Next
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी
BOI
Friday, November 09, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटो

सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
...........
दिवाळी म्हटले, की दिव्यांची आरास, तेजाची, आनंदाची नुसती उधळणच. दसऱ्यानंतर रामलीलेचा उत्साह आसमंतात विरतोय ना विरतोय, तोच कलेकलेने आनंदाची पाखरण करत दिवाळी दारात उभी राहते. सर्व जण आपापल्या परीने दीपावलीचा उत्सव साजरा करण्यास सज्ज होतात. नवीन कपडे, घराची साफसफाई, सारवणे, बाजारहाट.. सगळे कसे उत्साहात चाललेले असते. फोन येत जात असतात. तेव्हा हळूच डोळे मिचकावत जुन्या आठवणी सभोवती पिंगा घालू लागतात. आणि आपण आठवणीतल्या दिवाळीत कधी पोहोचतो, ते कळतसुद्धा नाही. 

डोंगराच्या कुशीत विसावलेली आमची कराळेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे). त्या वेळी माझ्या घरात आई, अप्पा, आजोबा (बाबा), दादा, भाऊ आणि मी एवढे जण होतो. त्या वेळी दिवाळीची चाहूल नव्या कपड्यांनी लागायची. आम्हा मुलांना दिवाळीत वर्षातून दुसऱ्यांदा कपडे मिळायचे. हो दुसऱ्यांदाच. एकदा काळभैरवनाथच्या यात्रेला आणि दुसऱ्यांदा दिवाळीला. म्हणून की काय, दिवाळीचे मला तरी खूप अप्रूप वाटे. शेतकऱ्याच्या घरची दिवाळी म्हणजे फारच गडबडीत. ऐन थंडीच्या दिवसात खुरपणी व इतर कामाचा इतका ताण असायचा, की बाजारहाट करायलासुद्धा वेळ नसायचा. आणि बाजार भरला, तरी फराळ करायला वेळ नसायचा. 

दुसऱ्यांच्या घरातील फराळाची सुरुवात झाली, की वातावरणातील तो गोडवा आम्हा मुलांना हिरमुसून टाकायचा. आमची ती अवस्था पाहून आईसुद्धा काही करू शकत नसे. कारण आमच्या घरच्या दिवाळीला माझे वडील, आमचे अप्पा फराळ बनवायचे आणि आई त्यांना कामात मदत करायची. दिवसभर कितीही थकले, तरी आमच्यासाठी अप्पा रात्र रात्र जागून फराळ बनवायचे. मग त्या फराळाची गोडी इतरांच्या फराळाला कशी येणार? रव्याचे, कळीचे मोठमोठे दोन्ही हातात बसणार नाहीत, असे चेंडूसारखे लाडू अप्पा बनवायचे. मला कधीही तो एक लाडू एका वेळी संपला नाही. दगडी पोह्यांचा लालभडक झणझणीत चिवडा आणि सोबतीला गोड गोड शंकरपाळे बनवले जायचे. 

करंज्या तर आमच्या घरी यायला बिचाऱ्या रुसायच्या. मी १०-१२ वर्षांची झाल्यापासून भावांच्या मदतीने आम्ही करंज्या बनवायला लागलो, तोवर ‘मामाचा गाव मोठा करंजीच्या पेठा.’ चकल्या काय प्रकार असतो, हे तर फार नंतर समजले. शेजाऱ्यांनी काय काय बनवले आहे, याचे आम्हा मुलांना कधीच आकर्षण नसे. घरी जे बनायचे त्यावर आम्ही नेहमी तृप्त असू. अप्पा एखाद्या सुगरणीला लाजवेल असे पदार्थ घरी बनवत असत. जिलेबी, बटाटेवडे मी पहिल्यांदा घरीच खाल्लेत. आज रोज नवा पदार्थ बनतो; पण अप्पांच्या फराळाची चव आता बिलकुल येत नाही. आणि त्या गोडीने कोणी खातसुद्धा नाही. 

दिवाळीतील अभ्यंगस्नान काय असते, हे फार नंतर समजायला लागले. भल्या पहाटे आई ओरडतच उठवत म्हणायची, ‘अरे आजही उजेडातच उठून आंघोळ केलीत, तर नरकात जाशाल. उठा लवकर.’ नरकाचे नाव काढताच मी डोळे चोळत उठायचे. बऱ्याच वेळा भांडणात दुसऱ्याच्या नावाने बोटे मोडत, ‘नरकात जाशील/नरकात जाईल मेला’ असे काही काही कानावर पडलेले असल्याने नरकाबद्दल भीती वाटायची. त्यामुळे नरकात जायचे नसल्याने डोळे चोळत थंडीत कुडकुडत उठायचे. घराबाहेरचा गारठा गोठवून टाकेल असा असायचा. पाणी तापवायला घराबाहेर दगड लावून चूल केलेली असे. आम्ही सगळी भावंडे चुलीभोवती फेर धरून अंग चोरून अंग शेकवत बसत असू. 

कधी नव्हे ती आई आंघोळ घालायला रिकामी असायची. गुलाबी थंडी अचानक गोठवणारी कधी व्हायची ते समजायचे नाही. अशा थंडीत घराबाहेरील चपट्या दगडावरील आंघोळ म्हणजे यातनाच व्हायच्या. त्यात आईच्या थंडीमुळे खरखरीत झालेल्या हातांची घासणी म्हणजे काट्यांच्या ढिगावर पडल्यासारखे व्हायचे. मग माझी रडारड थांबायची ती नव्या, सुगंधी कपड्यांनीच. नाश्ता काय असतो, हे कधी माहीत नसायचे. जे मिळेल ते आम्ही खायचो; पण दिवाळीत सकाळी सकाळी सगळे फराळावर तुटून पडायचे. खूप आनंद वाटायचा. हल्ली नाश्त्याला फराळ म्हटले, की सगळे नाक मुरडतात; पण मग सहज त्या दिवसांच्या आठवणींची झुळूक येऊन जाते आणि मन खुलून जाते. 

रांगोळी हा सर्वांच्या आवडीचा विषय. आम्ही पण पांढरी शुभ्र रांगोळी दारासमोर काढायचो; पण त्यासाठी बरीच मेहनत करावी लागायची. गारगोटीचे दगड विकत मिळायचे; पण आम्ही गारगोटीचे दगड शोधून आणून त्याची पूड करून ठिपक्यांची रांगोळी काढायचो. अशी पांढरी शुभ्र रांगोळी किती तरी सुंदर दिसायची. मग घरोघरी फिरून कोणाची रांगोळी छान झाली, हे पाहायला वाडी कोळपून काढायचो. ती मज्जा मी कधीच विसरू शकणार नाही. 

दादा, भाऊ मात्र दिवाळीतसुद्धा खूप व्यग्र असायचे. शेतातील कामांत मदत करण्याबरोबर गुरांसाठी चाऱ्याची ओझी वाहणे, लांबून विहिरीवरून पाणी भरण्यात आईला मदत करणे, शेतात पाणी भरणे, अशी एक ना अनेक कामे आम्हा मुलांना करावी लागत असत. अशा कामांतून वेळ काढून सगळ्यात मोठा आकाशकंदील बनवायचा असे. बांबू तोडून फोक काढून नीट तुकडे करून कंदील बनवायचो. त्यात मोठी कसरत तर पुढेच असायची. वीज नव्हतीच. त्यामुळे तेलाचा दगडी दिवा कागदी कंदिलामध्ये ठेवून आकाशात लोंबत ठेवण्याची कला लीलया पार पाडावी लागे. सगळ्यात उंच, मोठा, सुंदर कंदील कोणाचा आहे, हे बघायला सगळी वाडी पालथी घालून यायचा विलक्षण आनंद फक्त तेव्हाच मिळायचा. 

सांज वेळी सगळे जुने दगडी, मातीचे, पितळेचे दिवे, असतील नसतील ते सगळे काढून अंगण, गोठा, तुळशीसमोर लावले जायचे. घरात विजेचे कनेक्शन नसल्याने तेलाच्या दिव्यांचा तो सौम्य प्रकाश आनंदाचे चैतन्य भरून आणायचा आणि मन मोहरून जायचे. 

संध्याकाळी वाडीत फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, की अप्पा आम्हाला हळूच टिकल्या, लवंगी फटाके, सुतळी बॉम्ब, चक्रीचे प्रत्यकी एक एक पॅकेट काढून सगळ्यांना मिळून द्यायचे. मग फटाके संपले म्हणून परत कधी मागितले नाही. आम्ही तेवढ्यातच खूश असायचो. सकाळी सकाळी उठून माळावर जाऊन फुसके फटाके डुकरासारखे शोधत बसायचो. त्या फुसक्या फटाक्यांच्या वाती वर करून परत वाजवणे, राहिलेल्या बाकीच्यांची दारू गोळा करून चुलीत टाकून गुपचूप स्फोट करून राख उडवणे, अशा किती तरी मजेशीर गोष्टी मी माझ्या भावांप्रमाणे करत असे. तेव्हा नखाने टिकल्या वाजवण्यात तरबेज असणारी मी, आज मात्र टिकलीच्या आवाजाने दचकते याचे आश्चर्य वाटते. 

आजच्या काळात दिवाळीची सुट्टी पडली, की चार दिवसांनी ती कशी घालवायची याची चिंता भेडसावते; पण आम्हाला तसा प्रश्न कधी पडलाच नाही. सुट्टीच्या दुसऱ्याच दिवशी गुरांना, शेळ्यांना घेऊन आम्हा सगळ्या सवंगड्यांना रानात गुरे चारायला जावे लागे. हिरव्यागर्द डोंगररांगा, स्वच्छ शुभ्र निळसर आकाश, मधेच मोठे धरण, त्यावर पक्षांचे थवे. मग अजून काय हवे असणार आम्हाला. गुरांना चरायला सोडून दिवसभर नुसती मस्तीच मस्ती. कधी विटी-दांडूचा डाव, तर कधी बसून गायचारा खेळायचा. कधी लपंडाव, तर कधी सूरपारंब्यांची धमाल. कधी कधी धरणाच्या कडेला पाण्यात डुबक्या मारायचो. ज्याच्यावर राज्य यायचे, त्याने मात्र सगळ्यांची गुरे वळून (एकत्र करून) आणायची शिक्षा भोगायची असे. यात दिवस कसा जायचा ते कळायचे नाही. मग दिवाळी स्वाध्यायाच्या बरोबर आणलेल्या वह्या कधी तरीच त्या सोबत असल्याची जाणीव करून देत; पण आम्ही आजचे उद्यावर टाकून आमच्याच धुंदीत खेळत बसत असू. अशा अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सुदैवाने माझ्या वाट्याला आली.

अशा गोड, अवीट स्मृती जागविण्याची संधी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने दिल्याबद्दल मनस्वी आभार.
 

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kumar About 309 Days ago
Very nice, I also remember my memory
2
0
Manoj Gawand About 310 Days ago
खूपच छान लेख लिहिला आहे. वाचताना प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर बालपणाची दिवाळी उभी राहते.
2
0

Select Language
Share Link
 
Search