Next
सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, July 16, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोमुंबई : ‘राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरू आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार आहे,’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘बृहन्मुंबई परिसरात कांदळवन कक्ष नऊ लाख रोपे लावणार आहे. याशिवाय तीन लाख रोपे ठाण्यात, १३ लाख रोपे डहाणूत, रायगड जिल्ह्यात १५ लाख, रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख रोपे लावली जाणार आहेत. आतापर्यंत ३.३३ लाख रोपांची लागवड झाली असून, उर्वरित कांदळवन रोपे ऑगस्टनंतर लावली जातील.’ 

कांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भांडार समजले जाते. मत्स्य बीज तयार होण्याचा उगम व स्रोत आहे. त्याचबरोबर त्सुनामी आणि चक्रीवादळापासून समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये कांदळवन क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका बजावते. कांदळवन क्षेत्रात सागरी जीवांचे चिरकाल संवर्धन होते हे लक्षात घेऊन कांदळवन कक्षामार्फत कांदळवन विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘मुंबईतील कांदळवन कक्षातर्फे लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात २५ हजार लोकांनी सहभाग घेतला. त्यात ११.०३ किमी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील आठ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या अभियानाला ‘शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतात्तील सर्वांत मोठे अभियान’ असे संबोधण्यात आले आहे,’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कांदळवन संयुक्त वन सह व्यवस्थापन समित्या स्थापन करून त्याद्वारे लोकसहभाग घेऊन कांदळवनाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे.  त्या शिवाय स्थानिक लोकांना कालवे पालन, खेकडा पालन, ओएस्टर फार्मिंग आदींद्वारे रोजगार आणि उपजिविकेची साधने निर्माण करून देण्यात येत आहेत. महिला बचत गटांना ताकद देऊन कांदळवन संरक्षणामध्ये त्यांचा सहभाग घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्यासाठी शासनाने तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, अशाप्रकारे प्रतिष्ठान स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे  मुनगंटीवार यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search