Next
अडचणी आल्या, तरी मोठे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करा
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना संकेत देवळेकर यांचा सल्ला
BOI
Saturday, September 29, 2018 | 05:19 PM
15 1 0
Share this story

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संकेत देवळेकर. शेजारी इंदुमती मलुष्टे.

रत्नागिरी :
‘अनेक अडचणी आल्या, तरी उद्दिष्ट मोठे ठेवा आणि त्या दिशेने वाटचाल करत राहा. मागील पेपर्स सोडवून नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवणे सहज शक्य आहे. ज्यात आपण कमी आहोत, त्याचा सराव जास्त करा. प्रत्येक विषयाला वेळ देणारे असे स्वतःचे वेळापत्रक प्रत्येकाने तयार करावे,’ असा मंत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीचा टक्का वाढला पाहिजे. याकरिता अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी चांगले मार्गदर्शन करत आहे,’ असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे २९ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अकादमीच्या अभ्यासिकेची विद्यार्थिनी अन्वी साळवी हिची जिल्हा परिषद भरतीमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाली. याबद्दल तिचा देवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अकादमीच्या समन्वयक इंदुमती मलुष्टे यांनी देवळेकर यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

अन्वी साळवीचा सत्कार करताना संकेत देवळेकर. शेजारी इंदुमती मलुष्टे. 

देवळेकर म्हणाले, ‘विश्वास नांगरे पाटील यांचे भाषण ऐकले आणि एमपीएससी परीक्षा द्यायचे ठरवले. २०१२पासून प्रयत्न केले. तलाठी, बँकिंग परीक्षाही उत्तीर्ण झालो. स्पर्धा परीक्षांसाठी सर्व विषयांचा अभ्यास अत्यावश्यक आहे. संकल्पना समजून घ्या व अभ्यासासाठी टिपणे काढून ठेवा. ७२ तासांत सराव झालाच पाहिजे. इंग्रजीची भीती बाळगू नका. इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे वाचा. त्यातून ताज्या घडामोडी कळतात. मी पुण्यात असताना ग्रुप स्टडीबद्दल माहिती मिळाली आणि हुशार विद्यार्थी अभ्यास कसे करतात ते पाहिले.’ 

‘अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूरच राहा. आपण आभासी जगात गुरफटतो व त्यातून निराशा वाढते,’ असा विशेष सल्लाही त्यांनी दिला.

‘उद्दिष्ट मोठे ठेवा. दोन तास सराव व चार तास नवा अभ्यास, गणित कठीण जात असेल तर चाळीसपर्यंत पाढे, वर्ग, घन पाठ करा. गेल्या पाच वर्षांतील आलेली गणिते व त्यांचे प्रकार व न येणारे प्रकार यांची प्रत्येकी ५० गणिते सोडवा. यश नक्कीच मिळेल,’ असा कानमंत्र त्यांनी दिला.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link