Next
अरुजा रहाळकरच्या ‘अरंगेत्रम्’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध
लयबद्ध पदन्यासाचा सौंदर्यपूर्ण आविष्कार
BOI
Tuesday, July 16, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सोनचाफ्याचा मंद दरवळ... समईच्या मंद उजेडात चमकणारी नटराजाची मूर्ती, मृदुंगमचा ताल आणि व्हायोलिनचे सूर, दाक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करत लयीत, डौलदारपणे पदन्यास करणारी ती नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक... हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना अरुजा रहाळकर हिच्या अरंगेत्रम सादरीकरण सोहळ्यातील. 


अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम  नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा दोन-चारच्या समुहात अरंगेत्रम् सादर करण्यावर भर दिला जातो. अरुजा रहाळकर हिने मात्र एकटीनेच हे संपूर्ण सादरीकरण केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, अभिनव प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका माधुरी जेऊरकर, नृत्य गुरू स्मिता महाजन उपस्थित होते. 

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर, माधुरी जेऊरकर,गिरीश बापट, नृत्य गुरू स्मिता महाजन व डॉ. ज्योती रहाळकर

या वेळी बोलताना सुचेता चापेकर म्हणाल्या, ‘कला म्हणजे सौंदर्य आहे, ही कलाच आपल्याला इतर प्राण्यांपासून वेगळी ठरवते. मानवतावादी दृष्टीकोन, माणुसकी हे सारे आपल्याला कला देत असते, त्यामुळेच त्याच्यातून आनंद मिळत असतो. कलांचे शास्त्र हा विचार पाश्चात्त्य देशामध्ये आज केला जातो; पण आपल्याकडे हा विचार भरत मुनींनी अडीच हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवला आहे. म्हणूनच या परंपरा निर्माण झाल्या. असे अनेक शास्त्रग्रंथ निर्माण झाले आहेत. माझे अरंगेत्रम् १९६३ मध्ये माझे गुरू तुलसीदास मंगेशकर, त्यांचे गुरू पार्वतीकुमार आणि त्यांचे गुरू चंद्रशेखर पिल्लई उपस्थित होते. आजच्या काळातही या परंपरा पुढे जात आहेत, याचा आनंद आहे’. 

डॉ. ज्योती रहाळकर आपले मनोगत व्यक्त करताना

प्रमुख पाहुणे गिरीश बापट, माधुरी जेऊरीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अरुजाची आई डॉ. ज्योती रहाळकर यांनी अरुजाच्या नृत्यशिक्षणाचा प्रवास थोडक्यात सांगितला. अभिनय, लेखन, चित्रकला आणि जिम्नॅस्टिक्स या क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारी अरुजा सध्या बारावीत शिकत असून, तिला वैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे आहे. अरुजानेही आपले मनोगत व्यक्त केले.

अरुजाच्या गुरू आणि सुचेता चापेकर यांच्या शिष्या स्मिता महाजन गेली ३५ वर्षे नृत्यक्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी दाक्षिणात्य, संस्कृत भाषेत असलेल्या शब्दरचना मराठीत आणल्या आहेत. मराठीत अशा रचना करणाऱ्या या एकमेव कलाकार आहेत. त्यांनी रचलेल्या संगीत कलेचा गुणगौरव करणाऱ्या मधुर गीतरचनेवर अरुजाने शब्दम् ही शब्दांचा मागोवा घेऊन त्यातील भावार्थ, ध्वन्यार्थ उलगडणारी नृत्यरचना सादर केली.

पुष्पांजलीने सुरुवात झालेल्या या सादरीकरणाने पहिल्या नृत्यरचनेपासूनच रसिकांवर मोहिनी घातली. जतिस्वरम् ही चार रागांची गुंफण करून स्वरांच्या चलनानुसार शुद्ध नर्तनाचे विविध आकृतीबंध दर्शविणारी रचना अरुजाने अगदी सहजपणे सादर केली. भावपूर्ण विभ्रम, तालबद्ध पदन्यास ही तिची खास वैशिष्ट्ये होती. शुद्ध नर्तन आणि अभिनय या दोन्हींचा उत्कृष्ट मेळ घालणारी वर्णम, रोज भेटणाऱ्या सवंगड्याची बदललेली नजर आणि स्पर्श यामुळे बावरून गेलेल्या यौवनेची अभिव्यक्ती दर्शविणारी पदम ही नृत्यरचना रसिकांची दाद मिळवून गेली. तालाच्या विविध रंगावर शुद्ध नर्तनाचे वैविध्यपूर्ण आकृतिबंध यांचा मेळ असणारी तिल्लाना ही नृत्यरचना तालबद्ध नृत्याचा अत्यंत सुंदर आविष्कार होता. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. यानंतर सर्व मंगलकारक होण्यासाठी केलेल्या प्रार्थनेवरील नृत्यरचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्विता महाजन यांनी केले, तर डॉ. जयेश रहाळकर यांनी आभार मानले. नंदिनी गुजर यांनी गायन केले. ‘मृदुंगम्’ची साथ शंकर नारायणन् यांनी, तर व्हायोलिनची साथ बी. अनंतरामन् यांनी केली. 

(अरुजाच्या नृत्याची झलक दाखविणारा एक व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुकच्या  खालील लिंकवर क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search