Next
मूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा
रत्नागिरी जिल्हा मूकबधिर असोसिएशनची स्थापना
BOI
Monday, December 03, 2018 | 03:11 PM
15 1 0
Share this article:रत्नागिरी :
मूकबधिर व्यक्तींच्या परस्परसंवादावर बंधने असली, तरी खाणाखुणा करून त्या एकमेकांशी संवाद साधू शकतात; मात्र फोनवरून असा संवाद साधणे अशक्य होते. आता मात्र व्हिडिओ कॉलची सुविधा अगदी सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे मूकबधिरांना दूरवरच्या व्यक्तींशीही सांकेतिक भाषेत संवाद साधणे शक्य झाले आहे. आजच्या (तीन डिसेंबर २०१८) जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा मूकबधिर असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या संघटनेतील सर्वांसाठीच नव्या तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग होणार आहे. रत्नागिरीतील कै. केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी असलेल्या संपर्कातून आणि पुण्या-मुंबईतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेऊन ही संघटना सुरू केली आहे. दोन डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात या संस्थेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. ही संघटना टप्प्याटप्प्याने राज्य स्तरापर्यंत काम करणार आहे. 

मूकबधिर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे. त्यांना शाळा व संस्थेचे सहकार्य नेहमीच मिळते. विविध ठिकाणी असलेल्या शाळेच्या १०० माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही जिल्हा संघटना सुरू केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग हे विद्यार्थी करत असून, व्हिडिओ कॉलद्वारे खाणाखुणा करून संवाद साधतात. सध्या केवळ अभ्यंकर विद्यालयाच्या मुलांचा आणि मुलींचा व्हॉट्सअॅप ग्रुप असून, आता जिल्हा संघटनेची स्थापना झाल्यामुळे या शाळेचे विद्यार्थी नसलेल्या मूकबधिरांनाही संघटनेच्या नव्याने सुरू होणार असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा उपयोग होणार आहे. मूकबधिरांचे वधू-वर मेळावे, आरोग्य तपासण्या, सरकारी योजना, रोजगार, नोकऱ्या आदी गोष्टींसंदर्भातील माहिती या ग्रुपवर शेअर केली जाणार आहे. त्याचा सर्वांच्या विकासासाठी मोठा उपयोग होणार आहे.रविवारी झालेल्या कार्यक्रमात यशस्वी मूकबधिर व्यक्तींनी आपापली माहिती सांगून यश कसे मिळवले हे सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हाताच्या खाणाखुणांच्या सांकेतिक भाषेत प्रभावीपणे संवाद साधला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जयसिंग काळे, पिंपरी-चिंचवड येथील परशुराम बसवा, राहुल साठ्ये, रुचा साठ्ये, वीणा कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशस्वितेचे रहस्य मुलाखतीद्वारे सांगितले. 

उद्घाटन कार्यक्रमाला आस्था फाउंडेशनच्या प्रमुख सुरेखा जोशी-पाथरे, अभ्यंकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, विद्यमान मुख्याध्यापिका अनुराधा ताटके, शिक्षक गजानन रजपूत, रमेश घवाळी, सीमा मुळ्ये आदी उपस्थित होते. ‘समाजात मूकबधिर व्यक्तींची संख्या कमी आहे. ऐकायला येत नसल्याने बोलता न येणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक असते. त्यांना स्पीच थेरपी, अत्याधुनिक मशीनद्वारे थोडे-फार बोलता येईल, यासाठी अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात प्रयत्न केले जातात. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खूपच अत्यावश्यक असून, पालकांनीही मानसिकता बदलली पाहिजे,’ असे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले.

या वेळी सुरेखा जोशी म्हणाल्या, ‘आपल्या हक्कासाठी आपल्याला झगडावे लागते.  सर्व दिव्यांगांनी एकत्रित, संघटित राहिल्यास अनेक गोष्टींचा लाभ मिळू शकतो. यामध्ये शासकीय योजनासुद्धा आहेत. आपले हक्क काय आहेत, याची माहितीही सर्वांनी घेणे आवश्यक आहे.’

(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... कर्णबधिरांना बोलते करण्याच्या हेतूने सोलापुरात सुरू झालेल्या बोलवाडी या प्रकल्पाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search