं जीव धोक्यात घालणं, शिवराजचा निडर आणि कर्तव्यदक्षपणा, दुर्गा सिंग आणि साथीदारांचा क्रूर मुर्दाडपणा, अपहृत पर्यटकांची असहायता इत्यादी गोष्टी जिवंतपणानं आल्यामुळे या चित्रपटाचा एकूण परिणाम चांगला दिसून येतो. हा चित्रपट बराच काळ स्मरणात राहतो. राम गोपाल वर्माच्या मोजक्या उत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून...! 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search