Next
‘अप्पासाहेब हे सामाजिक बांधिलकी जपणारे द्रष्टे विचारवंत’
प्रेस रिलीज
Thursday, August 10, 2017 | 12:24 PM
15 0 0
Share this article:

आदर्श ग्रंथालयाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे.कराड (जि. सातारा) : ‘आजकाल माणसे फक्त स्वत:चा विचार करू लागली आहेत. त्यांच्यामधील कष्ट करण्याची प्रवृत्तीही कमी होऊ लागली आहे. अशा काळात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (अप्पासाहेब) यांच्या विचारांची नितांत गरज असून, अप्पासाहेब हे सामाजिक बांधिलकी जपणारे महाराष्ट्रातील एक द्रष्टे विचारवंत होते,’ असे गौरवोद्गार जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी काढले.

जयवंतराव भोसले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी भूषविले. या वेळी व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अप्पासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. लहाने यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील आदर्श ग्रंथालयांना स्व. जयवंतराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. अ वर्गातील आदर्श ग्रंथालयाचा पुरस्कार कराडच्या नगर वाचनालयाला प्राप्त झाला. ब वर्गातील पुरस्कार कै. शेवंताबाई पवार सार्वजनिक वाचनालय (पिंपळवाडी-साखरवाडी, ता. फलटण) क वर्गातील पुरस्कार स्व. लालासाहेब शिंदे सार्वजनिक वाचनालय (कुडाळ, ता. जावळी), ड वर्गातील पुरस्कार निनाईदेवी सार्वजनिक वाचनालय (गोकुळ तर्फ पाटण) यांना प्राप्त झाला.

बिबवी (ता. जावळी) येथील सीमा दीपक पवार यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्काराने; तर धोंडेवाडी (ता. खटाव) येथील शाहीर नारायण कदम यांना आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पर्धा परीक्षा ग्रंथ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यानंतर बोलताना डॉ. लहाने म्हणाले, ‘स्व. जयवंतराव भोसले यांच्यासारखी माणसे पुन्हा होऊ शकत नाहीत; पण त्यांच्या विचारांचे अनुकरण मात्र आपण नक्कीच करू शकतो. अप्पासाहेबांकडे दूरदृष्टी असल्याने आणि कष्ट करण्याची धमक असल्यानेच ते या परिसरात विकासगंगा आणू शकले. त्यांचा हा विकासाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा आपल्या लेकरांना सांगायला हव्यात. यातूनच कर्तृत्ववान पिढी घडू शकते.’

डॉ. सुरेश भोसले यांनी अप्पासाहेबांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले, ‘माणसाची सेवा करणे म्हणजे देवाची सेवा करणे हे ब्रीद अप्पांनी आयुष्यभर जपले. भाऊ-अप्पांच्या कार्याची बरोबरी महाराष्ट्रात कोणीही करू शकत नाही. अप्पांनी उभारलेल्या शिक्षणसंस्थांमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. अप्पांनी सुरू केलेल्या कृष्णा हॉस्पिटलची गणना आज महाराष्ट्रात राजीव गांधी जीनवदायिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील पहिल्या सात हॉस्पिटलमध्ये होत आहे. त्यांचे हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची असून, त्यासाठी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज आहे.’

मदनराव मोहिते म्हणाले, ‘कर्तृत्वाशिवाय माणूस मोठा होत नाही, हेच अप्पासाहेबांच्या जीवनकार्यावरून दिसून येते. अप्पासाहेब पुढील २५ वर्षांचा विचार करून, आपले शाश्वत विकासाचे धोरण आखत असत. नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्यासाठी त्यांच्या कार्याला सातत्याने उजाळा देण्याची गरज आहे.’
कृष्णा कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. पिनू जाधव यांनी आभार मानले.

या प्रसंगी महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅयड. बी. डी. पाटील, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विनायक भोसले, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जयवंतराव जगताप, कृष्णा कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील, जगदीश पाटील, शिवाजीराव थोरात, प्रदीप थोरात, रघुनाथराव मोहिते, प्राचार्या वैशाली मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अप्पासाहेब आज हवे होते!’
‘अप्पासाहेबांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. पण अतुल यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी राजकारणात येऊन भागाची प्रगती साधावी, असे अप्पांना मनोमन वाटत होते. आज त्यांना पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे, तर सुरेश यांना साखर उद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार दोनच दिवसांपूर्वी मिळाला आहे. या दोघांची भरारी पाहण्यासाठी अप्पासाहेब आज हवे होते,’ असे उद्गार ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी काढताच सभागृहातील वातावरण भावनिक झाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search