Next
क्रिकेटचा युवराज!
BOI
Monday, June 10, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:आपल्या खेळण्यातून ‘मॅचविनर’ अशी प्रतिमा तयार केलेला क्रिकेटपटू युवराजसिंग याने १० जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रत्यक्ष जीवनातही त्याने कॅन्सरसोबतची मॅच जिद्दीने जिंकली आणि यशस्वीपणे खेळात पुनरागमन केले. त्यामुळेच तो केवळ खेळाडू नव्हे, तर अनेकांचा प्रेरणास्रोत आहे. त्याच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख...
.............
जागतिक क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट जर सचिन तेंडुलकर असेल, तर युवराज हा राजपुत्र होता. दोन हजार साली युवराजने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हापासून यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेपर्यंत त्याच जिगरबाज वृत्तीने त्याला खेळताना आपण पाहिलंय. 

आम्ही लतादीदींना, आशाताईंना गाताना पाहिलंय, अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहिलाय, सचिनला जागतिक क्रिकेटच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना पाहिलंय आणि युवराजला कॅन्सरसारख्या आजारातही देशासाठी खेळून जिंकून देताना पाहिलंय, असं आपण येणाऱ्या पिढीला सांगू शकतो. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केनियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दोन हजार साली पदार्पण केले. हा खेळाडू खरे तर कसोटी सामन्यांसाठी नव्हताच; तरीदेखील त्याला २००३ साली कसोटी क्रिकेटसाठी पहिल्यांदा निवडण्यात आले. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता होती, तरीही तो कसोटी क्रिकेटमध्ये फारसा रमला नाही. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मात्र तो जागतिक क्रिकेट साम्राज्याचा राजपुत्र असल्याच्या थाटात खेळला. 

३०४ एकदिवसीय सामन्यांत युवराजने १४ शतके आणि ५२ अर्धशतके यांच्या मदतीने आठ हजारांहून जास्त धावा केल्या. ५८ टी-२० सामने खेळताना त्याने आठ अर्धशतकांच्या मदतीने अकराशेपेक्षा जास्त धावा केल्या. प्रथम दर्जाच्या १३९ सामन्यांत त्याने २६ शतके आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने आठ हजारांपेक्षाही जास्त धावा कुटल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये उपयुक्त गोलंदाजी करताना त्याने शंभरपेक्षाही जास्त बळी मिळविले आहेत. ज्या वेळी संघात अष्टपैलू खेळाडूची गरज होती, तेव्हा युवराजने संघाला आपली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबरोबर गोलंदाजीचाही उपयोग करून दिला. 

युवराज एक डावखुरा फलंदाज, अफाट गुणवत्ता असलेला फिरकी गोलंदाज तर होताच; मात्र दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सप्रमाणे अफलातून क्षेत्ररक्षकही होता. टी-२० क्रिकेटच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत २००७ साली त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याची किमया केली होती. ती त्याची खेळी कायमच क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहील. क्रिकेटपटू होण्यापूर्वी त्याने टेनिस व रोलर स्केटिंगमध्येही बक्षिसे मिळविली होती; मात्र शालेय स्तरानंतर त्याने क्रिकेटकडे लक्ष दिले व रणजी करंडक स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळविले. डीएव्ही शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्याने याच महाविद्यालयातुन वाणिज्य शाखेची पदवीदेखील मिळविली. त्याने मेहंदी सांगा दी आणि सरदारा या लघुपटांतून बालकलाकार म्हणून अभिनयदेखील केला होता. तीन वर्षांपूर्वी त्याने बिग-बॉस फेम अभिनेत्री व मॉडेल हेझल कीच हिच्याशी विवाह केला. 

युवराज महेंद्रसिंह धोनीच्या आधी संघात आला. एक खेळाडू म्हणून त्याने देशाला सातत्याने विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठवली. म्हणूनच तो ‘मॅचविनर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याचा खेळ जास्त बहरायचा. त्याचे चपळ क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघांसाठी आव्हान ठरत होते. त्याने कारकीर्द जितकी गाजवली, तितकाच एक व्यक्ती म्हणूनही तो लोकप्रियता टिकवून होता. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा देशाला जिंकून दिली. त्या स्पर्धेत युवराजने नेत्रदीपक कामगिरी केली. त्या स्पर्धेनंतर लगेचच युवराजला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. याचा अर्थ त्याला त्रास होत असतानाही त्याने त्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. आपले दैवत असलेल्या सचिनसाठी त्याने प्रत्येक सामन्यात लाजवाब खेळी करून संघाला जवळपास २८ वर्षांनी भारतीय संघाला विश्वकरंडक जिंकून दिला. आपण एका खास व्यक्तीला विश्वकरंडक विजयाची भेट देण्यासाठी खेळणार आहोत, असे त्याने सांगितले होते. ही व्यक्ती सचिनच होती हे त्याने विश्वकरंडक उंचावताना सांगितले. 

उपचारांसाठी त्याने अमेरिका गाठली. उपचारांच्या खडतर कालावधीनंतर युवराज या आजारातून बरा झाला, मायदेशी परतला; मात्र त्यानंतर त्याने जितके सामने खेळले, त्यात एकदाही तो पूर्वीचा युवराज दिसला नाही. तेव्हाच खरे तर तो निवृत्ती जाहीर करेल असे वाटले होते; मात्र त्याला स्वतःला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा होती. यंदा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्याला संधी मिळेल असे त्याला वाटले होते; मात्र संघ निवड झाल्यानंतर आपले नाव खेळाडूंच्या यादीत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या मनात निवृत्तीचे विचार डोकावू लागले व १० जून २०१९ रोजी त्याने त्याबाबतची अधिकृत घोषणा केली. 

इथून पुढे इंडियन प्रीमिअर लीग व त्यासारख्या जागतिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धांत अणखी काही वर्षे सहभागी होणार असल्याचेही त्याने सांगतले आहे. क्रिकेटशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही असे सांगणाऱ्या युवराजने इथून पुढे कॅन्सरच्या रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. 

त्याने ‘युवीकॅन’ नावाची एनजीओ सुरू केली असून, ज्या उपचारांनंतर आपण या आजारातून बरे झालो, त्याचप्रमाणे देशातील अनेक रुग्णांना बरे करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. ‘एक क्रिकेटपटू म्हणून देश मला नेहमीच ओळखेल; मात्र आता समाजासाठी योगदान देणारी व्यक्ती म्हणून ओळख व्हावी, हीच इच्छा आहे,’ असे त्याने सांगितले.

एका जागतिक स्तरावरच्या इतक्या मोठ्या खेळाडूला आपली निवृत्ती एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची वेळ येते तेव्हा खरोखर वाईट वाटते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर देशात होणाऱ्या कोणत्यातरी मालिकेत संघात निवड करून मैदानावर निवृत्ती जाहीर करण्याची संधी द्यायला हवी होती. देशासाठी इतके मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूचा तो योग्य सन्मान ठरला असता; मात्र मंडळाने तसे केले नाही, याची खंत वाटत राहणार आहे. वीरेंद्र सेहवाग, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्या बाबतीत जे झाले, तेच युवराजबाबत झाले, याची चाहत्यांना कायम रुखरुख वाटत राहील. 

जोवर क्रिकेट आहे, तोवर जागतिक क्रिकेटच्या या राजपुत्राची ओळख कायम राहणार आहे. नॅटवेस्ट मालिकेतील त्याची कामगिरी, २०११च्या विश्वकरंडकातील कामगिरी अशा त्याने केलेल्या अनेक खेळी क्रिकेटशौकीनांच्या कायम स्मरणात राहतील. एक खेळाडू, एक अत्यंत चांगली व्यक्ती आणि समाजासाठी काम करण्याची कळकळ वाटणारा माणूस म्हणून त्याची ओळख क्रिकेटचाहते कधीच विसरणार नाहीत. 

- अमित डोंगरे, पुणे (क्रीडा लेखक)

संपर्क : ८७९३४ ३२८०४

(दी टेस्ट ऑफ माय लाइफ हे युवराजसिंगचे आत्मचरित्र बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sarika About 126 Days ago
👌👌👌👌👌👌👌👌👌
0
0
Sarika About 126 Days ago
Best...
0
0

Select Language
Share Link
 
Search