Next
बंगाली भाषेचा ‘विद्यासागर’
BOI
Monday, September 24, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म २६ सप्टेंबर १८२०चा. बंगाली गद्याला सरळ, साधे आणि आधुनिक करण्याची कामगिरी जर कोणी केली असेल तर ती ईश्वरचंद्रांनी. ईश्वरचंद्र काय नव्हते? समाजसुधारक म्हणून तर त्यांची ओळख होतीच. परंतु तत्त्वज्ञ, शिक्षक, लेखक, अनुवादक, प्रिंटर, प्रकाशक, उद्योजक, सुधारक आणि परोपकारी व्यक्ती म्हणूनही त्यांचे कार्य तेवढेच मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा हा लेख...
...........
काळ ब्रिटिश सत्तेचा, १९व्या शतकाचा. कोलकात्यातील संस्कृत कॉलेजचे प्राचार्य एका इंग्रज अधिकाऱ्याला भेटायला गेले होते. प्राचार्य खोलीत आल्यानंतरही अधिकारी बूट घालून आणि मेजावर पाय टाकून बसून राहिला. त्या प्राचार्याने आपल्या हातातील फाइल दाखवली आणि कामाबाबत बोलणी केली. त्या वेळीही तो अधिकारी चिरूट ओढत आणि त्याचा धूर सोडत बसून राहिला. प्राचार्य काही बोलले नाहीत. काम झाल्यावर ते परत आले. योगायोगाने काही दिवसांनी त्याच अधिकाऱ्याला प्राचार्याकडे काही काम निघाले. तो इकडे संस्कृत कॉलेजमध्ये भेटण्यास आले. प्राचार्यांनी चप्पल घातलेला पाय उचलून मेजावर ठेवला आणि त्या अधिकाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याला हा आपला मोठा अपमान वाटला. 

त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने याची तक्रार आपल्या वरिष्ठांकडे केली. वरिष्ठांनी प्राचार्यांना बोलावून घेतले आणि या प्रकरणाबाबत विचारणा केली. तेव्हा प्राचार्य उत्तरले, ‘मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते असेच बसले होते. मला वाटले, की इंग्रजांमध्ये शिष्टाचाराची हीच रीत आहे. आमच्याकडे तर ‘अतिथि देवो भव’ असे म्हणतात. पाहुण्यांचे स्वागत करण्याची कदाचित इंग्रजांची ही पद्धत असेल, असे समजून मी तर फक्त अनुकरण केले.’ यावर त्या अधिकाऱ्याला चूक समजून आली आणि त्याने त्या प्राचार्यांकडे माफी मागितली. 

ते प्राचार्य होते ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र काय नव्हते? समाजसुधारक म्हणून तर त्यांची ओळख होतीच. परंतु तत्त्वज्ञ, शिक्षक, लेखक, अनुवादक, प्रिंटर, प्रकाशक, उद्योजक, सुधारक आणि परोपकारी व्यक्ती म्हणूनही त्यांचे कार्य तेवढेच मोलाचे आहे. 

इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांचा पहिला नांगर पडला कोलकात्यात आणि इंग्रजी शिक्षणाचे वारे वाहू लागले. त्यातूनच आधी बंगाली नवजागरणाचा काळ उद्भवला आणि याच बंगाली नवजागरणाची परिणती नंतर भारतीय नवजागरणात झाली. नवविचारांची ही ध्वजपताका खांद्यावर मिरविणाऱ्यांमध्ये जे अग्रणी होते, त्यांपैकी एक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. बंगाली भाषेला नवे, गोजिरे व साजिरे रूप देण्यामध्ये ईश्वरचंद्र यांचा मोठा वाटा होता. आपल्या नेहमीच्या पद्धतीने सांगायचे म्हणजे सिंहाचा वाटा होता, असे म्हटले तरी चालेल. 

आपल्याकडे बंगाली भाषा बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. एवढी, की पु. ल. देशपांडे १९७० मध्ये खास बंगाली शिकण्यासाठी शांतिनिकेतनमध्ये काही दिवस जाऊन राहिले होते. तेथे त्यांनी बंगाली भाषा आत्मसात केलीही; पण या भाषेतला हा गोडवा आज आलेला नाही. त्यामागे ईश्वरचंद्रांसारख्या अनेकांचे खूप कष्ट आहेत. 

बंगाली गद्याला सरळ, साधे आणि आधुनिक करण्याची कामगिरी जर कोणी केली असेल तर ती ईश्वरचंद्रांनी. बंगाली वर्णमालेचे पहिले खिळे (छाप किंवा टाइप) १७८०मध्ये पडले होते. त्यानंतर या छाप्यांमध्ये सुधारणा केली ती ईश्वरचंद्रांनी! मराठीत जे काम स्वा. सावरकरांनी केले, तमिळमध्ये सुब्रह्मण्यम भारती यांनी, अमेरिकी इंग्रजीत नोआह वेब्स्टर याने आणि यहुदी भाषेत बेन यहुदाने जे काम केले, तेच ईश्वरचंद्रांनी बंगालीसाठी केले. त्या काळी बंगाली लिपी एवढी क्लिष्ट होती, की बंगाली भाषेचे टाइप (खिळे) ठेवण्यासाठी ५०० पेट्या लागत असत! त्यातून उद्भवणारी गुंतागुंत त्यांनी जाणली आणि तिला सरळ व शास्त्रीय रूप दिले. काल-परवापर्यंत बंगाली छापखान्यांतील कर्मचारी या व्यवस्थेला ‘विद्यासागर शॉट’ या नावाने ओळखत असत. सध्या सगळेच काम संगणकावर होत असल्यामुळे टंकांची ही कटकट पूर्णपणे दूर झाली आहे, हा भाग वेगळा!

वास्तविक विद्यासागर हे ईश्वरचंद्रांचे नाव नाही. त्यांचे खरे नाव बंदोपाध्याय; मात्र कोलकात्यातील संस्कृत कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्ययन, अध्यापन आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ही पदवी देण्यात आली होती. ती पदवी हीच त्यांची ओळख बनली. या पदवीला साजेशी खरोखरच सागरासारखी त्यांची विद्वत्ता होती. ‘बीबीसी’ने २००४मध्ये सर्वकालीन बंगाली व्यक्तिमत्त्वांचे एक सर्वेक्षण केले होते. त्या वेळी ईश्वरचंद्र यांना नववा क्रमांक मिळाला होता.  

ईश्वरचंद्रांचा जन्म २६ सप्टेंबर १८२० रोजीचा. बिरसिंगा (जिल्हा मिदनापूर) या गावातील ठाकुरदास बंदोपाध्याय हे त्यांचे वडील आणि भगवती देवी या त्यांच्या मातोश्री. वयाच्या नवव्या वर्षी ते कोलकात्यात आले. शालेय विद्यार्थी असताना त्यांना परीक्षेची खूप भीती वाटायची; मात्र अनेक परीक्षांमध्ये त्यांनी उत्तम यश मिळविले. या शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना अनेक शिष्यवृत्त्या देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी १८४१मध्ये संस्कृत व्याकरण, साहित्य, अलंकार शास्र, वेदान्त, स्मृती आणि खगोलशास्त्र या विषयांतील पदवी प्राप्त केली. अवघ्या विसाव्या वर्षी ईश्वरचंद्र संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून फोर्ट विलियम कॉलेजमध्ये सामील झाले. त्यानंतर पाच वर्षांनी ईश्वरचंद्रांनी संस्कृत कॉलेजमध्ये सहायक सचिव म्हणून प्रवेश केला; मात्र व्यवस्थापनाशी वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. 

त्यांचे मुख्य कार्य हे समाजसुधारणा किंवा विधवा विवाह मानले जात असले, तरी बंगाली वर्णमालेचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. त्यांनी बंगाली वर्णमालेतील काही संस्कृत वर्ण काढून टाकले आणि तीन नवीन अक्षरे जोडली. या विषयावरील बर्ण परिचय (अक्षर ओळख) हे त्यांचे पुस्तक अभिजात कृती मानले जाते. याशिवाय रिजुपाठ, संस्कृत ब्याकरणेर उपक्रमणिका आणि ब्याकरण कौमुदी ही त्यांची भाषेवरील पुस्तके बंगाली भाषेच्या अभ्यासकांसाठी ‘आवश्यक वाचन’ मानले जाते. 

साहित्याचा उद्देश हा निव्वळ साहित्यासाठी नाही, तर त्यातून लोकहित व्हायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यातूनच त्यांनी स्वतःची ग्रंथरचना करताना आणि अनुवाद करतानाही हा उद्देश कधीही नजरेआड होऊ दिला नाही. 

महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या शालेय जीवनात ईश्वरचंद्रांनी लिहिलेली पाठ्यपुस्तकेच अभ्यासली होती. त्यामुळे त्यांना ईश्वरचंद्रांबाबत अत्यंत आदर होता. ‘विद्यासागर यांनी बांगला भाषक उच्छृंखल जनतेला शिस्त लावून तिला सहजगती आणि कार्यकुशलता प्रदान केली. भावप्रकटीकरणे हे युद्ध असते आणि सध्या अनेक सेनापती हे युद्ध खेळत साहित्याच्या नवनवीन क्षेत्रात आविष्कार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ज्याला या युद्धात निर्विवाद विजय मिळाला तो पहिला सेनापती विद्यासागर हेच होते,’ असे रवींद्रनाथांनी एके ठिकाणी म्हटले आहे. यातच त्यांची महत्ता समजून येते.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे साने गुरुजी यांनी लिहिलेले चरित्र ई-बुक स्वरूपात  
‘बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे. ते खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 73 Days ago
Are any of his works translated into Marathi?
0
0

Select Language
Share Link
 
Search