पुणे : ‘भारत सरकारच्या केंद्रीय शिखर संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण शिक्षणाच्या ९० टक्के खर्च होतो; मात्र तेथून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी देशाबाहेर कार्यरत राहण्यास पसंती देतात. त्याऐवजी त्यांनी देशात कार्यरत रहावे,’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.
महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ (नासिक) ने २०१७ मध्ये घेतलेल्या एमबीबीएस परीक्षेत विविध विषयांत १४ सुवर्णपदके मिळवणाऱ्या डॉ. सुलतान शौकतअली यांचा सत्कार पुण्यात झाला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आझम कँपस येथे नऊ जानेवारीला झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . वासुदेव गाडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे होते.
डॉ. सुलतान शौकतअली हे आझम कँपसच्या एम. ए. रंगूनवाला टॅलेंट स्कीमचे माजी विद्यार्थी आहेत. कार्य्रक्रमात त्यांना मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी बोलताना माजी कुलगुरू डॉ. गाडे म्हणाले, ‘देशाच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच टक्के विद्यार्थी केंद्राच्या शैक्षणिक शिखर संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकतात; मात्र त्यांच्यावर शिक्षणाच्या एकूण निधीपैकी ९० टक्के निधी खर्च होतो. येथून शिकून बाहेर देशी जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे उच्च शिक्षित विद्यार्थी देशातच कार्यरत राहिले, तर हा खर्च सत्कारणी लागेल. अजूनही देशाच्या समस्या पूर्ण सुटलेल्या नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या योगदानाची देशाला गरज आहे. फक्त व्यावसायिक तज्ज्ञ (प्रोफेशनल्स) होण्यापेक्षा जबाबदार नागरिक होऊन योगदान देण्याची आजही गरज आहे. समाजाची सेवा करण्याचे उद्दिष्ट काही विद्यार्थ्यांनी ठरवून स्वतःसमोर ठेवायला हवे.’
डॉ. इनामदार म्हणाले, ‘आझम कँपसमध्ये गुणवान विद्यार्थ्यांना प्रगतीच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. खडतर परिश्रम करून यश मिळविण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी सुलतानच्या यशातून घेतली पाहिजे. परमेश्वराने सर्वांना कष्ट करायला समान वेळ दिला आहे, त्याचा उपयोग करून मोठे व्हावे आणि समाजऋण फेडावे.’
सत्काराला उत्तर देताना डॉ. शौकतअली म्हणाले, ‘आझम कँपसच्या टॅलेंट बॅचमधील विशेष मेहनत आणि प्रशिक्षणामुळे मला हे यश मिळू शकले. असाधारण यश मिळविण्यासाठी तितकीच असाधारण मेहनत करावी लागते, हे डॉ. पी. ए. इनामदार यांचे वाक्य मी डोळ्यासमोर ठेवले होते.’
आबेदा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. गफार शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. शौकतअली यांचे पालक साबिया शौकतअली, मोईनुद्दीन शौकतअली, संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक आयेशा शेख, परवीन शेख, कल्पना पाटील, तसनीम शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.