Next
पावसचे आदर्श कर्मयोगी भाऊराव देसाई आंबेवाले
BOI
Sunday, July 01, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पावसचे स्वामी स्वरूपानंदपावसचे देसाई बंधू आंबेवाले आज जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या उद्योगाचा पाया ज्यांनी घातला, ते पावसचे भाऊराव देसाई म्हणजे आदर्श कर्मयोगी. भाऊंचे संपूर्ण जीवन स्वामी स्वरूपांनंदांच्या चरणी लीन होते आणि त्यांच्या त्यागमय सेवाकार्यामुळे पावस हे कोकणातले प्रति पंढरपूर बनले. भाऊराव देसाई आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या स्नेहबंधाबद्दल सांगत आहेत प्रसिद्ध लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
...........
सन १९७३च्या डिसेंबरमध्ये मला स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह मिळाला. स्वामींनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधी घेतली, तोपर्यंत पावसला (ता. जि. रत्नागिरी) तीन-चार वेळा जाणे झाले. देसाई कुटुंबाच्या ‘अनंत निवासा’त स्वामीजींचे ४० वर्षे वास्तव्य होते. समोरच स्वरूपाश्रम होता. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तवर्गाची संपूर्ण व्यवस्था देसाई कुटुंब आणि सेवावृत्तीने तिथे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना बघावी लागे. हसतमुखाने, मनापासून ती केली जात असे. भाऊराव देसाई आणि त्यांचे सुपुत्र जय-विजय यांच्याशी आणि पुण्यात वसंतराव देसाई यांच्याशी तेव्हापासून स्नेहबंध निर्माण झाला. रत्नागिरीच्या पं. पुरुषोत्तमशास्त्रींचा मी जावई. म्हणून भाऊसुद्धा मला जावई म्हणायचे. स्वामीजींची त्यांनी अहोरात्र, तन-मन-धन संपूर्ण अर्पून सेवा केलीच आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अखंड उत्कर्षासाठी आपले आयुष्य वाहिले.

रघुनाथ वासुदेव तथा भाऊ देसाई यांचा जन्म दोन फेब्रुवारी १९१४ रोजी पावस (जि. रत्नागिरी) येथेच झाला. त्यांना ८४ वर्षांचे आयुष्य लाभले. जगप्रसिद्ध ‘देसाई आंबेवाले’ ही त्यांची ओळख. त्यांच्या परिवाराने प्रचंड कष्ट आणि चिकाटीच्या द्वारे इतरही अनेक उद्योग यशस्वीपणे चालवले. प्रामुख्याने पुणे शहरात ते भरभराटीला आले. भाऊंनी आपला उद्योग-व्यवसाय आणि सेवा मंडळाचे कार्य यात योग्य ते अंतर ठेवले. शिस्तबद्ध काम करताना प्रसंगी कडक धोरणेसुद्धा अवलंबली. एक आदर्श संतनगरी म्हणून त्यांनी पावस गावाला स्थान प्राप्त करून दिले. देहात प्राण असेपर्यंत एकमेव स्वामीनिष्ठा आणि स्वामीकार्य! स्वामी आणि भाऊ जणू एकरूपच झाले होते. सात डिसेंबर १९९८ रोजी भाऊ स्वामीचरणी पुन्हा रुजू झाले.

सन २०१४ हे भाऊरावांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्या निमित्ताने स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने ‘स्वामी कृपांकित कर्मयोगी भाऊ’ हा गौरवग्रंथ प्रसिद्ध केला. त्याचे संपादक आहेत डॉ. ब. ना. तुरंबेकर. एकूण ६४ लेखांचा त्यात समावेश आहे. जपानच्या एका व्यक्तीनेही त्यात भाऊंच्या स्मरणार्थ इंग्रजीत एक लेख लिहिला आहे. ग्रंथामधून भाऊंचे संपूर्ण जीवन उलगडते. एक प्रकारे स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राची ती पुरवणीच आहे. कारण कुठलाही लेख स्वामींच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. प्रस्तावनेत डॉ. तुरंबेकर लिहितात : संत नामदेव श्री विठ्ठलाशी असा संवाद साधतात, की ‘सापडलो एकमेका। जन्मोजन्मी नाही सुटका॥’ अगदी तसेच स्वामी आणि भाऊ एकमेकांना ‘सापडले!’ भाऊंचे पूर्वसुकृतच तेवढे महान असणार! जणू रामभक्त हनुमानच. स्वामींच्या समाधी-मंदिरात, त्यांच्या जन्मस्थानाजवळ भाऊंचा पुतळा उभा राहिला, हे यथोचितच आहे.    

भाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. (त्या वेळचे मॅट्रिक म्हणजे आजचे द्विपदवीधर). १९४२च्या लढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांना रत्नागिरीत दोन महिने तुरुंगवास घडला. पावस आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांनी देवळे आणि रस्त्यांचे बांधकाम करून घेतले. ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटीत ते सभासद व पुढे अध्यक्ष होते. हापूस आंब्यांची विक्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला. सन १९३७मध्ये त्यांनी कराचीलाही आंबा विक्रीचे दुकान काढले होते; पण व्यावहारिकदृष्ट्या विचार करून ते पुढे बंद केले.

पुण्यात १९३०मध्ये प्रथम भाड्याच्या आणि नंतर १९५४पासून स्वत:च्या जागेत त्यांनी आंबा विक्री सुरू केली. मदतीला तीन मुले होतीच. शनिपार चौकातील आंबेवाले देसाईंची प्रसिद्ध वास्तू १९६५मध्ये बांधण्यात आली. व्यवसायाचा अनेक दिशांनी विस्तार होत गेला. पुणे हे त्यांचे प्रमुख उद्योग केंद्र ठरले. आंब्याबरोबर अन्य कोकण मेवा, कॅनिंग, नर्सरी आणि नंतर दोन लॉजिंग, दोन मंगल कार्यालये सुरू झाली. पावसलाही स्वामी-भक्तांच्या सोयीसाठी ‘माऊली माहेर’ हे निवासस्थान बांधले. समाधी मंदिर आणि अन्य वास्तूंचा हळूहळू विस्तार होत गेला.

स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीत भाऊराव आणि सुशीलाबाई

भाऊरावांचा विवाह पावसलाच १२ मार्च १९३५ रोजी झाला. त्यांना सहा मुले आणि दोन मुली. एक मुलगा डॉक्टर आहे. आता नातवंडेही व्यवसायात उतरली आहेत. व्यवसायाची व्याप्ती मोठी असेल, तर ओघानेच होणारा विस्तार सांभाळण्यासाठी घरच्या लोकांचीच आवश्यकता असते. बराचसा सेवकवर्गही कोकणातील असल्यामुळे तो कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. भाऊंच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या सहधर्मचारिणी सुशीलाबाईंचे सहकार्य अमूल्य ठरले.

स्वामी स्वरूपानंदांनी सोप्या भाषेत ‘अभंग ज्ञानेश्वरी’ची रचना केली. मोठ्या आकारातील या दोन खंडांची पृष्ठसंख्या ८०० आहे. हा दैवी प्रसादग्रंथ घरोघरी जावा, या विचाराने भाऊंनी ५० लाखांचा ‘प्रकाशन निधी’ उभारला. त्याच्या व्याजातून प्रकाशनाची व्यवस्था केल्याने फक्त ४० रुपयांत भाविकांना दोन्ही खंड मिळू लागले. हा प्रकल्प फारच महत्त्वाचा म्हणता येईल. वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी खासगी प्रकाशकांनी त्याचा आदर्श आज घेण्यासारखा आहे.

वसंत, जयंत आणि विजय या तीन सुपुत्रांसह भाऊराव

भाऊ अखंड कार्यरत राहिले. पावसच्या भक्तनिवासाचे बांधकाम त्यांच्याच पुढाकाराने झाले. प्रत्येक कामात त्यांचा स्वत:चा आर्थिक सहभाग प्रामुख्याने असायचा. समाधी मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी त्यांची करडी नजर असे. रोजची पूजाअर्चा, आरती, जप, महाप्रसाद, निवास व्यवस्था या सगळ्यांत भाऊंचा रोज प्रत्यक्ष सहभाग असायचा. स्वामींचा वार्षिक जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याची परंपरा त्यांच्याच आधिपत्याने सुरू झाली. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मोठमोठ्या व्यक्ती पावसला भेट देत. त्यांची व्यवस्था भाऊ जातीने बघत. अर्थात, लहान-मोठा, जात-धर्म असा भेदभाव तिथे नव्हताच आणि आजही नाही. संस्थेचे संस्थान होताना ज्या अनिष्ट प्रथा, स्वार्थ, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचा संभव असतो, त्यांना पावसमध्ये थाराही नाही.

स्वामी ‘अनंत निवासा’त असताना, बाहेरून येणाऱ्या लोकांची सरबराई देसाईंच्या घरातच होत असे. मलाही बऱ्याच वेळा त्याचा लाभ झाला. स्वामींचे शिष्य आणि अन्य बरीच मान्यवर मंडळी तिथे भेटत. सर्वश्री अमलानंद (मामा फडके), माधवनाथ, विद्यानंद (पांडे), स्वामी सत्यदेवानंद, भाऊराव आठवले, माधवराव पटवर्धन, चित्रकार सालकर, तळेकर, सुमनताई ताडे, जामसंडेकर, प्रा. म. अ. कुलकर्णी, माधवानंद, मकरंदनाथ आणि अनेकानेक. हे सगळे देसाई कुटुंबाचा एक भागच बनले होते. या सगळ्यांना भेटण्याचे आणि त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. स्वामींना जाऊन यंदा ४४ वर्षे पूर्ण होतील; परंतु त्या सर्व स्मृती अद्याप जागृत आहेत. पं. पुरुषोत्तशास्त्री फडके यांची आणि माझी पहिली भेट डिसेंबर १९७३मध्येच झाली. त्या वेळी त्यांचे गायत्री पुरश्चभरण चालू असल्याने मौन होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे सात डिसेंबर १९७५ला ते माझे सासरे झाले. एकाच वेळी गुरू आणि गुरुसदृश सासऱ्यांची प्राप्ती!

वर उल्लेख केलेल्या काही जणांचे, नातलगांचे आणि सुहृदांचे लेख भाऊरावांच्या जन्मशताब्दी गौरवग्रंथात आहेत. भाऊंचे संपूर्ण जीवन स्वामीचरणी कसे लीन होते आणि त्यांच्या त्यागमय सेवाकार्यामुळे पावस हे कोकणातले प्रति पंढरपूरच कसे बनले, याचा इतिहास पुस्तकातून उभा राहतो. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा.

अखेरच्या दिवसांपर्यंत भाऊ तरुणांनाही लाज वाटेल इतके कार्यमग्न असत. विचार व वाणी स्पष्ट आणि ताठ बैठक, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देसाईंचा वंशवृक्ष आज खूपच विस्तारला आहे. घरचे व्यवसाय आणि स्वामीकार्य हातात हात घालून चालते. एखाद्या सत्पुरुषासारखे भाऊंचे जीवन हा सर्वांचा आदर्श आहे आणि तो अव्याहतपणे तसाच राहील. कर्मयोगी भाऊराव देसाईंना श्रद्धापूर्वक आदरांजली!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 173 Days ago
Hope , he passes his knowledge / expertise to others . That. Would Help exports and local employment .
0
0
JAGDISH KHER About
Keeping in his tradition of too nice style of writing, Shri Ravindra has precisely written biography of late Shri Bhau. Regds,
0
0
Anand G Mayekar About
Amhi gelya May mahinyat Ratnagiri yethe Alo hoto. Swarupanand Swamincha math pahanyacha you julun ala. Khupach prasanna Ani paropkari vatavaran. Parantu Bhaurao Desain baddhal yevdhi mahiti navhati. Aplya lekhatun ti vachayala milali. Manahpurvak Dhanyawad. Swaminchya mathatil chhayachitre jar astil tar krupaya pathval ka? Shubham Bhavatu Anand Mayekar Thane Luiswadi Maharashtra
0
0

Select Language
Share Link
 
Search