Next
लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय?
BOI
Saturday, February 10, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार, शेअर्स व इक्विटी म्युच्युअल फंडातून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली लाभावर आता ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स’ द्यावा लागणार आहे. त्यासाठीची नेमकी तरतूद काय आहे हे आज जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
..........
एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत जो अर्थसंकल्प सादर केला, त्याचे सर्वसाधारणपणे स्वागत झालेले दिसून येत आहे. असे असले तरी, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या (एलटीसीजी) आकारणीत जो बदल केला आहे, तो मात्र गुंतवणूकदारांमध्ये, विशेषत: शेअर्स व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पसरवून गेला आहे. अद्यापही बहुतेकांना त्याचा नेमका परिणाम काय होणार, याची माहिती नाही. म्हणून आज आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊ.

शेअर्स व इक्विटी म्युच्युअल फंडातून होणाऱ्या भांडवली लाभाचे अल्पकालीन (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) असे स्वरूप असते. यातील अल्पकालीन लाभ म्हणजे गुंतवणूक केल्यापासून ती एक वर्षाच्या आत विकून झालेला लाभ होय. गुंतवणूक केल्यापासून एक वर्षानंतर ती विकून झालेला नफा म्हणजे दीर्घकालीन नफा असतो. आतापर्यंत अल्पकालीन लाभ झाल्यास त्यावर १५ टक्के इतका टॅक्स द्यावा लागत होता, तर दीर्घकालीन लाभ मात्र करमुक्त होता; मात्र यंदाच्या अर्थसंकल्पानुसार दीर्घकालीन नफ्यावर कर लागू होणार आहे. ही करआकारणी कशी होणार आहे, हे आपण पाहू.

एक लाख रुपयांवरील ‘लाँग टर्म कॅपिटल गेन’वर आता १० टक्के कर आकारला जाणार आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन कसा काढायचा, हे पाहू या. यासाठी एक वर्षापूर्वीची शेअर/युनिटची खरेदी किंमत, या शेअर/युनिटची ३१ जानेवारी २०१८ रोजीची किंमत आणि ३१ मार्च २०१८ नंतरची म्हणजेच एक एप्रिल २०१८ रोजीची किंवा त्यानंतरची विक्रीची किंमत, या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे.

ही गोष्ट समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. आठ डिसेंबर २०१६ रोजी एखादा शेअर १०० रुपयांना खरेदी केला आहे आणि त्याची ३१ जानेवारी २०१८ रोजीची किंमत १५० रुपये आहे. हा शेअर ३१ मार्च २०१८च्या आधी कधीही विकला आणि विक्रीची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त असेल, तरी लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाणार नाही; मात्र जर हा शेअर पाच एप्रिल २०१८ रोजी २०० रुपयांना विकला, तर प्रति शेअर ५० रुपये एवढा लाँग टर्म कॅपिटल गेन (२००-१५०=५०) धरला जाईल. त्या दिवशी शेअर १४० रुपयांना विकला, तर लाँग टर्म कॅपिटल गेन होणार नाही, उलट लाँग टर्म कॅपिटल लॉस धरला जाईल (१४०-१५० = -१०). समजा या शेअरची ३१ जानेवारी २०१८ रोजीची किंमत ८० रुपये असेल, तर वरील उदाहरणात होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन २००-८० असा न होता २००-१००=१०० व १४०-१००=४० इतका असेल.

थोडक्यात, ३१ जानेवारी २०१८च्या एक वर्षापूर्वी खरेदी केलेल्या शेअर/युनिटसाठी ३१ जानेवारी २०१८ची बाजारातील किंमत लाँग टर्म कॅपिटल गेन काढण्यासाठी आधारभूत किंमत धरली जाईल. खरेदीची किंमत आणि ३१ जानेवारी २०१८ची किंमत यातील जास्तीची किंमत एक एप्रिल २०१८पासून होणाऱ्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन काढण्यासाठी विचारात घेतली जाईल. एका वर्षापूर्वी खरेदी केलेल्या शेअर्स/युनिटच्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेनहा ३१ मार्च २०१८पर्यंत करमुक्त असेल.

यापुढे आर्थिक वर्षात एकूण लाँग टर्म कॅपिटल गेन एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर एक लाखावरील लाँग टर्म कॅपिटल गेनवर १० टक्के इतका लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाईल. पुढील आर्थिक वर्षापासून आर्थिक वर्षात केलेल्या शेअर्स/युनिटच्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाणार नाही; मात्र तो एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर कर आकारला जाईल. उदाहरणार्थ, लाँग टर्म कॅपिटल गेन एक लाख ७२ हजार रुपये एवढा असेल, तर १,७२,०००-१,००,०००=७२००० एवढ्या रकमेवर १० टक्के दराने ७२०० रुपये इतका लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाईल.


   -   सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search