Next
‘भारतरत्न’ घडविणारे ‘द्रोणाचार्य’
BOI
Thursday, January 03, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:

२०१७मध्ये गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकरने ट्विट केलेला फोटो.सचिन तेंडुलकर नावाचे विश्वपराक्रम गाजविणारे ‘भारतरत्न’ घडविणारे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर सर दोन जानेवारी २०१९ रोजी कालवश झाले. सचिन तेंडुलकरबरोबरच आणखीही अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडविले; पण त्यांचे वेगळेपण हेच होते, की त्यांनी जीवनाची मॅच कशी खेळायची याचेही धडे दिले. याच वेगळेपणामुळे त्यांचे खेळाडू उत्तुंग कामगिरी करू शकले. त्यांच्या कारकिर्दीचा हा अल्पसा आढावा...
...........
सचिन तेंडुलकर नावाचे विश्वपराक्रम गाजविणारे ‘भारतरत्न’ घडविणारे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर सर दोन जानेवारी २०१९ रोजी कालवश झाले. सचिन तेंडुलकरबरोबरच आणखीही अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडविले; पण त्यांचे वेगळेपण हेच होते, की त्यांनी जीवनाची मॅच कशी खेळायची याचेही धडे दिले. याच वेगळेपणामुळे त्यांचे खेळाडू उत्तुंग कामगिरी करू शकले. सरांचे निधन झाल्यानंतर सचिनने व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या सर्व शिष्यांच्या प्रातिनिधिक भावना आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

‘आचरेकर सरांच्या अन्य अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही क्रिकेटची बाराखडी सरांकडून शिकलो; पण त्यांचे माझ्या जीवनातील योगदान केवळ क्रिकेट कारकिर्दीपुरतेच सीमित नाही. आज मी जिथे उभा आहे, त्याचा पाया सरांनी बांधला. त्यांचे माझ्या आयुष्यातील स्थान काय आहे, याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. त्यांनी मला केवळ सरळ खेळायलाच, नव्हे सरळमार्गी जीवन जगायलाही शिकवले,’ अशी भावना सचिनने व्यक्त केली. 

‘अन्य प्रशिक्षकांनी मुलांना बॅटिंग, बॉलिंग कशी करायची हे शिकविले. आचरेकर सरांनी त्यांना सामने कसे खेळायचे, यात तरबेज केले,’ असे मत मुंबईचे माजी कॅप्टन मिलिंद रेगे यांनी व्यक्त केले. 

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरबरोबर आचरेकर सर (फोटो : Cricbuzz)

या खेळाडूंच्या भावनांतून आचरेकर सरांचे व्यक्तिमत्त्व उभे राहते. आपल्या विद्यार्थ्यांचे यश हेच ते आपले यश मानायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यामुळेच प्रशिक्षक म्हणून ते निवृत्त झाल्यानंतर इतकी वर्षे झाली, तरीही त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना वाटणारे अपार प्रेम आणि आदर अजिबात कमी झाला नाही. सचिन तेंडुलकरसह त्यांचे अनेक शिष्य दर वर्षी गुरुपौर्णिमेला आवर्जून सरांना वंदन करायला जात असत. सरांनी सचिनमधील कौशल्य ओळखून त्याच्या कुटुंबीयांना त्याला वांद्र्याच्या शाळेतून काढून दादरच्या शारदाश्रम शाळेत घालायला सांगितले, जेणेकरून त्याला क्रिकेट प्रशिक्षणाला वेळ देता येऊ शकेल. पुढे आचरेकर सरांनीच ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांचा पाठपुरावा केल्यामुळे नियमांत बदल होऊन १३ वर्षांच्या सचिनला प्रतिनिधित्व करता आले.

पत्रकार कुणाल पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘रमाकांत आचरेकर : मास्टर ब्लास्टर्स मास्टर’ या पुस्तकात त्यांच्या जीवनाचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. तीन डिसेंबर १९३२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या (तत्कालीन रत्नागिरी जिल्हा) मालवण तालुक्यातील बांदिवडे गावात रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म झाला. क्रिकेटचा वारसा त्यांना जन्मापासूनच मिळाला. त्यांचे वडील, काका आणि भाऊ या साऱ्यांनाच क्रिकेटचे प्रचंड वेड. मालवणच्या टोपीवाला स्कूलच्या मोठ्या मैदानावर आचरेकर त्यांच्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या वर्गांतल्या खेळाडूंचे सामने आयोजित करायचे. अगदी शेतातही ते क्रिकेट खेळायचे.

पुढे ते मुंबईत आले. त्यांचे वडील धनराज मिलमध्ये होते आणि त्या मिलच्या क्रिकेट टीमचे कॅप्टनही होते. त्यांनी नंतर न्यू हिंद क्लबचेही प्रतिनिधित्व केले. घरातच बाळकडू मिळाल्यामुळे आचरेकरांची क्रिकेटची आवड अधिकच जोपासली गेली. त्यांनीही पुढे न्यू हिंद क्लबकडून खेळायला सुरुवात केली. यंग महाराष्ट्र क्लबकडूनही ते खेळले. 

नामवंत क्रिकेटपटू पी. के. कामथ यांच्याकडून त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. भारताचे माजी खेळाडू दत्तात्रय उर्फ दत्तू पराडकर यांच्या खेळाचाही प्रभाव त्यांच्यावर होता. 

वेगवेगळ्या क्लबकडून खेळल्यानंतर पुढे ते स्टेट बँकेत नोकरीला लागल्यावर त्या बँकेच्या संघाकडूनही ते खेळले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ अनेक सामने जिंकला. पुढे भारतीय संघाचे कॅप्टन झालेले अजित वाडेकर हे स्टेट बँकेतले त्यांचे सहकारी खेळाडू होते. ‘आचरेकर म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधील डॉन ब्रॅडमन होते,’ असा गौरव वाडेकर यांनी केल्याचा उल्लेख पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे. मोइन उद दौला क्रिकेट स्पर्धेत त्यांना स्टेट बँकेच्या संघाकडून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळता आले. तो त्यांचा एकमेव प्रथम श्रेणी सामना ठरला. ते उत्तम फलंदाज आणि यष्टिरक्षक होते. 

पुढे त्यांनी १९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले.

नरेश चुरी, विशाल जैन, श्रेयस खानोलकर, मनोज जोगळेकर, नितीन खाडे, संदेश कवळे, विनायक सामंत, अमित दाणी, किरण पोवार असे त्यांचे कित्येक विद्यार्थी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले.  आचरेकर सरांनी स्थापन केलेला क्लब सध्या त्यांची कन्या कल्पना मुरकर आणि जावई दीपक मुरकर चालवतात. आचरेकर सरांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारकडून त्यांना १९९०मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. तसेच २०१०मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते. 

आपले शिष्य सर्वोत्तम व्हावेत, यापेक्षा गुरूला दुसरे काय हवे असते? त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांचे अनेक शिष्य तसे घडले. असे गुरू होणे दुर्मीळ आहे. सचिनच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘आचरेकर सर आता स्वर्गातला खेळ समृद्ध करतील...!’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search