Next
खुदी को कर बुलंद इतना, की....
BOI
Monday, October 29, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:तेलंगण राज्यातील ‘बतुकम्मा’ आणि ‘बोनालु’ या दोन तेलुगू शब्दांना ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या ताज्या आवृत्तीत जागा देण्यात आली आहे. या शब्दांना हा मान देण्यासाठी एका महिला राजकारण्याने प्रयत्न केले, हेही विशेष. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत तेलुगूचा क्रमांक चौथा आहे. तसेच अमेरिकेत इंग्रजीव्यतिरिक्त सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेलुगूचा समावेश झाला आहे. या निमित्ताने विशेष लेख...
..............
ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी ही जगातील अत्यंत प्रतिष्ठित डिक्शनरी समजली जाते. या शब्दकोशात एखाद्या शब्दाने जागा मिळविली म्हणजे त्या शब्दाला इंग्रजी भाषेत जागा मिळाल्याची द्वाही फिरविल्यासारखेच असते. गेली काही वर्षे अनेक भारतीय शब्दांनी या शब्दकोशात स्थान मिळविले आहे. यंदा मात्र भारतातील एकाच राज्यातील दोन शब्दांनी ऑक्सफोर्ड शब्दकोशात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या राज्यातील लोकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. एखाद्या भाषक समूहाची आर्थिक स्थिती सुधारली, की तेथील संस्कृती आणि भाषेला कसा मान मिळतो, हेही त्यातून दिसून आले आहे.

तेलंगण राज्यातील ‘बतुकम्मा’ आणि ‘बोनालु’ या दोन तेलुगू शब्दांना ऑक्सफोर्डच्या ताज्या आवृत्तीत जागा देण्यात आली आहे. या शब्दांना हा मान देण्यासाठी एका महिला राजकारण्याने प्रयत्न केले, हेही विशेष. एरव्ही राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्यात आपण पुढे असतो आणि ती ओरड अनाठायी ठरू नये, यासाठी राजकारणीही शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात; मात्र येथे वेगळाच प्रकार घडला.

तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदार कल्वाकुंतला कविता यांनी हे दोन शब्द घेण्यासाठी ऑक्सफोर्डकडे आग्रहच धरला होता. ‘बतुकम्मा’ आणि ‘बोनालू’ हे दोन शब्द तेलंगण संस्कृतीची ओळख सांगणारे आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश करावा असा त्यांचा युक्तिवाद होता. ‘मला अत्यंत आनंद झाला आहे,’ असे ट्विट करून त्यांनी ऑक्सफोर्डच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘बतुकम्मा देवीचा तेलंगण राज्यातील शेकडो वर्षे जुना बतुकम्मा उत्सव शरद ऋतूत असतो. यात तेलुगू गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून देवीच्या जीवनाचे गुणगान केले जाते. तसेच स्त्रियांच्या आयुष्यातील तिचे महत्त्व स्पष्ट केले जाते. ‘जीवनाच्या मातेचे’ प्रतीक म्हणून फुलांची रास असते. त्यात लक्ष्मी किंवा गौरी यांची प्राणप्रतिष्ठा असल्याचे मानले जाते आणि या गाण्यांतून जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे वर्णन केले जाते. नंतर स्त्रिया या फुलांच्या देवतेचे पाण्यात विसर्जन करतात. बतुकम्मा ही मुख्य हिंदू देवी नाही. तिचे स्वतःचे मंदिर किंवा आकृती नाही. परंतु भक्त तिला लक्ष्मी, गौरी आणि दुर्गेचे रूप मानतात. या देवींप्रमाणेच तिच्याकडे कृषिजीवनाच्या समृद्धीची याचना केली जाते. दररोज दर्शन घेतले जात नसले किंवा तिची यात्रा नसली, तरी स्त्रियांसाठी ती पवित्र असते. तिच्या माध्यमातून शरद ऋतूतील जीवनाच्या संपूर्णतेचे प्रतिनिधित्व होते. तसेच निसर्ग आणि मानवतेच्या पुनरुत्थानाची आशा दिसून येते,’ असे बतुकम्मावरील या शब्दकोशातील नोंदीत म्हटले आहे.

जगात मूर्तींवर फुले वाहून देवांची पूजा केली जाते’ मात्र बतुकम्मा हा कदाचित एकमेव सण असावा, ज्यात फुलांचीच पूजा केली जाते. ‘एमेमी पुव्वोप्पुने गौरम्मा...एमेमी कायोप्पुने गौरम्मा...’ अशा प्रकारची गाणी या उत्सवात गायली जातात. या उत्सवात गाणे हाच केंद्रबिंदू असतो. ही गाणी निसर्ग आणि लोकांच्या जीवनशैलीशी संबंधित असतात. साधारणतः पावसाळा संपताना आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला (भाद्रपद अमावास्येपासून दुर्गाष्टमीपर्यंत म्हणजेच आपल्याकडील नवरात्रीच्या सुमारास) हा उत्सव साजरा केला जातो. थोडक्यात म्हणजे आपल्याकडील भोंडल्याच्या गीतांशी साधर्म्य सांगणारा असा हा उत्सव असतो. तेलंगण राज्यात गेल्या किमान एक हजार वर्षांपासून हा सण चालत आला आहे. बतुकम्मा ही स्त्री सन्मानाचे प्रतीक मानली जाते. तेलंगण राज्याला लागून असलेल्या मराठवाड्यातील काही भागांतदेखील हा सण साजरा केला जातो. बतूकु म्हणजे जीवन आणि अम्मा म्हणजे आई.

तेलंगण हा पूर्वीच्या आंध्र प्रदेशाचा भाग आणि आता स्वतंत्र राज्य. महाराष्ट्राशी त्याचे अतूट नाते आहे. कारण या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. मुख्यतः हैदराबादच्या निझामाचे राज्य असलेल्या संस्थानाचा भाग तेलंगणमध्ये मोडतो. आदिलाबाद, करीमनगर, निझामाबाद, मेडक, वारंगळ, खम्मम, हैदराबाद, रंगारेड्डी, नलगोंडा व मेहबूबनगर हे त्याचे जिल्हे. निझामाचे राज्य १७ सप्टेंबर १९४८ रोजी खालसा झाले आणि त्याच्या राज्याचे तीन तुकडे झाले. त्यातील काही भाग कर्नाटकात, काही भाग महाराष्ट्रात विलीन झाला आणि उरलेल्या भागाचे तेलंगण बनले. तेलुगू भाषक म्हणून तो आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. आंध्र हा मद्रास प्रांताचा भाग होता व तो विकास आणि शिक्षणात आघाडीवर होता. तेलंगण व आंध्र यांची संस्कृती वेगळी आहे, हा तेलंगण राज्याचा दावा होता. तेलंगण आंदोलन ऐन भरात असताना बतुकम्मा उत्सव हा त्यातील एक प्रमुख कार्यक्रम होता. त्या आंदोलनाला यश आले आणि चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार आले. त्यांनी पहिल्यांदा बतुकम्मा आणि बोनालु या दोन्ही उत्सवांना राज्य उत्सवांचा दर्जा दिला. आंध्र प्रदेशापासून वेगळे झाल्यापासून तेलंगण सरकारने बतुकम्मा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली. गावागावांमध्ये बतुकम्मा उत्सव भव्य स्वरूपात साजरे करण्याचे सरकारी आदेश काढण्यात आले. बतुकम्मा उत्सव आयोजित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपये देण्यात आले. तेलंगण राज्य स्वतःच्या प्रतीकांच्या शोधात होते आणि आजही तो शोध संपलेला नाही. बतुकम्माला ही आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणे हे त्यासाठीच त्यांना आवश्यक होते. त्यासाठी सर्व काही करण्याची त्यांची तयारी होती.      

त्याचप्रमाणे वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या भाषक समूहाची आर्थिक स्थिती आणि त्या भाषेला मिळणारे महत्त्व यांचे थेट गुणोत्तर असते. इंग्रजी जगभरात पसरली ती इंग्लंड मोठा असल्यामुळे नव्हे, तर आधी ती ब्रिटिश साम्राज्यवादातून विविध खंडांत पसरली आणि नंतर अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्यामुळे तिचा प्रसार झाला आहे. त्याचप्रमाणे तेलुगू भाषेला हे महत्त्व ती भाषा बोलणाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपस्थितीमुळे आहे. पंजाबी लोकांनी मोठ्या प्रमाणात ब्रिटन, कॅनडा व अन्य देशांत स्थलांतर केल्यामुळे असेच पंजाबीतील ‘पुत्तर’ इत्यादी शब्द इंग्रजीत शिरले आहेत. तसेच काहीसे तेलुगू भाषकांचे झाले आहे.

भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत तेलुगूचा क्रमांक चौथा आहे. अमेरिकेत इंग्रजीव्यतिरिक्त सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेलुगूचा समावेश झाला आहे. याच आठवड्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत म्हणजे २०१० ते २०१७दरम्यान अमेरिकेत तेलुगू बोलणाऱ्यांची संख्या ८६ टक्के वाढली असून, ती अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्या अन्य २० मोठ्या भाषांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. अमेरिकेत तेलुगू भाषकांची संख्या २०१०च्या तुलनेत दुप्पट म्हणजे चार लाखांहून अधिक झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. आंध्र आणि तेलंगणमध्ये मिळून ८०० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत आणि अमेरिकेत जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरमध्ये या अभियंत्यांचा वाटा मोठा आहे. तेथे पूर्वीपासून राहत असलेले तेलुगू उद्योजक तेलुगू लोकांनाच नोकरीत घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेही त्यांची संख्या वाढली आहे, असे म्हटले जाते.

जे अमेरिकेत तेच ब्रिटनमध्ये. ‘तुम्ही समर्थ व्हा म्हणजे तुमची भाषा समर्थ होईल,’ हाच त्यातील मथितार्थ! म्हणूनच ऑक्सफोर्ड शब्दकोशाला तेलुगू शब्दांची आवर्जून दखल घ्यावीशी वाटते. ‘खुदी को कर बुलंद इतना, की हर तक़दीर से पहले खुदा बंदे से ये पूछे, बता तेरी रज़ा क्या है’ असे अल्लामा इक्बाल यांनी उगीच नाही म्हटले!!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
prajakta deshpande About 267 Days ago
It's very important news for people who celebrate butukamma.I Know this festival because I lived on border side of Telangana.
0
0

Select Language
Share Link
 
Search