Next
आवर्जून वाचावी अशी ‘रानबखर’
BOI
Saturday, April 14, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this story

मिलिंद थत्ते यांनी लिहिलेलं ‘रानबखर’ हे पुस्तक मुख्यतः लक्षात राहतं ते आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून; पण ते त्यापुरतंच मर्यादित नक्कीच नाहीये. पुस्तकात समस्या मांडल्या आहेत; पण त्यांची उत्तरंही सुचवली आहेत. ही बखर आहे, इतिहास नाही. लेखकानं स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ती ‘रानबखर.’ त्या पुस्तकाचा आरती आवटी यांनी करून दिलेला हा परिचय...
.........
‘रानबखर’ हे पुस्तक जानेवारी २०१४मध्ये प्रकाशित झालं. लगेच वाचायचं ठरवूनही विकत घ्यायलाच २०१५चा मे महिना उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून... पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. पुस्तकात समस्या मांडल्या आहेत; पण त्यांची उत्तरंही सुचवली आहेत. दिलेले बहुतांश पर्याय पटण्याजोगे आहेत. कारण लेखक मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत.

पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचं जंगलाशी असलेलं नातं, त्यांचं परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेलं त्यांचं मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्यांचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे, तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांचं सविस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळं वर्णन आहे. असं हे सगळं विस्तारानं वाचल्यानं पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.

नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उद्ध्वस्त झालेली आयुष्यं, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं, केलेली फसवणूक याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी ‘रिझर्व्ह फॉरेस्ट’ आणि ‘बफर झोन’ या शब्दांचं कोण कौतुक होतं मला; पण त्यांचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली त्यांनी नक्की काय भोगलं असेल, ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच असं नाही; पण अशी अनेक उदाहरणं आहेत, जी अस्वस्थ खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलंच एक उदाहरण नन्हेरामचं. पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामनं एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला ‘साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेव्हा होडीतून जात असतो, तेव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझं गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळं कायमचं हरपलं आहे, या जाणिवेनं माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही.’

मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री, सातपुड्याची सफर घडवून, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगड गाठून थेट झारखंडपर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती या पुस्तकात इतकी सहज-सोप्या भाषेत दिली आहे, की डोळ्यांपुढे नकाशाच उभा राहतो. पुस्तकातली भाषा ही ‘पुस्तकी’ अजिबातच नाही. रोखठोक बोलीभाषा आहे. आणि त्यामुळेच एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने अगदी समोर बसून त्याची तळमळ/तळतळ आपल्यासमोर मांडवी आणि आपण फक्त अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा अनुभव ‘रानबखर’ वाचताना येतो.

बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या ‘कारभाराची’ नुसती वर्णनं वाचूनच माझे पाय गळाले. त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं राहण्यास प्रोत्साहन देणाऱ्या ‘वयम्’ टीमला सलाम. 

आवर्जून वाचावी अशीच आहे ही ‘रानबखर.’

पुस्तक : रानबखर - आदिवासींच्या जीवनसंघर्षाचे पदर
लेखक : मिलिंद थत्ते.
प्रकाशन : समकालीन प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ९५.
मूल्य : १०० रुपये. 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link