Next
देखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर
BOI
Wednesday, August 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चन्नकेशव मंदिर
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण अप्रतिम हळेबिडूची सैर केली. हळेबिडूची जुळी बहीण म्हणून बेलूर नगरीला ओळखले जाते. येथे देखण्या चन्नकेशवाचे फार सुंदर मंदिर आहे. तसेच आणखीही काही पर्यटनस्थळे आहेत. आजच्या भागात बेलूरमध्ये फेरफटका...
..........
कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्यातील बेलूर येथील मंदिरांची उभारणी करताना मजबुतीसाठी वापरलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्र म्हणजे त्या वेळच्या बांधकाम शैलीचा आदर्श नमुना आहे. घडीव दगडांवर दगड रचून खांब आणि आडव्या तुळया जोडताना इंटरलॉक, तसेच पिन आणि सॉकेट सिस्टीम यांचा सुरेख वापर त्यासाठी करण्यात आला आहे. शिल्प कोरलेल्या भिंती आणि छत असे बेमालूमपणे जोडण्यात आले आहे, की याचे सांधे कसे जोडले आहेत, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे हजार वर्षे झाली तरी ही बांधकामे भक्कमपणे टिकून आहेत.

बेलूर गाव होयसळ राजांची पहिली राजधानी होती. यागची नदीच्या काठावर वसलेली ही नगरी पूर्वी वेलापूर म्हणूनही ओळखले जायची. विष्णुवर्धन राजाच्या राजवटीत हळेबिडूची स्थापना झाल्यावर याचे महत्त्वही दुसरी राजधानी म्हणून १४व्या शतकापर्यंत अबाधित होते. ‘पृथ्वीवरील विष्णुस्थळ’ असा किंवा दक्षिण काशी असाही बेलूरचा उल्लेख व्हायचा. बेलूर हे चन्नकेशव (विष्णू) मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याला विजयनारायण मंदिर असेही संबोधले जाते. उत्तर आणि दक्षिण भारताच्या मंदिर शैलीचा येथे संगम झाला आहे. होयसळ राजवटीच्या ३०० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भव्य देवस्थानांची स्थापना केली होती.

त्या वेळच्या राहणीमानाची व सुबत्तेची साक्ष ही देवळे देतात. तेव्हाचे राजे रसिक होते, कलाकारांची कदर करीत होते. मंदिरांमुळे प्रजा उत्सवाच्या निमित्ताने एका ठिकाणी जमत असे. त्यात धर्माबरोबरच सामाजिक एकीकरणाचा हेतूही साध्य होत असे. बेलूरवरही दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने इ. स. १३२६मध्ये हल्ले केले. त्यानंतर विजयनगरचा संस्थापक राजा हरिहरने याचा जीर्णोद्धार केला.

आता चन्नकेशव मंदिराची माहिती घेऊ. मंदिरात जाताना एखादी पॉवरफुल बॅटरी (विजेरी) जवळ ठेवावी. कोणत्याही पर्यटनस्थळी जाताना शासकीय परवानाधारक मार्गदर्शक (गाइड) असल्याशिवाय जाऊ नये. त्याशिवाय तेथील बारकावे समजत नाहीत.

चन्नकेशव (चेन्नाकेशवा, चन्नाकेशव) हे श्री विष्णूला समर्पित असे मंदिर आहे. केशव म्हणजेच विष्णू, चेन्नाकेशवा म्हणजे देखणा केशव. या मंदिराचे बांधकाम नरम सोपस्टोनच्या (क्लोरायटिक स्किस्ट नावाचा मऊ दगड) साह्याने करण्यात आले आहे. हस्तिदंत आणि चंदनाच्या कोरीव कामाच्या हाताळणीची परंपरा या मंदिराच्या शिल्पकलेतून प्रतिबिंबित होते.

येथे सुमारे ११८ शिलालेख सापडले असून, काही ताम्रपटही आहेत. या मंदिराचे काम तीन पिढ्यांतील शिल्पकार करत होते असे शिलालेखावरून दिसून येते. त्यावरून त्यातील काही कलाकारांचीही ओळख होते. रुवारीमल्लितम्मा (मल्ल्याण्णा) या शिल्पकाराने सुमारे ४० मूर्तींची निर्मिती केली आहे. दासोजी व त्याचा मुलगा चवण्णा यांचाही यात मोठा सहभाग होता. मदनिकांची शिल्पे करण्याचे श्रेय चवण्णा यांच्याकडे जाते.

मल्लितम्मा व दासोजी यांनी मुख्यत्वे प्राणी आणि पक्षी यांची शिल्पे केली. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मोहिनीशिल्प. तसेच गजसुरवध, जय विजय, शिलबालिका आणि अनेक मुद्रांमधील नर्तिका यांची शिल्पेही वेधक आहेत. गोपुरे, गाभारा, सभागृह, त्याचे छत व खांब अतिशय देखणे आहेत. हळेबिडूपासून आठ किलोमीटर अंतरावर चिकमंगळूर रस्त्यावर वेळवंडी येथेही अप्रतिम नारायण मंदिर आहे.

श्रवणबेळगोळश्रवणबेळगोळ (बाहुबली) : जैन मुनी बाहुबली यांच्या स्मरणार्थ कोरलेली भारतातील सर्वांत उंच (५७ फूट) जैन मूर्ती येथे आहे. चंद्रगिरी आणि विंध्यगिरी अशा दोन डोंगरांमधील विंध्यगिरीवर ही पहाडातील पाषाणामधील कोरीव मूर्ती आहे. आणखी ऐतिहासिक स्थानमहात्म्य म्हणजे इसवी सनापूर्वी ३०० वर्ष (२३०० वर्षांपूर्वी) ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याला हरविणारा मगधाचा चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू येथेच झाला. विरक्ती येऊन राजाने जैन धर्म स्वीकारला आणि साधू होऊन तो येथे येऊन राहिला होता.


जैन ग्रंथांनुसार, पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे अयोध्येचे राजे होते. त्यांना १०० पुत्र होते. त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारण्यापूर्वी आपले राज्य वाटून दिले. त्यापैकी बाहुबलीला मुंबईजवळील बोरिवलीनजीक पोदनपूरचे राज्य दिले होते, तर भरताला अयोध्येचे राज्य दिले होते. ऋषभदेव हिमालयात गेल्यावर ९८ पुत्रांनी आपले राज्य भरताच्या स्वाधीन करून ते जैन मुनी झाले. भरताने बाहुबलीला आपले आधिपत्य मान्य करण्याचा संदेश पाठवताच 

बाहुबलीने भरतास आव्हान दिले. राजाच्या मंत्र्यांनी सैन्य लढाई नाकारून दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्ध अशा तीन प्रकारे दोघांना युद्ध करायला सांगितले. युद्धामध्ये बाहुबलीने तीन्ही युद्धांत भरताला हरविले; पण त्यानंतर बाहुबलीला विरक्ती आली आणि त्याने आपले राज्य भरताला देऊन टाकले, अशी आख्यायिका आहे. त्याच्या स्मरणार्थ इ. स. ९८१मध्ये गंगा वंशाचा सेनापती चामुंडाराय याने श्रवणबेळगोळ येथील मूर्तीची निर्मिती केली. ही मूर्ती करण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला.

शेट्टीहल्ली चर्चशेट्टीहल्ली चर्च व हेमवती धरण : हेमवती नदीवर ५८ मीटर उंच व ४६९२ मीटर लांबीचे धरण बांधून १९७९मध्ये पूर्ण करण्यात आले. धरणाच्या पाण्यात बुडालेले चर्च कर्नाटकमधील शेट्टीहल्ली येथून दोन किलोमीटर अंतरावर आहे.

हेमवती धरणभारतात फ्रेंच मिशनऱ्यांनी १८६०च्या सुमारास बांधलेले हे चर्च गॉथिक वास्तुकलेतील एक भव्य रचना आहे. तेव्हापासून ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. हेमवती धरण व जलाशयाची बांधणी झाल्यानंतर चर्चचा वापर थांबविण्यात आला. तरीही आता ते पर्यटन केंद्र झाले आहे. मान्सून कालावधीत हे चर्च अर्धे पाण्यात बुडालेले असते. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. याला ‘दी फ्लोटिंग चर्च’ असेही म्हटले जाते.

मंजरिदाबाद किल्लामंजरिदाबाद किल्ला: हा किल्ला टिपू सुलतानाने १७९२मध्ये बांधला. येथील निसर्गरम्य सुंदरता पाहून पाहून टिपू मोहीत झाला व त्याने इथे किल्ला बांधला व त्याला मंजरिदाबाद किल्ला असे नाव दिले. हा किल्ला २०० फूट उंच अदाना टेकडीच्या वर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या भिंतीवर उभे राहून आसपासच्या परिसरावर नजर ठेवता येईल, अशी किल्ल्याची अष्टकोनी रचना आहे. घुसखोरी टाळण्यासाठी किल्ल्याच्या भिंतीबाहेर खंदक खणले गेले आहेत. गडाच्या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर फुलं आणि वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत. मुख्य दरवाजाच्या वरच्या छतावर आठ कोनांच्या किल्ल्याचा नकाशाही दिसतो. किल्ल्याच्या मध्यभागी एक तलाव आहे.

कसे जायचे?
बेलूर हे ठिकाण हसन रेल्वे स्टेशनपासून ३५ किलोमीटर व बेंगळुरूपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. चिकमंगळूरपासून ते २२ किलोमीटरवर आहे. जवळचा विमानतळ म्हैसूर येथे असून, तो १५० किलोमीटरवर आहे. म्हैसूरवरूनही बेलूर-हळेबिडूला जाता येते. चिकमंगळूर, शिमोगा, शृंगेरी, शरावती फॉल (जोग फॉल) ही ठिकाणेही आसपास पाहण्यासारखी आहेत. राहण्याची सोय बेलूर, हळेबिडू, हसन येथे होऊ शकते. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. उन्हाळ्यातही वातानुकूलित गाडीतून प्रवास करता येईल. येथील मंदिरांमध्ये आतून नैसर्गिक थंडावा अनुभवता येतो.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

मंजरिदाबाद किल्ला

चंद्रगिरी

( बेलूरची  झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About 334 Days ago
माहितीपूर्ण लेख! सुंदर व्हिडिओ!
0
0
Shilpa Soman. About 341 Days ago
👌👌👌
1
0
अजय राऊत About 342 Days ago
सर, आपण गाढे अभ्यासक आहातच.. आणि तुमचे अनुभव नेहमीच लिहून समाजाप्रती समर्पित करताहेत.. असेच लिखाण आम्ही अनुभवणे म्हणजेच 'जयंत दा'ने फक्त लिहिरे .. लिह .. हेच सांगणे ..
0
0
जयश्री चरेकर About 342 Days ago
अप्रतिम माहिती अन् सविस्तर
0
0

Select Language
Share Link
 
Search