Next
सचिन, कोहलीचा वारसदार - पृथ्वी शॉ
BOI
Friday, December 29, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

पृथ्वी शॉ
आपल्या देशात क्रिकेटएवढी लोकप्रियता बाकीच्या खेळांना नसली, तरी अलीकडे हे चित्र बदलू लागले आहे. विविध प्रकारचे खेळ लोकांना आवडू लागले आहेत. खेळ हेच करिअर म्हणूनही निवडले जाऊ लागल्याचे प्रमाण वाढीला लागले आहे. त्यामुळे नवे खेळाडू घडू लागले आहेत. अशाच राज्यातल्या काही उदयोन्मुख, काही जुन्या आणि प्रतिभावान खेळाडूंची माहिती देणारे ‘क्रीडारत्ने’ हे साप्ताहिक सदर आजपासून सुरू करत आहोत. पहिला लेख क्रिकेटपटू पृथ्वी शॉबद्दलचा...

..............
भारतीय क्रिकेटचे नशीब खूपच बलवत्तर आहे. बघा ना, सुनील गावसकर निवृत्त झाले आणि सचिन तेंडुलकरचा उदय झाला. सचिनची कारकीर्द संपत आली आणि विराट कोहली नावारूपाला आला. कोहलीला भारतीय फलंदाजीचा सूर्य समजले, तर त्याच आकाशात पृथ्वी शॉ हा स्वतःचे नामकरण ‘चंद्र’ असे करायला सज्ज झाला आहे. प्रसिद्धीमाध्यमे, क्रिकेटचे जाणकार, समीक्षक पृथ्वीला आताच सचिन आणि कोहलीचा वारसदार म्हणायला लागले आहेत.

अर्थात या कौतुकाला पृथ्वी पात्र तर आहेच; पण त्याच्या कामगिरीची आकडेवारी आणि कारकीर्द पाहिली, तर आपणही हे मान्य करू, की समीक्षक म्हणताहेत त्या बाजारगप्पा नाहीत, तर उद्याच्या भारतीय क्रिकेटमधला तारा आपल्याला गवसलाय. आधी त्याने शालेय स्तरावर, क्लब स्तरावर, हॅरिस स्पर्धेत आणि नंतर थेट रणजी आणि दुलिप करंडकात आपली छाप पाडली. ‘अ’ संघातही त्याची निवड झाली आणि त्याने चॅलेंजर स्पर्धेत या संधीचे सोने केले. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर या सगळ्यांनीच त्याच्याकडे भारताचे नवे आशास्थान म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. याच सातत्याच्या जोरावर त्याची न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती झाली.

एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरी भारतीय संघात स्थान मिळवून देण्याचे प्रवेशद्वार समजली जाते. बघा ना महंमद कैफ, युवराज सिंग, गौतम गंभीर, पीयूष चावला, पार्थिव पटेल, दस्तुरखुद्द विराट कोहली, सुरेश रैना अशी कितीतरी नावे घेता येतील. या खेळाडूंनी एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडकात आणि ‘अ’ संघाकडून इतकी जबरदस्त कामगिरी केली, की त्यांच्यासाठी निवड समितीने भारतीय संघाची कवाडे खुली केली. मूळचा ठाणेकर असलेला व आता ‘एमआयजी क्लब’कडून खेळणारा पृथ्वी शॉ न्यूझीलंडमधील स्पर्धेत अफलातून कामगिरी करून येत्या काळात भारतीय संघात दाखल झालेला दिसणार यात तीळमात्रही शंका नाही. न्यूझीलंडमध्ये एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा येत्या १३ जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालवधीत रंगणार असून, पृथ्वी शॉ या स्पर्धेनंतर खऱ्या अर्थाने ‘इंडिया मटेरियल’ म्हणून ओळखला जाईल, याबद्दल विश्वास वाटतो.

एमआयजी क्लबरोझरी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून हॅरिस शिल्ड स्पर्धेत खेळताना पृथ्वीने ५४६ धावांची खेळी केली, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्याच वेळी त्याला ‘एमआयजी क्लब’कडून खेळण्याची ऑफर मिळाली; मात्र रोज ठाणे ते वांद्रे असा प्रवास, सराव, खर्च याचे वांधे होते. अशा वेळी एपीपी एंटरटेन्मेंट आणि इंडियन ऑइल यांनी पुढाकार घेऊन पृथ्वीला प्रायोजकत्व दिले आणि त्याचा ‘एमआयजी’कडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘एमआयजी’मध्ये राजीव पाठक यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम केले. मुंबईच्या खेळातील खडूसपणा, जिगर पृथ्वीमध्येही ठासून भरण्याचे काम त्यांनी केले. याचाच प्रत्यय पृथ्वीच्या रणजी आणि दुलीप करंडक स्पर्धेतील पदार्पणात आला.

एकेकाळी सचिन तेंडुलकरनेही रणजी आणि दुलीप करंडक स्पर्धेत पदार्पणातच शतकी खेळी केली होती. सचिनचाच कित्ता गिरवताना पृथ्वीनेही रणजी आणि दुलीप स्पर्धेतील पदार्पणातच शतकी खेळी साकारली व तेव्हाच त्याची सचिनशी तुलना नव्हे, पण बरोबरी केली जाऊ लागली. त्याला एस. जी. या क्रीडासाहित्य बनवणाऱ्या कंपनीने ३६ लाखांचे प्रायोजकत्व बहाल केले. इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या रकमेचे प्रायोजकत्व मिळवणारा पृथ्वी हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू बनला. प्रथम दर्जाचे केवळ आठ सामने खेळलेल्या पृथ्वीने पाच शतके आणि तीन अर्धशतके फटकावली आहेत.

अशा स्वरूपाची कामगिरी आधी सचिनने आणि नंतर विराट कोहलीने केली आहे. म्हणूनच पृथ्वीकडे सचिन आणि कोहलीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. ‘बीयाँड ऑल बाउंड्रीज’ या माहितीपटातही पृथ्वी शॉ याच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच हॅरिस स्पर्धेतील त्याच्या ५४६ धावांच्या खेळीचा धावता आढावा ‘यू-ट्यूब’वरही उपलब्ध आहे. उजव्या हाताने तडाखेबंद फलंदाजी करणारा पृथ्वी सर्वोत्तम ऑफस्पिन गोलंदाजीही करतो. शालेय क्रिकेटमध्ये प्रणव धनावडेने १००९ एवढ्या सर्वोच्च धावा केल्या, तोपर्यंत तो विक्रम पृथ्वीच्याच नावावर होता. इंग्लंडमध्ये मँचेस्टरमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी व जवळपास दोन महिने सरावासाठी गेलेला असताना पृथ्वीने १४४६ धावा केल्या. शिवाय तिथेही वेगवान खेळपट्टीवर पदार्पणातच शतकी खेळी करून त्याने इंग्लिश समीक्षकांचीही वाहवा मिळवली.

सचिन आणि कोहलीची शालेय, रणजी कारकीर्द ज्या पद्धतीने सुरू झाली, अगदी त्याच वाटेवरून पृथ्वी शॉची वाटचाल सुरू आहे. सचिन-कोहलीप्रमाणे पृथ्वीलादेखील संधी लवकर मिळाली व त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. आता न्यूझीलंडमधील विश्वकरंडक स्पर्धेतून परतल्यावर त्याला भारताच्या एकदिवसीय व टी-२० सामन्यात संधी मिळाली, तर मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळेल. शिवाय दडपण कसे हाताळायाचे याचेही ज्ञान मिळेल. विराट कोहली हा गुणवत्तेवर विश्वास ठेवणारा कर्णधार आहे आणि पृथ्वीने न्यूझीलंड गाजवले, तर कोहलीच स्वतः पृथ्वीची निवड समितीकडे शिफारस करील, यात शंका नाही.

नऊ नोव्हेंबर १९९९ हा त्याचा जन्मदिन. आज वयाच्या अठराव्या वर्षीच त्याच्याकडे ‘इंडिया मटेरियल’ म्हणून पाहिले जात आहे. खूप कमी खेळाडू असे असतात, की अगदी लहान वयातच त्यांची प्रतिभा जगासमोर येते. सचिनच्या पाऊलवाटेचे रूपांतर कोहलीने ‘हायवे’मध्ये केले. आता या ‘हायवे’चे चौपदरीकरण पृथ्वी शॉने करावे. म्हणजे मग कोहलीनंतर भरवशाचा फलंदाज कोण हा प्रश्नच पडणार नाही. पदार्पणातील रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूविरुद्ध दुसऱ्या डावात सामना वाचवणारी शतकी खेळी पृथ्वीने केली आणि अवघ्या समीक्षकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. या खेळीत पृथ्वीने कॉपीबुक फलंदाजीबरोबरच वेळप्रसंगी जोखमीचे फटकेदेखील मारले. तिथेच त्याचा दर्जा आणि गुणवत्ता दिसून आली.

त्याच्या या कामगिरीबद्दल एका कार्यक्रमात खुद्द सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला, तेव्हा ‘क्रिकेटच्या देवा’ने पृथ्वीचे कौतुकही केले व युक्तीच्या चार गोष्टीही सांगितल्या. मुंबईच्या क्रिकेटला भारतीय क्रिकेटच्या राजधानीचे महत्त्व आहे. आता याच राजधानीतून किंवा खाणीतून म्हणा, पृथ्वी शॉ नावाच्या हिऱ्याचा शोध लागला आहे. येत्या काळात त्याच्यावर आणखी पैलू पडोत आणि त्याचा भारतीय संघात समावेश होवो, हीच अपेक्षा आहे. देशाने सचिन पाहिला, कोहली पाहतो आहे, त्यानंतरची राजवट पृथ्वी शॉ याची राहील याची साक्ष त्याची आजवरची छोटी का होईना, पण सातत्यपूर्ण कारकीर्द निश्चितच देत आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

- अमित डोंगरे

ई-मेल : amitdongre10@gmail.com
(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search